Friday, April 25, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यश्रवण दोष बाधित बालक: जागरूकता आणि उपाययोजना

श्रवण दोष बाधित बालक: जागरूकता आणि उपाययोजना

डॉ. राणी खेडीकर: अध्यक्ष बाल कल्याण समिती, पुणे

आज फेसबुकवर एक खूप वायरल झालेली पोस्ट बघितली. एक रील होती. त्यात एक आई आपल्या अगदी साधारण एक ते दोन वर्षांच्या झोपलेल्या बाळाला कडेवर घेऊन त्याची मान आपल्या खांद्यावर आणि गळ्याशी घेऊन खूप मोठा ढोल जोरजोरात वाजवत होती. बाळ झोपलं होतं असं दिसत होतं. रिलमध्ये एकूणच ढोल आणि इतर वाद्यांचा खूप मोठा आवाज येत होता. आईचे ढोल वाजवताना हलणारे खांदे बाळाची मान, डोकं पण हलवत होते. प्रचंड आवाज होता तरी ते बाळ झोपलेलं होतं अर्थात त्याला किती झोप येत असणार याचा अंदाज येतो. कमेंट्स वाचायची उत्सुकता झाली म्हणून कमेंट्स वाचू लागले, तर त्या आईला कोणी झाशीची राणी संबोधले होते, तर कोणी या आईला आपल्या बाळाची काहीच काळजी नाहीय असं पण आपलं मत मांडले होते. मिश्र विचारांच्या लोकांनी आपापल्या प्रतिक्रिया नोंदविल्या होत्या. नंतर त्या रीलची तक्रार पण झाली. आज आपल्याशी एक वेगळा विषय बोलायचा आहे. बालकांना आज सर्रास आपण मोबाइल वापरताना बघतोय. हेडफोन्स तर कानाचाच एक भाग होऊन गेला आहे. बालकांमध्ये हेडफोन्स वापरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोना काळात बालकांना याची जास्त सवय लागली.

ध्वनी प्रदूषण वाढलेलं आहेच. याचा सगळ्यांनाच त्रास तर होतोच आहे आणि श्रवण शक्तीवर होणारा दुष्परिणाम याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे श्रवण दोष बालकांमध्ये बघायला मिळत आहेत. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या अहवालानुसार १०-१६ वयोगटातील १९ पैकी एक व्यक्ती हेडफोन, रॉक कॉन्सर्ट, स्टिरिओ, नाईट क्लब आणि डिस्कोमधील मोठ्या आवाजातील संगीतामुळे कायमस्वरूपी श्रवणक्षमतेने
ग्रस्त आहे.

याबाबत मी पुण्यातील ENT सर्जन डॉ. दुष्यंत खेडीकर यांच्याशी चर्चा केली. डॉ. दुष्यंत खेडीकर हे पुण्यातील नावाजलेले डॉक्टर आहेत. अनेक प्रकारचे श्रवण दोष असणारे बालक यांच्याकडे औषधोपचार आणि सर्जरीसाठी येतात.

भारतात ६३ दशलक्ष कर्णबधिर आहेत. श्रवणशक्ती अक्षम करणे म्हणजे प्रौढांमधील चांगल्या ऐकण्याच्या कानात ४० डेसिबल(dB)पेक्षा जास्त श्रवणशक्ती कमी होणे आणि लहान मुलांच्या चांगल्या ऐकण्याच्या कानात ३०(dB)पेक्षा जास्त श्रवण कमी होणे.

ज्या व्यक्तीला ऐकू येत नाही तसेच सामान्य ऐकू येत नाही – २५ (dB) किंवा दोन्ही कानात त्याहून चांगले ऐकू येत असलेल्या व्यक्तीला – ऐकू येत नाही असे म्हटले जाते.

श्रवण कमी होणे सौम्य, मध्यम, गंभीर किंवा गहन असू शकते. त्याचा एका कानावर किंवा दोन्ही कानांवर परिणाम होऊ शकतो आणि संभाषणात्मक बोलणे किंवा मोठ्याने आवाज ऐकण्यात अडचण येते. दरवर्षी ३ मार्च रोजी जागतिक श्रवण दिवस साजरा केला जातो. जगातील ४६६ दशलक्ष लोक श्रवणशक्ती कमी झाल्यामुळे कमी जगतात. हे जगाच्या लोकसंख्येच्या ५% पेक्षा जास्त आहे. त्यात ४३२ दशलक्ष प्रौढ आणि ३४ दशलक्ष मुलांचा समावेश आहे. ३.६०% बालपणातील श्रवणशक्ती कमी होण्याजोगी कारणांमुळे होते. १.१ अब्ज तरुणांना (१२-३५ वर्षे वयोगटातील) मनोरंजनाच्या सेटिंग्जमध्ये आवाजाच्या संपर्कात आल्याने श्रवणशक्ती कमी होण्याचा धोका आहे, अशी माहिती आपल्याला वाचायला मिळते. डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर बालकांमध्ये वाढणारे कर्ण दोष आणि त्याची गंभीरता याची माहिती मिळाली. ही माहिती पालकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. लहान बालकांमध्ये रोग प्रतिकार शक्ती चांगली असते; परंतु अनेक कारणांमुळे कानावर होणारे दुष्परिणाम दीर्घकालीन असतात याची शक्यता नाकारता येत नाही. तरुणांमध्ये sudden hearing loss चे प्रमाण वाढत आहे असे डॉ. खेडीकर यांनी सांगितले. बालकांमध्ये पण प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण होऊ शकते यासाठी पालकांनी बालकांची काळजी घेणे आवश्यक आहे. ध्वनी प्रदूषणापासून बालकांना वाचवणे गरजेचे आहे, असे त्यांचे मत आहे.

एका अत्यंत गरीब कुटुंबातील बालिका जिला कर्णदोष होता आणि त्या कारणाने ती नीट बोलू शकत नव्हती, नीट ऐकू येत नसल्यामुळे शाळेत अभ्यासात तिला अडचणी येत होत्या. या बालिकेला डॉक्टरांनी कर्णयंत्र दिले. कर्णयंत्र वापरल्यानंतर तिने पहिल्यांदा पक्ष्यांचे आवाज एकले आणि त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. कोकिळा गाते हे तिला त्यादिवशी कळले. या सगळ्या पक्षांकडे इतके मधुर स्वर आहेत हे ती त्या दिवशी पहिल्यांदा अनुभवत होती. कर्णयंत्रामुळे तिची बधिर दुनिया नव्या सूरांनी सजली होती. कर्णदोष लवकर लक्षात आला असता आणि तिला लवकर कर्ण यंत्र मिळालं असते, तर तिने वेळीच प्रगती केली असती. बोलण्यातील अडचणी speech therapy च्या मदतीने लवकर दूर झाल्या असत्या. त्यासाठी पालकांनी जागरूक असणे बालकांच्या आरोग्याच्या समस्येकडे लक्ष देणे आणि सगळ्यात महत्त्वाचे बालकास श्रवण दोषाचा त्रास आहे याचा स्वीकार करणे आणि त्याचे उपचार होऊ शकतात यासाठी डॉक्टरांची मदत घेऊन बालकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे डॉक्टर म्हणाले.

गोंधळ आणि ध्वनी प्रदूषणामुळे अचानक कर्णदोष होणे हे प्रौढांमध्ये प्रचलित आहेच. तथापि, यापूर्वी मुलांमध्ये त्याचा परिणाम फारसा दिसून येत नव्हता. यासंदर्भात अमेरिकेसारख्या विविध देशांमध्ये काही अभ्यास केले गेले आहेत. कॅनडा ऑलिम्पिक, ब्रिटीश, चीन आणि ऑस्ट्रेलिया यापैकी बहुतेकांच्या अभ्यासात असे निदर्शनास आले आहे की, १४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये आवाजाच्या सुनावणीचे प्रमाण १२% ते २०% पर्यंत आहे. गोंधळ आणि ध्वनी प्रदूषणांमुळे कर्णदोष याचे मुख्य कारण वैयक्तिक करमणूक उपकरणांचा मोठा वापर हे आहे. पालकांनी आपल्या बालकांचा या ध्वनी प्रदूषणापासून बचाव करायला हवा तसेच बालकांच्या श्रावण क्षमतेबाबत दोष आढळल्यास कर्णदोष तपासणी करून Audiologist आणि ENT तज्ज्ञ यांच्या सल्ल्याने उपचार, सर्जरी तसेच गरज असल्यास कर्णयंत्र बसवून घेण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे.

डॉक्टर खेडीकर यांनी खूप महत्त्वाचा सल्ला आपल्याला दिला आहे. त्यांचे मत आहे की, बालवाडी, शाळा इथे बालकांच्या कर्ण दोषांचा Baseline Study अभ्यास व्हायला हवा. कधी-कधी कमी प्रमाणात असलेले कर्ण दोष ओळखणे लवकर शक्य होत नाही. अशी तपासणी झाली तर ते कर्ण दोष शोधणे कठीण होणार नाही आणि वेळीच बालकांवर उपचार होईल. डॉक्टर लवकरच अशी तपासणी शाळांमधून होईल याचा प्रयत्न करणार आहेत. कर्ण दोषाबाबत सविस्तर माहिती आणि तपासणी शिबीर ते आयोजित करणार आहेत. त्याचा पालक व बालकांना निश्चितच फायदा होईल. आपण सगळे मिळून बालकांची काळजी घेऊ या आणि याबाबत आणखी माहिती मिळवत राहू, जागरूकता निर्माण करत राहू. जेणेकरून बालकांच्या श्रवण दोष अडचणी आपण सोडवू शकू आणि त्यांचा बधिर झालेला, खोळंबलेला प्रवास आपण सुरळीत करू शकू.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -