नवी मुंबई : भारतातील मोस्ट वॉन्टेड ड्रग्ज सिंडिकेटचा म्होरक्या नवीन चिचकरचे वडील आणि नामांकित बांधकाम व्यावसायिक गुरु चिचकर यांनी आज सकाळी स्वतःच्या घरात स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे, मृतदेहाशेजारी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी थेट नार्को विभागाच्या अधिकाऱ्यांवर जाचाचा आरोप करत, त्यांच्या त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याचा उल्लेख केला आहे.
गुरु चिचकर हे एका नामांकित बांधकाम व्यावसायिक कुटुंबातील असून त्यांचा मुलगा नवीन चिचकर हा सध्या देशाबाहेर फरार आहे. ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या रडारवर असलेल्या नवीन चिचकरविरोधात लूकआऊट नोटीसही जारी करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तो विदेशातून ड्रग्ज सिंडिकेट चालवत असल्याची माहिती आहे.
वक्फ कायद्यात बदल गरजेचाच; केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केले प्रतिज्ञापत्र
घटनास्थळी पोलिसांनी एक सुसाईड नोट हस्तगत केली असून त्यातील मजकुरामुळे खळबळ माजली आहे. या चिठ्ठीत गुरु चिचकर यांनी मुलावर दाखल झालेल्या केसेसमध्ये नार्को अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या मानसिक त्रासामुळे जीवन संपवावे लागल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, चिठ्ठीत आणखी कोणते खुलासे आहेत का, याची चौकशी सुरू असून नवी मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत.