चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स राखत हरवले. चेन्नईने हैदराबादला विजयासाठी १५५ धावांचे आव्हान दिले होते. हैदराबादने हे आव्हान ५ विकेट राखत पूर्ण केले. हैदराबादच्या विजयासाठी इशान किशनने सर्वाधिक ४४ धावा केल्या. तर कमिंदू मेंडिसने ३२ धावा केल्या.
दोन्ही संघादरम्यानचा हा सामना चेपॉक स्टेडियमवर रंगला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने सनरायजर्स हैदराबादला विजयासाठी १५५ धावांचे आव्हान दिले होते. सनरायजर्सकडून हर्षल पटेलने शानदार गोलंदाजी करताना ४ विकेट मिळवले.
सध्याच्या हंगामात दोन्ही संघांची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. चेन्नईने आतापर्यंत ८ पैकी २ सामन्यांत विजय मिळवला आहे तर सनरायजर्स हैदराबादलाही ८ पैकी केवळ २ सामन्यांत विजय मिळवता आला.
चेन्नईची सुरूवात खराब राहिली. त्यांनी पहिल्या बॉलवर शेख रशीदची विकेट गमावली. रशीदला मोहम्मद शमीने बाद केले. यानंतर १७ वर्षीय आयुष म्हात्रे आणि सॅम करन यांनी मिळून ३९ धावांची भागीदारी केली. करनची विकेट हर्षल पटेलने घेतली. त्याने केवळ ९ धावा केल्या. आयुष म्हात्रे लयीमध्ये दिसत होता मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही. आयुषने ६ चौकारांच्या मदतीने १९ बॉलमध्ये ३० धावा केल्या. आयुष बाद झाल्यानंतर चेन्नई ३ बाद ४७ इतक्या धावसंख्येवर होती.
तीन विकेट गमावल्यानंतर डेवाल्ड ब्रेविस आणि रवींद्र जडेजा यांनी मिळून डाव पुढे नेला. जडेजा लयीमध्ये दिसत होता तेव्हाच कामिंदु मेंडिसच्या फिरकीत तो अडकला. जडेजाने १ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १७ बॉलवर २१ धावा केल्या. जडेजा पॅव्हेलियनला परतल्यानंतर ब्रेविसने आक्रमक खेळी करत काही मोठे शॉट्स लगावले. ब्रेविसने २५ बॉलमध्ये ४२ धावा केल्या. कर्णधार धोनीकडूनही मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र त्याने पुन्हा निराश केले. त्याला केवळ ६ धावाच करता आल्या.