मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ अ या मुंबईतील दुसऱ्या भुयारी मेट्रोचा दुसरा बोगद्याचे काम मेअखेर पूर्ण होणार आहे. त्यामुळे ही मेट्रो सुरू होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पडणार आहे, अशी माहिती आता अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) कडून मेट्रो ७ अ मार्गिकेची उभारणी सुरू असून, ३.४ किमी लांबीच्या या मार्गिकेवर एकूण दोन मेट्रो स्थानके आहेत. यातील डाऊनलाईन मार्गाच्या बोगद्याचे काम ‘दिशा’ या टनेल बोरिंग मशीनद्वारे (टीबीएम) नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. जवळपास १.६५ किमी लांबीचा हा मार्ग आहे.
आता दुसऱ्या बोगद्याचे काम जलदगतीने पूर्ण करण्यावर एमएमआरडीएचा भर आहे. दुसऱ्या बोगद्याचे केवळ १०० मीटरचे काम शिल्लक असून, या मार्गिकेचा हा अवघड टप्पा मे अखेरपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर मार्गिका सुरू करण्यासाठी दीड वर्ष लागतील, असा अंदाज आहे. सद्य:स्थितीत या मेट्रो ७ अ मार्गिकेची ५९ टक्के कामे पूर्ण झाली असून, उर्वरित कामे पूर्ण होऊन मार्गिका सुरू होण्यासाठी डिसेंबर २०२६ उजाडणार आहे.