जीवन संगीत – सद्गुरू वामनराव पै
परमेश्वर हा विषय किती महत्त्वाचा आहे, पण तो न समजल्यामुळे आज अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत व या समस्या सोडवताना समस्त मानव जातीच्या नाकात दम आलेला आहे. या समस्या सोडवल्या जातील की नाही याबद्दल आम्हांला शंका आहे म्हणून हे जीवनविद्येचे तत्त्वज्ञान महत्त्वाचे आहे. परमेश्वर हा आपल्या जीवनाचे अत्यंत महत्त्वाचे स्थान व्यापून आहे. हा परमेश्वर आहे कसा? त्याबद्दल वेदांनी सांगितले “नेती नेती नेती”. तो कसा आहे? तुम्ही जे सांगाल ना त्या पलीकडे तो आहे. तुम्ही काहीही सांगा त्याच्या पलीकडे तो आहे. देव कसा आहे हे आपल्याला थोडं सांगता येईल पण देव आहे तसा कुणालाही सांगता येणार नाही. मी काय सांगतो ते नीट ऐका हं. देव कसा आहे याचे आपल्याला थोडेसे वर्णन करता येईल पण तो जसा आहे तसे त्याचे वर्णन करता येणे शक्य नाही.
परमेश्वराचे जे दिव्यत्व आहे ते इतके प्रचंड आहे, अलौकिक आहे, विस्मयकारक आहे, आश्चर्यकारक आहे की, त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. हजारो माणसे निर्माण झाली पण माणूस म्हणून सर्व सारखेच. हजारो कसले? अब्जावधी माणसे आत्तापर्यंत निर्माण झाली, आजही आहेत यापुढेही होतील, पण माणूस म्हटला की, तो सारखाच. माणूस म्हटला की दोन डोळे, समोर एक नाक, दोन कान हे सर्व अवयव सारखे. किती वाघ निर्माण झाले ते वाघ सर्व सारखेच, कावळे सर्व सारखेच, चिमण्या सर्व सारख्याच हे जर बघितले, तर हे सर्व निर्माण झाले कसे याचा सहसा कोणी विचारच करत नाही. हा निसर्ग आहे म्हणतात. अरे पण हा निसर्गसुद्धा अद्भुत आहे. हा निसर्गसुद्धा तुम्ही पाहायला गेलात, तर त्याचा ठावठिकाणा लागत नाही. निसर्ग प्रचंड आहे. जसा परमेश्वर प्रचंड तसा निसर्गही प्रचंड आहे. त्याने जे जे निर्माण केले ते सर्वच प्रचंड आहे. आता पृथ्वी किती प्रचंड आहे? अशी ही प्रचंड पृथ्वी अनंतकोटी ब्रह्मांडामध्ये एका थेंबाएवढी आहे हे आणखी एक आश्चर्य. अनंतकोटी ब्रह्माण्डे!
पूर्वी आम्ही म्हणत होतो की, कदाचित एक हजार दोन हजार सूर्य आहेत, कुणी म्हणाले दहा हजार सूर्य आहेत. आता शास्त्रज्ञ सांगत आहेत मोजता येणार नाहीत इतके सूर्य आहेत. अजूनही निर्मिती इतक्या झपाट्याने चालली आहे की, जगाचा विस्तार होतो आहे. काही लोक म्हणायचे की जगबुडी होणार. जीवनविद्या सांगते जगबुडी कधी होणारच नाही. कारण जगाचा विस्तार सतत होत आहे. हा जगाचा सतत होणारा विस्तार हे परमेश्वराचेच रूप आहे.