नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी
मुंबई : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पर्यावरण पूरक आणि समृद्ध शहरांची निर्मिती गरजेची आहे. बहुपर्यायी वाहतूक व्यवस्थेसोबतच रोजगार निर्मितीवर भर, सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर करावा. अशा शहरांच्या निर्मितीसाठी सिडकोची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘ मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी’ निर्माण करण्याचे निर्देश दिले. या विमानतळाला वॉटर टॅक्सीची सुविधा उपलब्ध करून द्यावी. अशी सुविधा असणारे हे देशातील पहिलेच आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सामान्य विमान वाहतुकीची व्यवस्था सर्वप्रथम निर्माण करण्याचे सूचित करीत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, जगभरातून लोक मुंबईमध्ये विमाने आणत असतात. त्यामुळे पार्किंगची चांगली सुविधा या विमानतळावर उपलब्ध असायला पाहिजे. यासोबतच विमान दुरुस्तीची सुविधाही विमानतळावर असावी. विमानतळाला रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि जलवाहतुक ‘ कनेक्टिव्हिटी’ ची कामे वेळेत पूर्ण करावीत.
नैना प्रकल्पाची अंमलबजावणी गतीने करण्यात यावी. या प्रकल्पांतर्गत निर्माण करण्यात येणारे रस्त्यांची रुंदी भविष्यातील वाहतुकीचा भार लक्षात घेऊन निर्धारित करण्यात यावी. भविष्यात सुरू होणाऱ्या आणि सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामांचा कालावधी निश्चित करण्यात यावा. यापुढे पायाभूत सोयी सुविधा निर्मितीच्या कामांबाबत निविदेमध्येच कालावधीची सक्ती करण्यात यावी. आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असताना कुठलेही काम जास्त कालावधीसाठी रेंगाळणे योग्य नाही. त्यामुळे कामांचा कालावधी हा निश्चित करण्यात यावा, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.
मेट्रो स्टेशन पासून विमानतळापर्यंत बहुपर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यात यावी. याबाबत नागरिकांची कुठलीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी. सिडकोच्या माध्यमातून सुरू असलेली कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करावी. घरकुल आणि गृहनिर्माणच्या बाबतीत कामे दर्जेदार करण्यात यावी. याबाबतही कालावधीची मर्यादा ठेवावी. नागरिकांना परवडणाऱ्या किमतीत घरे देण्यासाठी सिडकोने पुढाकार घेत कार्यवाही करावी. नवी मुंबई परिसरात क्रीडा सुविधांचे कामे सुरू आहे. त्यामुळे या भागामध्ये क्रीडा सुविधांचा चांगला विकास होत आहे. खारघर व्हॅली गोल्फ कोर्सचे काम पूर्ण करण्यात यावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
सह्याद्री अतिथिगृह येथे सिडकोच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, अप्पर मुख्य सचिव (नियोजन) राजगोपाल देवरा, अप्पर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गुप्ता, सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.