कोलकाता : पहलगाममध्ये मंगळवारी(दि.२२) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जूनमध्ये भारतात होणारी दक्षिण आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. एवढेच नाहीतर, या स्पर्धेत पाकिस्तान खेळाडूंच्या प्रवेशावरही बंदी घातली जाऊ शकते.
यासंदर्भातील माहितीनुसार दक्षिण आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धा येत्या जूनमध्ये भारतात खेळली जाणार होती. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भूतानचे खेळाडू रांचीला पोहोचले असून त्यांनी सरावही सुरू केला होता. आता ही स्पर्धा कोणत्या तारखेला आयोजित केली जाईल, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही. याआधी ही स्पर्धा ३ ते ५ मे दरम्यान खेळवली जाणार होती. परंतु, पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा मिळण्यास विलंब झाल्याने ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली.
दक्षिण आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानी खेळाडूंच्या प्रवेशावर बंदी घातली जाऊ शकते, अशी शक्यता आहे. पहलगाममधील हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून भारतात येण्यासाठी दिलेले सर्व व्हिसा रद्द करण्यात आले. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानमधून एकूण ४३ खेळाडूंची नावे पाठवण्यात आली होती, ज्यामध्ये भालाफेकपटू अर्शद नदीमचे याच्याही नावाचा समावेश आहे.