बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सला ११ धावांनी हरवले आहे. आरसीबीने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५ बाद २०५ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला केवळ ९ बाद १९४ धावाच करता आल्या.
आयपीएल २०२५मध्ये बंगळुरूची कामगिरी चांगली राहिली आहे. त्यांनी आठ सामन्यांपैकी पाच सामने जिंकले आहेत. दुसरीकडे राजस्थानने इतकेच सामने खेळताना केवळ २ सामन्यांत विजय मिळवला आहे.
आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीची सुरूवात चांगली राहिली. यशस्वी जायसवाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी पहिल्या विकेटसाठी २६ बॉलमध्ये ५२ धावांची भागीदारी केली. याचा अंत भुवनेश्वरने केला. वैभवने २ षटकारांच्या मदतीने १२ बॉलवर १६ धावा केल्या. यशस्वी जायसवाल अतिशय तुफानी फलंदाजी करत होता. मात्र तो एका धावेमुळे अर्धशतकापासून दूर राहिला. यशस्वीने १९ बॉलमध्ये ४९ धावा केल्या.यशस्वी बाद झाल्यानंतर कर्णधार रियान पराग आणि नितीश राणा यांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी ३८ धावांची भागीदारी केली. दोघेही फलंदाज लयीमध्ये दिसत होते. मात्र कृणालच्या फिरकीसमोर दोघेही बाद झाले. रियान परागने १० बॉलमध्ये २२ धावा कर नितीश राणाने २२ बॉलमध्ये २८ धावा केल्या.
राजस्थानला शेवटच्या १२ बॉलमध्ये २८ धावा हव्या होत्या. मात्र जोश हेझलवूडची विकेट महागडी ठरली. राजस्थानचे एकामागोमाग एक विकेट पडत गेले आणि त्यांचा ११ धावांनी पराभव झाला.
तत्पूर्वी, पहिल्यांदा फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची सुरूवात अतिशय शानदार राहिली. फिल साल्ट आणि विराट कोहलीने मिळून पहिल्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली. दोन्ही खेळाडूंनी सुरूवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. अशातच आरसीबीने पॉवरप्लेमध्ये एकूण ६१ धावा केल्या. पॉवरप्लेनंतर फिल साल्टच्या रूपात आरसीबीला पहिला झटका बसला. त्याने २३ बॉलवर २६ धावांचे योगदान दिले.
यानंतर देवदत्त पड्डिकल आणि विराट कोहलीने मिळून दुसऱ्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान कोहलीने ३२ बॉलमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. सध्याच्या हंगामातील विराटचे हे पाचवे अर्धशतक आहे. कोहली-पड्डिकल यांच्यातील भागीदारी जोफ्रा आर्चरने तोडली. आर्चरने विकाट कोहलीला नितीश राणाच्या हाती कॅचआऊट केले. कोहलीने ४१ बॉलमध्ये ७० धावा केल्या. यात ८ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे.