बीड : महाराष्ट्राच्या राजकारणात ‘नवीन बीड पॅटर्न’ सध्या चर्चेत आहे, पण त्यामागचं काळं वास्तव आणखी एकदा समोर आलंय. केज तालुक्यात ‘कला केंद्रा’च्या आड वेश्याव्यवसाय (Prostitution) चालवला जात असल्याचा भयंकर प्रकार उघड झाला आहे आणि या वेश्याव्यवसायाला ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा वरदहस्त असल्याचा थेट आरोप केला जात आहे.
उबाठा गटाचे नेते रत्नाकर शिंदे यांच्याशी संबंधित असलेल्या ‘महालक्ष्मी कला केंद्रा’वर बीड पोलिसांनी काल रात्री धाड टाकली. या छाप्यात १० महिलांची सुटका करण्यात आली असून, या केंद्राचा व्यवस्थापक अनैतिक कृत्यांमध्ये सक्रिय सहभाग घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, या रॅकेटचे पुरावे थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठवण्यात आले होते, परंतु कारवाईस वेळ लागल्याने ‘राजकीय हस्तक्षेपामुळेच प्रकरण झाकलं जात होतं’, असा संशय आता बळावला आहे.
या घडामोडीवरून एक प्रश्न उपस्थित होतो की, राजकीय वरदहस्त असलेल्या ‘कला केंद्रां’च्या आड चालणाऱ्या व्यवसायांकडे पोलिसांनी याआधी दुर्लक्ष केलं का?
२०२३ मध्येही याच केंद्रावर रेड झाली होती, पण कारवाई केवळ ‘फॉरमॅलिटी’पुरती मर्यादित राहिल्याचं आता स्पष्ट होत आहे. पोलिसांनी PITA कायद्यासह भारतीय दंड संहितेची कठोर कलमे लावत मालक, त्याचा मुलगा आणि व्यवस्थापकावर गुन्हे दाखल केले आहेत.
या प्रकरणातून बीडमधील राजकीय-गुन्हेगारी साटे-लोटे असलेलं नवं पान उघड झालं आहे. कला, संस्कृतीच्या नावाखाली चालणारा हा ‘उद्योग’ केवळ सामाजिक प्रश्न नाही, तर राजकीय नैतिकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.
आता प्रश्न असा की, कारवाई खरंच गुन्हेगारांवर होईल, की पुन्हा राजकीय दबावाखाली सगळं ‘निपटून’ जाईल? अशी चर्चा सुरु आहे.