दहशतवाद्यांचे उरलेले अड्डे नष्ट करण्याची वेळ आली आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली: पहलगाममधील पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्यामुळे देशात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्याविरुद्ध सरकार आक्रमक झाले असून, हा रक्तरंजित कट रचणाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी, तपास यंत्रणानी युद्धपातळीवर काम करायला सुरुवात केली आहे. दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पहलगाम हल्ल्याबद्दल मोठे भाष्य केले आहे.
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याविरुद्ध सरकारने कारवाईला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याचीही माहिती आहे. पहलगामच्या हल्ल्यात हिंदू पर्यटकांना टार्गेट बनवण्यात आले. या हल्ल्यानंतर लोकांमध्ये प्रचंड असा संताप हा बघायला मिळतोय. या हल्ल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय वक्तव्य करतात यावर संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. त्यामुळे मोदी यांनी पहलगामवरील हल्ल्याची माहिती मिळताच विदेश दौरा अर्धवट सोडत, भारत गाठले आणि त्यांनी विमानतळावरच अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. ज्यात अनेक महत्वाच्या गोष्टींवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर आज बिहार येथील भाषणात पंतप्रधान मोदी यांनी थेट इशाराच दिलाय.
View this post on Instagram
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा इशारा
पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये बोलताना म्हणाले की, २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी ज्या क्रूरतेने निष्पाप लोकांना मारले त्यामुळे संपूर्ण देश दुःखी आहे. संपूर्ण राष्ट्र सर्व पीडित कुटुंबांच्या दुःखात त्यांच्यासोबत आहे. या हल्ल्यात कोणीतरी आपला मुलगा, भाऊ किंवा पती गमावला आहे. देशाच्या शत्रूंनी भारताच्या आत्म्यावर हल्ला करण्याचे धाडस केले आहे.
या भाषणात मोदी पुढे म्हणाले, “दहशतवाद भारताच्या आत्म्याला तोडू शकत नाही. दहशतवाद्यांचे उरलेले अड्डे नष्ट करण्याची वेळ आली आहे. १४० कोटी भारतीयांची इच्छाशक्ती दहशतवाद्यांचे कंबरडे मोडेल.” पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या कटातील सर्वांना कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल असा इशारा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भाषणाद्वारे दिला आहे.