Thursday, April 24, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखपहलगाममधील नरसंहार, हिंदू पर्यटकांना टार्गेट

पहलगाममधील नरसंहार, हिंदू पर्यटकांना टार्गेट

भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची हत्या केली आणि त्या हल्ल्यात १६जण जखमी झाले. पहलगाममधील बैसरन घाटी म्हणजे दुसरे स्वित्झर्लंड म्हटले जाते. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील ३७० कलमांचे कवच काढून घेतल्यापासून भारत विरोधी शक्ती अशांत होत्या. काश्मिरी जनतेला देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोदी सरकार गेले दहा वर्षे जिद्दीने प्रयत्न करीत आहे. रोजगार, उद्योग व विकासाच्या माध्यमातून काश्मिरी जनतेचे जीवनमान उंचवण्यासाठी विविध क्षेत्रांत योजना राबवल्या जात आहेत. पाच वर्षांपूर्वी ३७०वे कलम रद्द केल्याच्या निर्णयावर संसदेने शिक्कामोर्तब केले. त्यानंतर गेल्या वर्षी लोकसभा व विधानसभा निवडणुकाही शांततेने पार पडल्या. दोन्ही निवडणुकीत काश्मिरी मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करून देशातील संसदीय लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग आहे व देशाच्या लोकशाही पद्धतीवर आपला विश्वास आहे हे जगाला दाखवून दिले. विधानसभा निवडणुकीत लोकशाही मार्गानेच जनतेने ओमर अब्दुला यांच्या पक्षाला बहुमत दिले व ओमर अब्दुल्ला हे काश्मीरचे मुख्यमंत्री झाले. काश्मीरमध्ये जनजीवन वेगाने सुरळीत होऊ लागले. पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली. काश्मीरची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे. बगीचे, हाऊस बोट, हॉटेल्स, सफरचंदाच्या बागा, गालिचे, निसर्ग सौदर्यांची तर काश्मीरला देणगी आहे. सध्या तर पर्यटकांचा हंगाम सुरू झाला आहे. देशातील सर्व भागांतून पर्यटकांचा ओघ काश्मीरकडे आहे. काश्मीरचे जनजीवन सुरळीत होत आहे, काश्मीरला पुन्हा आर्थिक सुबत्ता प्राप्त होत आहे हे ज्यांना बघवत नाही, अशा नतद्रष्ट प्रवृत्तींनी पहलगाममधे दहशतवादी हल्ला घडवला. काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला खीळ बसावी, खोऱ्यात पुन्हा अशांतता निर्माण व्हावी, भारताविषयी काश्मिरी जनतेच्या मनात द्वेष आणि संताप आहे, असा संदेश जगभरात जावा, यासाठी दहशतवाद्यांनी पहलगाममधे नरसंहार घडवला.

पहलगाममधील दहशतवादी हल्ला हा निश्चितच पूर्वनियोजित कट होता. पर्यटकांना खिंडीत पकडून, ते बेसावध असताना व त्यांच्या आजूबाजूला सुरक्षा व्यवस्था नसताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. देशाच्या विविध भागांतून हजारो पर्यटक काश्मीर खोऱ्यात आनंद लुटायला गेलेले असताना हा दहशतवादी हल्ला झाला व त्या टोळीने मोठा रक्तपात घडवला. पर्यटकांमधे दहशत व भीती निर्माण व्हावी, त्यातून हिंदुस्थानातील पर्यटकांनी काश्मीरला फिरकू नये असे कारस्थान रचले गेले. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधे पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरचा हा पहलगामचा दुसरा मोठा दहशतवादी हल्ला आहे. पुलवामा येथे दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या वाहनांवर हल्ला करून ४० जवानांची हत्या केली होती, पहलगाम येथे २८ पर्यंटकांचे त्यांनी बळी घेतले. पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर निर्दयी दहशतवादी हल्ला झाला. पर्यटक नि:शस्त्र होते, तर दहशतवद्यांकडे एके ४७ सारख्या अत्याधुनिक बंदुका होत्या. पर्यटक कुटंुबीयांसह मौजमजा करायला आले होते, ते प्रतिकार करू शकणार नाहीत हे दहशतवाद्यांनी पूर्ण ओळखले होते. म्हणूनच तेथे असलेल्या ४० पर्यटकांपैकी २८ जणांवर समोरून गोळ्या घालून त्यांनी हत्या केली. गोळ्या झाडण्यापूर्वी दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांची नावे विचारली. ते हिंदू असल्याची खात्री करून घेतली व त्यांना जागीच ठार मारले. नावे सांगितल्यावर ज्यांच्याविषयी दहशतवाद्यांना संशय आला त्यांचे कपडे उतरवून, त्यांची शारीरिक तपासणी करून त्यांच्यावर बंदुका चालविल्या. काहींना तर कुराणातील कलाम पढायला दिले, ते वाचता आले नाही म्हणूनही ठार मारले. पर्यटक हिंदू आहेत हा एकच निकष या नरसंहारामागे होता. नवविवाहीत तरुणीच्या पतीला तिच्या समोरच दहशतवाद्यांनी ठार मारले, तेव्हा ती मलाही ठार मारा असे ओरडून सांगत होती, पण तिला त्यांनी मारले नाही, उलट जा, मोदींना जाऊन सांग, असे दरडावून बजावले. पर्यटकांना टिपून टिपून मारले हेच या हत्याकांडातून दिसून आले. १९९० च्या दशकात काश्मीर खोऱ्यात दहशतवाद जेव्हा शिगेला पोहोचला होता, तेव्हा हिंदूंना (पंडितांना) तेथे राहणे दहशतवाद्यांनी अशक्य केले होते. त्यांचे अपहरण, त्यांची हत्या, हिंदू महिलांवर बलात्कार, अत्याचार असे सर्वत्र प्रकार घडले. काश्मीर खोऱ्यात हिंदूंनी पुन्हा फिरकू नये, म्हणून दहशतवाद्यांनी पहलगाममधे हिंदूंचा नरसंहार घडवला असेल, तर भारत सरकारला दहशतवाद मोडून काढण्यासाठी कठोर पावले उचलावी लागतील.

एका बालाकोटच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना काहीशा नमल्या होत्या पण अजून त्या संपलेल्या नाहीत. सर्जिकल स्ट्राईकपेक्षा आणखी कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष भारताच्या दौऱ्यावर असताना दुसऱ्याच दिवशी पहलगाममधे नरसंहार झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियात असताना दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये रक्तपात घडवला. पाकिस्तानमधील लष्कर ए तोयबाशी संलग्न असलेल्या द रेझिस्टंट फ्रंट या संघटनेने पहलगाममधील हत्याकांडाची जबाबदारी घेतल्याचे जाहीर केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे घटनेनंतर तत्काळ श्रीनगरला धावले व मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली, तेव्हा आम्हाला न्याय द्या, असा नातेवाईकांनी आक्रोश केला. पंतप्रधान मोदी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतले. नायब राज्यपाल मनोज सिन्हा व मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी हत्याकांडाचा तीव्र शब्दात धिक्कार केला आहे. पहलगाम हत्याकांडाच्या निषेधार्थ दुसऱ्याच दिवशी संपूर्ण काश्मीरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. जगभरातील सर्वच प्रमुख नेत्यांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहेच, पण काश्मीरमधील जनतेने आपण भारताबरोबर आहोत असे ठामपणे म्हटले आहे. विशेष म्हणजे काश्मीरमधील इंग्रजी व उर्दू वृत्तपत्रांनी हत्याकांडाचा वृत्तांत देताना पहिले पान काळे प्रसिद्ध करून दहशतवादाचा निषेध केला आहे. पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना सोडणार नाही असे म्हटले आहेच. मोदी आपला शब्द खरा करून दाखवतील यावर भारतीय जनतेचा पूर्ण विश्वास आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -