Friday, April 25, 2025
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीसंस्कृतीच्या पाऊलखुणा २ - वासुदेव!!

संस्कृतीच्या पाऊलखुणा २ – वासुदेव!!

मनाचा गाभारा – अर्चना सरोदे

सोसायटीमध्ये फन फेअर लागला होता. अलीकडे प्रत्येक सोसायटीमध्ये असतोच. पूर्वी गावांमध्ये जत्रा असायच्या. वर्षातून एकदा येणाऱ्या या जत्रेचं बालपणी केवढं अप्रृप वाटायचं; परंतु आता बदलत्या काळानुसार जत्रेचे रूप सुद्धा बदललं आहे. आजकाल सोसायट्यांमध्येच छोटासा मेळा भरवतात आणि जत्रेची मजा लुटतात. असो… तर सोसायटीच्या या मेळ्यात खाऊपासून ते कपडे, खेळणी सगळ्यांचेच स्टॉल असतात आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पाश्चिमात्य संस्कृतीप्रमाणे सगळ्यांचं मनोरंजन करण्यासाठी तिथे एक सांताक्लॉज पण असतो. लहान मुले त्याच्यामागे धावत असतात. ते दृष्य बघून मनात विचार आला की पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करण्याऐवजी आपल्या संस्कृतीला जतन करण्याचा प्रयत्न का होत नाही. आपल्याकडे ही उत्कृष्ट लोक कलाकार आहेत की? आपला वासुदेवच पहा ना… हो!… आपलाच… कारण याची नाळ आपल्या संस्कृतीशी जोडली गेली आहे… आणि तो कृष्णाशी जोडला गेलाय…

या कृष्ण भक्त वासुदेवाचं नाव ओठावर आलं आणि त्याच ते रूप डोळ्यांसमोर तरळू लागलं. डोक्यावर उभट मोरपिसांची टोपी, गळ्यात रंगीबेरंगी कवड्यांच्या माळा, सफेद पायघोळ अंगरखा, पायांत विजार किंवा धोतर, खांद्यावर आणखी कमरेभोवती उपरणे गुंडाळलेले, एका हातात चिपळ्या, दुसऱ्या हातात टाळ, कमरेला बासरी, मंजिरी आणि काखेला झोळी, हातात तांब्याचे कडे, कपाळावर व कंठावर गंधाचे टिळे आणि पायात घुंगरू अशा वेशात गाणं म्हणत एका हातात चिपळ्या आणि एका हातात टाळ वाजवून गिरकी घेत नाच करणारा वासुदेव गावोगावी दिसायचा.

पूर्वीच्या काळी प्रसन्नता घेऊन पहाट अलवार यायची. कोकीळ सुद्धा आपल्या गोड गळ्याने गाणं म्हणून संपूर्ण गावाला जागे करायची. पक्षांच्या किलबिलाटाबरोबरच घराघरांतून जात्यावरच्या ओव्या ऐकू यायच्या. अंगणात सडा सारवण करून रांगोळी घातली जायची. अशा अल्हाददायक पहाटे प्रसन्न आणि मंगलमय वातावरणात कधी चिपळ्या, तर कधी बासरीचा मधुर स्वर कानावर पडायचा आणि मागोमाग नाचत येणारा वासुदेव दिसायचा. घरातल्या सुनेने धान्य, कपडे, पैसे दिले की, दान पावल्याची वर्दी देवाला गाण्यातून द्यायचा.

दान पावलं दान पावलं !!
पंढरपुरामंदी इट्टोबारायाला !!
कोंढणपुरामंदी तुकाबीला !!
जेजुरीमंदी खंडोबारायाला !!
सासवडामंदी
सोपानदेवाला !!
दान पावलं
दान पावलं !!

असं गाणं म्हणत प्रत्येक देवाला दानं पावल्याचा निरोप द्यायचा. बासरी वाजवून गिरकी घेत दुसऱ्या घरी जायचा. त्याच्यामागे गावातल्या बाल गोपाळांची गर्दी असायची; परंतु आता काळ बदलला तशी परिस्थिती सुद्धा बदलली आहे. आता हेच पाहा ना… मागच्या वर्षी मी डोंबिवलीला माझ्या मावस बहिणीकडे गेले होते. साधारण आठ साडेआठची वेळ असेल.

मला वाड्यात टाळ चिपळ्यांचा आवाज आला म्हणून मी बाल्कनीत जाऊन खाली डोकावून पाहिले, तर वासुदेव दिसला. किती आनंद झाला होता मला तेव्हा… बालपणाच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. मी खाली जाऊन त्याच्याशी बोलले. म्हटलं एवढं उशिरा का येता? मी लहान असताना आमच्या गावी पहाटेच वासुदेव यायचा. तसं तो हसला आणि म्हणाला “ ताई तवाचा काळ येगळा व्हता… तवा लोक रामाच्या पारी (पहाटे) उठायचं… पन आता मातूर लोक सात नंतर उठत्यात… मग आमी जर रामाच्या पारी आलो, तर वसकन अंगावर येत्यात… झोप मोड केली म्हणत्यात… हाकलून देत्यात… कंदी कंदी तर वासुदेव असल्याचा पुरुप (प्रृफ) पण देवा लागतो… त्याच बोलणं ऐकून मन विषण्ण झालं… एवढं होऊनही पिढ्यानपिढ्या जोपासलेली ही कला म्हणजेच त्याच्या वाडवडिलांकडून घेतलेला हा वसा जणू पुढील पिढीला देऊन हजारो वर्षांची सांस्कृतिक परंपरा तो जोपासत असतो आणि आम्ही मात्र आमच्याच संस्कृतीची पावलं मागे खेचण्यात स्वत:ला धन्य समजतो. नैतिक मूल्ये जपणाऱ्या या वासुदेवाचे जगणे जरी भटके असले तरी त्याच्या गाण्यातून मात्र तो प्रबोधन करत असतो… शिवाजी महाराजांच्या काळात वासुदेवाने मोलाची कामगिरी बजावली आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ यांनी आपल्या साहित्यातून यांची रूपके मांडली आहेत. हजार/बाराशे वर्षांपासूनची ही कला आधुनिकतेच्या वादळात डोलायमान झाली आहे. या वादळामुळे या कलेच्या पाऊलखुणा मिटू नयेत असे प्रकर्षाने वाटते आणि म्हणूनच पाश्चिमात्य संस्कृती ऐवजी आपल्या संस्कृतीची ओळख नव्या पिढीला करून देण्याची आता खरोखर गरज आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -