बीजापूर : छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यातील घनदाट जंगलात मागील ४८ तासांपासून गोळीबार सुरू आहे. बीजापूर जिल्हा हा छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेवर आहे. या जिल्ह्यातील घनदाट जंगलात किमान ३०० नक्षलवाद्यांना तीन हजारांपेक्षा जास्त जवानांनी घेरले आहे. नक्षलवादी आणि सुरक्षा पथकाचे जवान यांच्यात चकमक सुरू आहे. जंगलात प्रमुख नक्षलवादी नेते लपले असल्याची ठोस माहिती हाती आल्यानंतर जवानांनी परिसराला घेराव घातला आणि चकमक सुरू झाली आहे. कारगेट्टा, नाडपल्ली, पुजारी कांकेर या डोंगरांमध्ये ठिकठिकाणी जवानांनी नक्षलवाद्यांना घेरले आहे. दोन्ही बाजूने थांबून थांबून गोळीबार सुरू आहे.
नक्षलवाद्यांविरुद्धच्या कारवाईत महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणा येथील नक्षलवाद विरोधी पथकांचे सुरक्षा जवान सहभागी झाले आहेत. ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षित उंचीवरुन जंगलाची पाहणी करण्याचे तसेच नक्षलवाद्यांच्या हालचालींचा अंदाज घेऊन त्यानुसार कारवाई करण्याचे काम जवान करत आहेत.
Indus Water Treaty : सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित, पाकिस्तान पडणार कोरडाठाक
नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईची देखरेख आणि नियंत्रण तेलंगणातून सुरू आहे. बस्तरचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी आणि बीजापूरचे पोलीस अधीक्षक जितेंद्र यादव हे दोघे नियंत्रण कक्षातून कारवाईवर लक्ष ठेवून आहेत. तिन्ही राज्यांचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री सतत नियंत्रण कक्षाकडून कारवाईत आतापर्यंत झालेल्या प्रगतीची माहिती घेत आहेत.
सध्या नक्षलवाद्यांना २८० चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात घेरण्यात आले आहे. हळू हळू जवान पुढे सरकत नक्षलवाद्यांना कमीत कमी जागेत घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. चकमक यशस्वी झाली तर नक्षलवाद्यांवर हा अलिकडच्या काळातला एक मोठा ‘प्रहार’ असेल. अद्याप या प्रकरणात प्रसिद्धपत्रक काढून अथवा पत्रकार परिषद घेऊन कोणतीही माहिती दिलेली नाही.