माझे कोकण: संतोष वायंगणकर
गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही म्हणून केवळ रडत बसणारे आपण अनेकजण पाहतो; परंतु आई-वडील दोघंही लहानपणी मृत्यू पावले. आजीचा मायेचा ओलावा आणि कुटुंबीय म्हणून बहीण आणि भावोजी अशा दोघांनी दिलेला आधार आणि विश्वास या बळावर सिंधुदुर्ग जिल्ह्यतील कसाल गावातील वझरीवाडीत रहाणाऱ्या एका मुलाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत धैर्याने उभा राहत मिळवलेले यश निश्चितच प्रेरणादायी असेच आहे. प्रथमेश उमेश जोशी असे या तरुणाचे नाव आहे. कोकणातील तरुण-तरुणी अगदी आजही युपीएससी, एमपीएससीमध्ये जायला तयार नसतात. त्याचीही अनेक कारण असतात. अनेक कुटुंबांमध्ये शिकलेला मुलगा नोकरी करून घराला आधार देईल अशीच सर्वसाधारणपणे मानसिकता आहे. आजही कोकणातून विशेषत: सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर या चार जिल्ह्यांचा विचार जरी आपण केला तरीही ही युपीएससी, एमपीएससी झालेल्यांची संख्या २५ वर जाईल अशी स्थिती नाही. याच कारण एमपीएससीच स्वप्नच आज तरुणांना पडत नाही. प्रयत्न केल्यावर यश तर निश्चितच मिळेल. खरंतर एमपीएससी, युपीएससी परीक्षेसाठी जी तरुणांची मानसिकता असायला हवी ती मानसिकता आजही आपल्या कोकणातील समाजव्यवस्थेत झालेली नाही.
गेल्या काही वर्षांमध्ये तहसीलदार, पोलीस उपनिरीक्षक या पदांवर मोठ्या प्रमाणावर पश्चिम महाराष्ट्रातील तरुण काम करताना दिसतात. शाहूवाडी जवळच एक गाव पोलीस फौजदारांच गाव म्हणून ओळखल जाते. गावातील ८० टक्के तरुण पोलीस खात्यात भरती झाले आहेत. पोलीस उपनिरीक्षक पदांवरच अनेकजण कार्यरत आहेत. जिद्द, चिकाटी, संयम, अभ्यास यामुळेच असे यश मिळते. जेव्हा वेगळ्या वाटेने आपण जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो प्रवास निश्चितच सुखकारक असत नाही. तो प्रवास खडतरच असतो. मात्र, तरीही प्रयत्नांचे सातत्य राखत यश मिळेपर्यंत प्रयत्न करण्याची आवश्यकता असते. कित्येकवेळा परिस्थितीपुढे कोलमडून पडणारे अनेकजण आपण पाहतो; परंतु परिस्थिती कोणतीही असो, त्या परिस्थितीवर मात करत एखादा तरुण जेव्हा वेगळ्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो निश्चितच लिखाणाचा विषय होऊन जातो. शासकीय सेवेतील वरिष्ठपदे त्यांना का खुणावत नाहीत हा पडलेला प्रश्न आहे. कोकणातील तरुणांनी मुंबई, पुणे, नागपूर अशा शहरांकडे नोकरीसाठी धाव न घेता शासकीय सेवेत वरिष्ठ पदांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. किंवा जर कोकणात थांबण्याचा निर्णय घेण्यात आला असेल तर आधुनिक बियाणी आणि तंत्रज्ञानाचा वापर करून शेती क्षेत्रातूनही प्रगती करता येऊ शकते हे देखील कोकणातील काही तरुणांनी निश्चितच दाखवून दिले आहे. कोकणातील तरुणांनी भविष्यात या सगळ्याचा विचार करून आपलं ध्येय निश्चित करायला हवं. दहावी-बारावी परीक्षांचे निकाल शंभर टक्के लागतात. महाराष्ट्रात कोकण नंबर वन आहे. गेल्या काही वर्षांत दहावी, बारावी परीक्षांच्या निकालाने महाराष्ट्रात या परीक्षांमध्ये कोकण पॅटर्न तयार झाला आहे; परंतु दहावी-बारावी परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवणारे विद्यार्थी पुढे काय करतात हा प्रश्न पडतो. त्याकाळी देखील बोर्डात पहिला येणारा तरुण नंतर काय करतो हा खरंतर शोधण्याचा विषय आहे. योग्य मार्गदर्शनाचा आपल्याकडे अभाव आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांतून तरुणांची फौज शासकीय सेवेत दाखल होते; परंतु कोकणात शासकीय सेवेतील नोकर भरती प्रक्रियेत कोकणातील तरुण बुद्धिमत्तेने मागे पडत नाहीत; परंतु ज्या पद्धतीने शासकीय नोकर भरती केली जाते ती कार्यपद्धती कोकणातील तरुणांपर्यंत पोहोचणार नाही याची काळजी घेतली जाते. यामुळेच कोकणातील कोणत्याही शासकीय नोकर भरती प्रक्रियेत कोकणाबाहेरील तरुणांची भरती होताना दिसते.
कोकणात परप्रांतातून नोकरीला लागलेल्या तरुणांची बौद्धिकता कामाच्या ठिकाणी सहज लक्षात येते. मग प्रश्नही मनात डोकावून जातो. कोकणात जी भरती प्रक्रिया राबविली जाते त्याचा नेमका पॅटर्न काय आहे? नोकरभरतीत कोकणाबाहेरील तरुणांचा भरणा असतो हे देखील एक न सुटलेलं कोडच आहे. खरंतर शासकीय कोकणातील तरुणांमध्ये ‘टॅलेंट’ नाही का? मग शासकीय नोकर भरतीत उर्वरित महाराष्ट्रातील तरुणांना संधी मिळते. पोलीस, शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य विभाग यासर्व नोकरभरतीमध्ये कोकणाबाहेरील तरुण नोकरीला लागतात. खरंतर याच संशोधन होणं गरजेच आहे. कुठेतरी पाणी मुरतय. यामुळेच प्रत्येक शासकीय नोकरभरतीत कोकणाबाहेरील तरुण यशस्वी होताना दिसतात. अनेकांना अनेकवेळा साधे चार ओळींचे मराठीही बोलता येत नाही. तरीही ते इंटरव्यूहमध्ये पास होतात. याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही. इथे कोणत्याही भागातील लोकांना कमी लेखण्याचा विषय नाही; परंतु जी वस्तुस्थिती आहे. ती वस्तुस्थिती कोकणातील जनता अनुभवतेच आहे. याबाबतीत सर्वांनीच गांभिर्याने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. कोकणातील काही आयएएस, आयपीएस अधिकारीही आहेत; परंतु ही संख्या फारच मोजकी आहे. या संख्येत वाढ झाली पाहिजे यासाठी तसे वातावरण निर्माण करण्याची आवश्यकता आहे. एखाद्या दिवसाच्या मार्गदर्शनाने, कार्यक्रमाने काही फरक पडणार नाही. त्यासाठी चळवळ म्हणूनच त्याकडे पाहिले पाहिजे. शाळा, महाविद्यालयातून विद्यार्थ्यांनी एमपीएससी, युपीएससीच्या अभ्यासक्रमात गोडवा वाटेल असे वातावरण निर्मिती करावी लागेल. अनेकवेळा त्या अभ्यासक्रमासंबंधी भीती निर्माण केली जाते. यासाठी हा अभ्यास कष्ट, सातत्याने आणि परिश्रमाने होऊ शकते हे देखील समजून सांगितले पाहिजे. सध्या सिंधुदुर्गात जीएसटी अधिकारी असलेले ठाकूर यांनी, तर पहिल्यांदा तलाठी परीक्षा दिली. यशस्वी, ग्रामसेवक परीक्षा दिली त्यातही यश.
एमपीएससीची पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाले. पोलीस ट्रेनिंग घेऊन पोलीसदलात मन रमेना मग पुन्हा तलाठी परीक्षा उत्तीर्ण महसूल सेवेत दाखल. त्यानंतर पुन्हा एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन विक्रीकर निरीक्षक पदावर सेवेत रूजू झाले. सध्या ते जीएसटी अधिकारी म्हणून सेवेत आहेत. ठाकूर यांच शिक्षण फोंडाघाटमधील प्राथमिक मराठी शाळा, हायस्कूलला झाले आहे. यामुळे फक्त नियमित अभ्यास आणि त्यासाठी यशाचा पाठलाग करण्याची विद्यार्थ्यांची मानसिकता असायला हवी. कोकणातील विद्यार्थी एका ठराविक क्षेत्रातच जाण्याचा प्रयत्न करतो, त्यांनी या सनदी अधिकारी सेवेत जायला हवे. सामाजिक काम हे अशा अधिकारपदावरूनही होऊ शकते. मात्र, त्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत.
प्रथमेश उमेश जोशीसारखा आई-वडील नसतानाही गरूड झेप घेतो. ही प्रेरणा घेऊन अनेकांनी हे प्रयत्न करायला पाहिजेत. सततच्या प्रयत्नातून यशाकडे जाणारा मार्ग आपोआप सुखकर होऊ शकतो. यश कशापद्धतीने मिळवता येते हे इतरांनाही सांगितले पाहिजे. कोकणात आपण होऊन कोणीही विचारायला जाणार नाहीत. कारण जो बिनधास्तपणा विद्यार्थ्यांमध्ये असायला हवा तो नाही.