नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल हे कोचीमध्ये तैनात होते. त्यांचे १६ एप्रिलला लग्न झाले होते. ते हनीमूनसाठी काश्मीरमध्ये आले होते. मात्र दुर्देवाने त्यांना या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले.
लेफ्टनंट विनय नरवाल हरियाणातील मूळ निवासी आहेत. त्यांची पत्नी सुरक्षित आहे. हे दाम्पत्य सोमवारी श्रीनगर येथे पोहोचले होते. आधी पहलगाम फिरण्यासाठी गेले होते. घटनेनंतर पत्नीचा आपल्या पतीसोबतच्या मृतदेहासोबतचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हरयाणाचे मूळ निवासी
विनय नरवाल हे कर्नालच्या सेक्टर ७ येथे राहणारे होते. दोन वर्षांपूर्वीच ते नौदलात दाखल झाले होते. विनय सोमवारी श्रीनगर येथे फिरण्यासाठी गेले होते. त्यांचे कुटुंबीय कर्नालच्या सेक्टर ७मध्ये राहतात. घटनेची सूचना मिळताच कुटुंबातील काही सदस्य श्रीनगरसाठी रवाना झाले.
आम्ही फक्त भेलपुरी खात होतो आणि…
या घटनेनंतर पत्नीने थरथरत्या आवाजात सांगितले, आम्ही फक्त भेलपुरी खात होतो आणि त्यांनी माझ्या पतीवर गोळी झाडली. महिलेने सांगितले, की बंदुकधाऱ्यांनी सांगितले की माझे पती मुसलमान नाहीत आणि त्यांना गोळी मारली.