मुंबई : महायुती सरकारने (Mahayuti) महिलांच्या आर्थिक दृष्टया सक्षमीकरणासाठी ‘लाडकी बहीण योजना’ (Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत वार्षिक उत्पन्न २.५० लाखांहून कमी असणाऱ्या महाराष्ट्रातील महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यात येतात. आतापर्यंत महाराष्ट्रातील लाभार्थी महिलांना (Maharashtra Women) ९ हप्ते देण्यात आले आहेत. त्यानंतर आता एप्रिलचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana April Installment) पुढील हप्ता ३० एप्रिल २०२५ पर्यंत दिला जाणार असल्याची घोषणा केली आहे. ३० एप्रिल रोजी अक्षय तृतीया असून त्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना १५०० रुपये देण्यात येणार आहेत. सध्या लाडक्या बहिणीच्या अर्जांची तपासणी सुरु असून, योजनेच्या निकषांनुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. योजनेच्या निकषांनुसार ज्या महिलांचं उत्पन्न हे २.५० लाखांपेक्षा जास्त असेल अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. आतापर्यंत लाडकी बहीण योजनेतून ९ लाख अपात्र महिलांची नावे वगळण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
८ लाख लाडक्या बहिणींचा हप्ता कपात
सरकारच्या नियमानुसार, एकाच व्यक्तीला वैयक्तिक लाभाच्या केवळ एका योजनेचा फायदा घेता येतो. पण मागील काही काळात अनेक महिला एकाचवेळी शेतकरी सन्मान निधी आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचे दिसून आले. या प्रकाराची सरकारने छाननी केली असून, ज्या महिला दोन्ही योजना घेतात त्यांना ‘लाडकी बहीण’ योजनेतून केवळ ५०० रुपयेच मिळतील, असा निर्णय घेतला आहे. या नव्या निर्णयामुळे सुमारे ८ लाख लाभार्थी महिलांवर परिणाम होणार आहे.
‘आर्थिक लाभाचा दुहेरी फायदा मिळू नये, यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे यापुढे संबंधित महिलांना केवळ एकाच योजनेचा मुख्य लाभ घेता येणार असून, दुसऱ्या योजनेतील सहाय्य मर्यादित स्वरूपात मिळेल’ असे सरकारने स्पष्ट केले आहे.
लाडक्या बहिणींना २१०० कधी मिळणार?
महायुती सरकारने लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही महिलांना २१०० देऊ, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जाहिरनामा हा ५ वर्षांसाठी असतो. या काळात आम्ही लाडक्या बहिणींना कधीही २१०० रुपये देऊ, असे म्हटले होते. त्यामुळे २१०० रुपये कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Ladki Bahin Yojana)