पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या अतुल मोने, हेमंत जोशी, संजय लेलेंचा समावेश आहे. तर पनवेलच्या दिलीप डिसलेंचाही या भ्याड हल्यात मृत्यू झाला आहे. पुण्याचे संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर श्रीनगरमध्ये उपचार सुरू आहेत.
अतुल मोने हे डोंबिवली पश्चिमेच्या ठाकूरवाडी परिसरातील श्रीराम अचल इमारतीत राहतात. अतुल मोने हे पत्नी आणि मुलीसह पहलगाममध्ये फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
अतुल मोने यांच्या सोबत डोंबिवली भाग शाळा मैदान परिसरात राहणारे हेमंत जोशी आणि सुभाष रोड परिसरात राहणारे संजय लेले हेदेखील त्यांच्या कुटुंबास पहलगामला गेले होते. या हल्ल्यात हेमंत जोशी आणि संजय लेलेंनाही प्राण गमावावे लागले.
अतुल मोने हे रेलेच्या परळ येथील वर्क शॉप विभागात सेक्शन इंजिनीअर पदावर कार्यरत होते. तर पनवेलचे माणिक पटेल आणि एस. भालचंद्रराव हे दोन पर्यटकही या हल्ल्यात जखमी झाले आहेत. या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती काश्मीर प्रशासनाने दिली.
पुण्याचे जगदाळे पती-पत्नी आणि गणबोटे दाम्पत्य, घोड्यावर बसलेले असताना नाव विचारून त्यांना गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या कुटुंबांशी माझा संपर्क झाला आहे. या कुटुंबातील सगळ्या महिला सुरक्षित आहेत. लवकरच त्यांना परत आणण्याची व्यवस्था केली जात आहे अशी माहीती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.