फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे
आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं खूप गंभीर स्वरूपाचे गुन्हे न घाबरता करत आहेत. आपल्या जवळ शस्त्र बाळगणे, गाड्या फोडणे, गाड्या जाळणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, चोऱ्या करणे इतकंच नाही तर मर्डर, हाफ मर्डर, वैयक्तिक वैमनस्यातून हत्या, बलात्कार, सामूहिक बलात्कार, विनयभंग यासारख्या गंभीर गुन्ह्यात मुलांची संख्या सहभाग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अगदी किरकोळ करणावरून एकमेकांच्या जीवावर उठणाऱ्या या मुलांना ना समाजाचा धाक वाटतं, ना कायद्याची भीती वाटतं. कोवळ्या वयात इतका बेरडपणा, बिनधास्तपणा, हिम्मत कुठून येते, त्यामागील मानस शास्त्रीय कारण काय यावर या लेखात आपण चर्चा करणार आहोत.
बाल गुन्हेगार (Child Criminal) किंवा कायद्याच्या संघर्षात असलेल्या मुलांची (Child in Conflict with Law) मानसिकता अनेक गुंतागुंतीच्या घटकांवर अवलंबून असते. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की प्रत्येक मुलाची परिस्थिती वेगळी असते, परंतु काही सामान्य मानसिक आणि सामाजिक पैलू त्यांच्या वर्तनावर परिणाम करू शकतात. मानसिकतेवर परिणाम करणारे मुख्य घटक म्हणजेच कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background) अस्थिर कुटुंब, आई-वडिलांमधील सततचे वाद, घटस्फोट, किंवा कुटुंबातील सदस्यांचा गुन्हेगारी इतिहास मुलाच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम करतो. मुलांवर झालेले शारीरिक, लैंगिक किंवा भावनिक अत्याचार किंवा पालकांकडून होणारे दुर्लक्ष मुलांमध्ये राग, भीती आणि असुरक्षिततेची भावना वाढवते. यामुळे त्यांच्यात हिंसक प्रवृत्ती वाढू शकते. चुकीचे संगोपन जास्त शिस्त किंवा शिस्तीचा अभाव, तसेच पालकांकडून योग्य मार्गदर्शनाची कमतरता मुलांना चुकीच्या मार्गावर नेऊ शकते. गरिबी आणि पैशाचा अभाव आर्थिक अडचणी आणि मूलभूत गरजांची पूर्तता न झाल्यामुळे काही मुले चोरी किंवा इतर गुन्हेगारी कृत्यांकडे वळू शकतात.
सामाजिक आणि परिसरीय घटक (Social and Environmental Factors):
वाईट संगत, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या किंवा चुकीच्या सवयी असलेल्या मित्र-मैत्रिणींच्या दबावाखाली मुले गुन्हेगारीकडे ओढली जातात. सामाजिक असुरक्षितता, समाजात स्वीकार न मिळणे, शाळेत किंवा समाजात होणारा भेदभाव यामुळे मुलांमध्ये न्यूनगंड आणि समाजाबद्दल राग निर्माण होऊ शकतो. हिंसेचे प्रदर्शन कुटुंब, समाज किंवा माध्यमांमध्ये सतत दिसणारी हिंसा मुलांच्या मनावर परिणाम करते आणि त्यांना हिंसक वर्तनासाठी प्रवृत्त
करू शकते. शालेय समस्या हा एक महत्वाचा भाग आहे. अभ्यासात अपयश, शाळेत गैरहजेरी, किंवा शाळेतील इतर मुलांकडून होणारा त्रास (Bullying) मुलाला शाळेपासून आणि सकारात्मक वातावरणापासून दूर नेतो.
वैयक्तिक आणि मानसिक घटक (Individual and Psychological Factors):
कमी आत्मसन्मान (Low Self-Esteem) स्वतःबद्दल नकारात्मक विचार आणि कमी आत्मविश्वासामुळे मुले इतरांना प्रभावित करण्यासाठी किंवा स्वतःला सिद्ध करण्यासाठी धोकादायक किंवा चुकीची कृत्ये करू शकतात. त्यांचप्रमाणे आवेगी वृत्ती (Impulsivity) विचार न करता कृती करण्याची सवय आणि परिणामांची चिंता न करणे, हे गुन्हेगारी वर्तनाचे एक कारण असू शकते. मेंदूचा जो भाग निर्णय क्षमता आणि आवेग नियंत्रणासाठी जबाबदार असतो (प्रीफ्रंटल कॉर्टेक्स), तो किशोरवयीन मुलांमध्ये पूर्णपणे विकसित झालेला नसतो. तसेच सहानुभूतीचा अभाव (Lack of Empathy) इतरांच्या भावना समजून घेण्याची आणि त्यांच्या दुःखाबद्दल सहानुभूती दर्शवण्याची क्षमता कमी असल्यास, मुले इतरांना त्रास देणारी किंवा नुकसान करणारी कृत्ये सहजपणे करू शकतात.
मानसिक आरोग्य समस्या अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर (ADHD), कंडक्ट डिसऑर्डर (Conduct Disorder), नैराश्य (Depression) किंवा इतर मानसिक आजार मुलांच्या वर्तनावर परिणाम करू शकतात.अमली पदार्थांचे सेवन नशेच्या आहारी गेल्यामुळे मानसिक संतुलन बिघडते आणि गुन्हेगारी कृत्ये करण्याची शक्यता वाढते. अनुभवलेली हिंसा किंवा आघात (Trauma) भूतकाळात अनुभवलेल्या मोठ्या आघातामुळे किंवा सततच्या ताणामुळे मुलाचे मानसिक संतुलन बिघडू शकते. बाल गुन्हेगाराची मानसिकता ही केवळ एका कारणाने तयार होत नाही, तर ती कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक आणि वैयक्तिक घटकांच्या गुंतागुंतीच्या मिश्रणाचा परिणाम असते. अनेकदा ही मुले स्वतःच परिस्थितीचे बळी ठरलेली असतात. त्यांच्या मनात असुरक्षितता, राग, निराशा, भीती आणि समाजाबद्दल अविश्वासाची भावना असू शकते. त्यांना योग्य वेळी भावनिक आधार, समुपदेशन (counselling), शिक्षण आणि सकारात्मक वातावरणाची गरज असते, जेणेकरून त्यांच्या वर्तनात सुधारणा घडवून आणता येईल आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात परत आणता येईल.
दुर्देवाने आपल्याकडे अशा मुलांनी गुन्हे केल्यावर अथवा गुन्हे घडून गेल्यावर पुढील कारवाई अथवा प्रक्रिया सुरु होते. कोणतीही मुलं अशा मार्गाला जाणारच नाहीत यासाठी त्यांच्या परिसरात, घरोघरी, शाळा, महाविद्यालय या ठिकाणी योग्य ते मार्गदर्शन मिळणे, त्यांना वैयक्तिक पातळीवर समजून घेणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे, त्यांना बोलत करणे खूप महत्वाचे आहे. या मुलांचे पालक जरी गरीब, अडाणी, अशिक्षित असले आणि पोटा पाण्याच्या मागे असले तरी समाजाने अशा मुलांना सामावून घेणे, त्यांना चांगली वागणूक देणे, समुपदेशन करणे, त्यांना कायद्याचा आदर वाटावा यासाठी कायदा सुव्यवस्था, शिक्षणाचे महत्व याबद्दल प्रबोधन करत राहणे काळाची गरज आहे. अशा मुलांना रोजगार मिळवून देण्यासाठी, त्यांना माफक फीमध्ये शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणेसाठी म्हणून शासन स्तरावर मोठे प्रयत्न होणे आवश्यक आहे.
फक्त या सारख्या मुलांचच नाही, तर त्यांच्या पूर्ण कुटुंबाच मनपरिवर्तन करनेकामी, ते जिथे राहतात त्या परिसरात कायद्या विषयी, शिक्षणाविषयी, रोजगारासंबंधित जनजागृती कार्यक्रम राबवणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपल्या मुलाची संगत कोण आहे, कशी आहे हे वेळोवेळी लक्ष देत राहा असे या पालकांना ठासून सांगणे, गुन्हा केल्यास मुलांना पाठीशी घालू नका हे पालकांना समजावणे अत्यंत गरजेचे आहे. ही मुलं जर शिकत असतील तर त्यांच्या शाळेतील शिक्षकांशी संवाद साधने, या मुलांना मार्गदर्शक (mentor) म्हणून कसे हाताळावे, त्यांची मानसिकता कशी बदलावी यासाठी शिक्षकांचे पण समुपदेशन होणे अनिवार्य आहे. पोलीस प्रशासनामार्फत त्या त्या हद्दीतील बाल गुन्हेगार, भविष्यात निर्माण होणारे संभाव्य मोठे, वर्चस्वासाठी, भाईगिरी साठी एकमेकांवर हल्ले करणारे गुन्हेगार यांच्यावर वचक ठेवून, योग्य तिथे तातडीने कारवाई करून त्यांना समुपदेशन करणे, किरकोळ गुन्हा केल्यावर त्यांना केवळ समज देऊन सोडून न देता त्यांच्या पालकांना सुद्धा परिणामांची जाणीव करून देणेसाठी विविध उपक्रम राबवणे आवश्यक आहे.
या मुलांना लहानपणापासून पोलीस प्रशासन, कायदा, कायदेशीर प्रक्रिया याचा धाक वाटेल, आदर वाटेल आणि ते चुकीच्या मार्गाला जाताना घाबरतील यासाठी वेळोवेळी त्यांना याबद्दल माहिती देत राहणे, त्यांच्या डोक्यातील काही होत नाही, कोणी काही करत नाही, आपण कोणाला घाबरायचं नाही, कसेही वागलं तर चालत अस गैरसमज दूर करणे खूप गरजेचे आहे. यासाठी त्यांना वारंवार समुपदेशन करणे गरजेचे आहे. गुन्हेगारी वृत्ती लहानपणीच मोडीत काढायची असेल तर खास अशा मुलांसाठी संस्कार वर्ग भरवणे, व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम, रोजगार मार्गदर्शन मेळावे यासारखे उपक्रम राबवणे हिताचे राहील. फक्त पोलीस प्रशासन ला दोष न देता, अथवा समाज माध्यमाना कारणीभूत न ठरवता सर्व समाजाने यात जर वेळोवेळी, वेगवेगळ्या पद्धतीने योगदान दिले तर ही मुलं नक्कीच दिशाहीन होण्यापासून आपण वाचवू शकतो. अशा मुलांना घडवण्यात सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे.