पटना : बिहारमधील एका नीटची (NEET) परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ”माझ्या या निर्णयाला परीक्षा, अभ्यास किंवा माझं कुटुंब कोणीही जबाबदार नसून मी माझ्या इच्छेने हा टोकाचा निर्णय घेत असल्याचे” सुसाईड नोटमध्ये लिहून कोटा येथील वसतिगृहाच्या खोलीत विद्यार्थ्याने स्वत:चे आयुष्य संपवले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून कुटुंबावर दु:खाचे डोंगर कोसळले आहे. (NEET Student Suicide)
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारताची घुसखोरी विरोधात कठोर मोहीम!
नेमके प्रकरण काय?
बिहारमधील एका १८ वर्षीय नीटच्या (NEET) इच्छुक विद्यार्थ्याने मंगळवारी पहाटे राहत्या वसतिगृहाच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. बिहारमधील छपरा येथील रहिवासी असलेला हा विद्यार्थी सुमारे एक वर्षापासून येथील एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये NEET-UG ची तयारी करत होता आणि लँडमार्क सिटी परिसरातील एका वसतिगृहात राहत होता. मंगळवारी पहाटेच्या सुमारास केअरटेकरने मृत विद्यार्थीच्या खोलीचा दरवाजा ठोठावला पण त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर केअरटेकरने ही माहिती पोलिसांना दिली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दरवाजा तोडला. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. (NEET Student Suicide)
कुन्हाडी पोलिस स्टेशनचे सर्कल इन्स्पेक्टर अरविंद भारद्वाज यांनी दिलेल्या माहितीनुसार, टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी, विद्यार्थ्याने त्याच्या बहिणीला व्हॉट्सअॅप मेसेज पाठवला, तिने नंतर वसतिगृहाच्या केअरटेकरला फोन केला आणि तिला तिच्या भावाची खोली तपासण्यास सांगितले. पोलीस तपासात एक सुसाईड नोट सापडली असून यामध्ये विद्यार्थ्याने म्हटले आहे की ‘त्याच्या निर्णयासाठी त्याचे कुटुंब किंवा NEET जबाबदार नाही. तसेच विद्यार्थ्याने त्याचे नाव, कुटुंबाची माहिती किंवा फोटो माध्यमांसोबत शेअर करू नये अशी विनंतीही केली आहे’.
दरम्यान, विद्यार्थ्याच्या या टोकाच्या पावलामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर विद्यार्थ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी एमबीएस हॉस्पिटलच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. देशातील कोचिंग हब असलेल्या कोटा येथे या वर्षी झालेल्या विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्यांची ही ११ वी घटना आहे. गेल्या वर्षी ही संख्या १७ होती. (NEET Student Suicide)