Monday, May 12, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजराजकीयमहत्वाची बातमी

फडणवीस सांगतील तसं चालणार! थोपटेंनंतर तांबेही भाजपाच्या दिशेने?

फडणवीस सांगतील तसं चालणार! थोपटेंनंतर तांबेही भाजपाच्या दिशेने?

पुणे : पुण्यातून काँग्रेससाठी आणखी एक धक्का देणारी राजकीय कुजबुज सुरु झाली आहे. संग्राम थोपटेंनी काँग्रेसचा राजीनामा देत थेट भाजपात उडी घेतली आणि त्या पाठोपाठ आता माजी काँग्रेस आमदार सत्यजित तांबे यांनीही भाजपा प्रवेशाचे संकेत दिले आहेत. ‘फडणवीसांचं नेतृत्व आवडतं, ते सांगतील तशी वाटचाल करणार’ या वक्तव्यानं त्यांनी आपली पुढील दिशा स्पष्ट करत काँग्रेससाठी नवा पेच निर्माण केला आहे.


सत्यजित तांबे म्हणतात, "फडणवीसांसोबत काम करताना एक वेगळाच अनुभव येतो. त्यांचे नेतृत्व स्पष्ट आहे, ते दिशा दाखवतात, ताकद देतात. त्यामुळे माझी पुढची वाटचाल काय असेल हे ते ठरवतील." एवढं म्हणताना त्यांनी भाजपाकडे वाट वळवल्याचे अघोषित संकेत दिले.



तांबे यांनी काँग्रेसबद्दलची नाराजीही थेटपणे व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्ट सांगितले की, काँग्रेसमध्ये सध्या भ्रमनिरास पसरलेला आहे. पक्षात पराभूत नेत्यांकडे लक्ष दिलं जातं, विजयी नेत्यांकडे नाही. महाविकास आघाडीच्या काळात सत्ता असूनही जनाधार असलेल्या नेत्यांना महामंडळं मिळाली नाहीत, ही पक्षाची मोठी चूक होती. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य आहे आणि काँग्रेसचं नेतृत्व या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतंय.


त्यांच्या शब्दांतून एक वेदना होती की, पक्षाने त्यांची हकालपट्टी केली आणि पुन्हा सामील होण्यासाठी कित्येकदा विनंती करावी लागली, तरीही दारं उघडली गेली नाहीत. त्यांना वाटतंय की काँग्रेसमध्ये आता नेतृत्व करतायत ते लोक जनाधाराविना आहेत आणि यामुळे पक्षाची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होणार आहे.


या पार्श्वभूमीवर संग्राम थोपटे भाजपात गेले, आता तांबेही त्यांच्या पावलावर पाऊल टाकणार का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यांचं ‘फडणवीस सांगतील तसं’ हे विधान म्हणजे प्रत्यक्ष भाजपाप्रवेशाची पूर्वसूचना तर नाही ना? राजकीय वर्तुळात याबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत.

Comments
Add Comment