Monday, May 12, 2025

मजेत मस्त तंदुरुस्तताज्या घडामोडी

Heart Attack: गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ का झाली आहे? अभ्यासात मोठा खुलासा

Heart Attack: गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ का झाली आहे? अभ्यासात मोठा खुलासा

कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक


मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे दिसून येते की कोविड-१९ नंतर हृदयविकाराच्या ( Heart Attack) घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे, कोरोना महामारीमुळे हृदयविकाराचे रुग्ण खरंच वाढले आहेत का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी, अमेरिकेत झालेल्या अभ्यासात मोठा खुलासा करण्यात आला आहे.


कोरोना महामारीनंतर जगभरात हृदयविकाराचे रुग्ण ज्या वेगाने वाढत आहेत, ते पाहता आरोग्य तज्ञांना याबद्दल विचार करण्यास भाग पाडले आहे. भारतातही हृदयविकाराचा झटका आणि हृदयविकाराच्या घटनांमुळे आरोग्य सेवांवर अतिरिक्त ताण वाढत आहेच, चिंतेची बाब म्हणजे २० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्येही हृदयविकाराची प्रकरणे नोंदवली जात आहेत.



कोविड-१९ मुळे खरंच हृदयविकाराचा धोका वाढला आहे का?



अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील संशोधकांनी या विषयावर केलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की, कोविड-१९ने हृदयाच्या आरोग्याला गंभीर नुकसान केले आहे, त्यामुळे जगभरात हृदयविकाराचे झटके आणि हृदयाशी संबंधित आजार वाढण्याचे हे एक प्रमुख कारण मानले जाऊ शकते. तज्ज्ञांनी असे देखील सांगितले कि, कोविडमधून सुखरूप वाचलेल्या लोकांना हृदयरोग आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक आहे.



कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक



कोविड १९ मधून वाचलेल्यांना हृदयरोग आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असल्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे. संशोधकांनी सांगितले की, कोविड-१९ ची लागण झालेल्या मुलांना उच्च रक्तदाब आणि हृदयविकार यासारख्या समस्या होण्याचा धोका जास्त असतो. त्याचप्रमाणे, संसर्गानंतर हृदयरोगाची लक्षणे प्रौढांमध्ये अधिक सामान्य झाली आहेत. यावरून हे स्पष्ट होते की कोरोना साथीमुळे हृदयरोगांचा धोका लक्षणीयरीत्या वाढला आहे. अमेरिका आणि पोलंडमध्ये केलेल्या या अभ्यासांमध्ये कोविड-१९ मुळे हृदयाच्या आरोग्याला झालेल्या नुकसानाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.



काय आहे अभ्यास?


पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या पथकाने मार्च २०२० ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत कोविड-१९ संसर्गानंतर एक ते ६ महिन्यांनी हृदयरोगाचा धोका अंदाज लावण्यासाठी हा अभ्यास केला गेला. यासाठी १२ लाखपेक्षा जास्त लोकांच्या डेटाचे विश्लेषण करण्यात आले. सहभागींमध्ये पुरुष, महिला आणि मुले यांचा देखील समावेश होता. या संशोधनात असे आढळून आले की कोविड संसर्गापूर्वी हृदयरोगाचा कोणताही इतिहास नसलेल्या लोकांना भविष्यात हृदयरोग होऊ शकतो.



या लोकांना भविष्यात हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका जास्त



कोविड-१९ मुळे हृदयरोगाच्या धोक्याबद्दल पूर्वीच्या अभ्यासातही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे अलीकडे झालेल्या या अभ्यासातून हे देखील स्पष्ट होते कोरोना संसर्ग झालेल्या लोकांना त्यांच्या हृदयाच्या आरोग्याबद्दल अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे.


संसर्गानंतर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी विकारांच्या वाढत्या धोक्याबद्दल प्रत्येकाने सतर्क राहिले पाहिजे. मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये दीर्घकालीन धोके असू शकतात, म्हणून गुंतागुंत कमी करण्यासाठी वेळेवर निदान आणि वैद्यकीय सल्ला घेणे महत्वाचे आहे.

Comments
Add Comment