मुंबई : ‘मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!’ अशा शब्दांत भाजपा मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर (Ashish Shelar on Uddhav Thackeray) थेट निशाणा साधला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संभाव्य जवळीक चर्चेत असतानाच भाजपाने टीकेची धार आता अधिक तीव्र केली आहे.
गरवारे क्लबमध्ये पार पडलेल्या भाजपा कार्यशाळेत बोलताना शेलार म्हणाले, “उद्धव ठाकरेंच्या डोक्यात सतत ‘लँड आणि स्कॅम’ हेच चालू असते. कारण मुंबईतील जमिनींच्या घोटाळ्यांमधील त्यांची भूमिका सर्वज्ञात आहे.”
उद्धव ठाकरेंवर जहरी टीका करत शेलार म्हणाले, “२५ वर्ष मुंबई महानगरपालिका त्यांच्या ताब्यात होती. त्या काळात बिल्डरांना १ कोटी चौरस फूट जमीन फुकट वाटण्यात आली. आज मुंबईत एका चौरस फुटाची किंमत लाखोंमध्ये आहे. ते आम्हाला जाब विचारणार?”
Mhada House : सर्वसामान्यांना मिळणार स्वस्तात घर! म्हाडा करणार घरांच्या किंमतीत घट
याशिवाय उद्धव ठाकरे सतत ‘ही जमीन अदानीला दिली, ती अंबानीला दिली’ अशा वाक्यांत अडकले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
वक्फ कायद्यावरूनही शेलारांनी ठाकरेंना टोला लगावला. उद्धव ठाकरे यांच्याकडून खोटी माहिती पसरवली जात आहे, असेही ते म्हणाले. “मशीद घेणार, स्मशानभूमी घेणार, अशी खोटी भीती पसरवली जात आहे. पण हे विधेयक गरीब मुस्लिमांच्या हक्कासाठी आहे. मोदी सरकार वक्फ बोर्डाकडून चुकीने घेतलेल्या जमिनी परत देण्याचे काम करत आहे,” असे सांगत त्यांनी मुस्लिम समाजाच्या नावाने भितीचे राजकारण करणाऱ्यांवर हल्ला चढवला.
“जे मुस्लिम समाजाला फक्त व्होट बँक मानतात, तेच या कायद्याचा विरोध करत आहेत,” असा सणसणीत टोला लगावत शेलारांनी उद्धव ठाकरेंना राजकीय मैदानावर उघडे पाडले आहे.