पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या गटाला लक्ष्य करून अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ ठार तर १२ किंवा त्याहून अधिक पर्यटक जखमी झाले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या दक्षिण काश्मीरमधील पहलगाम भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिथे उन्हाळ्यामुळे हजारो पर्यटक दरवर्षी भेटी देत असतात, यावर्षी देखील अनेक लोक या भागात पर्यटनाचा आनंद घेत असताना, पर्यटकांच्या एका गटावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. ज्यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.
जखमींना तातडीने वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी प्रयत्न सुरू, सुरक्षा यंत्रणा सतर्क
सुरुवातीच्या वृत्तानुसार दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या गटाला लक्ष्य करून अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात १२
किंवा त्याहून अधिक पर्यटक जखमी झाले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जखमींना तातडीने वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, हल्ल्याचे ठिकाण डोंगराळ आणि दुर्गम भागात असल्याने मदत कार्यात विलंब होण्याची शक्यता आहे.
या घटनेची माहिती मिळताच परिसरातील सुरक्षा यंत्रणा तातडीने सतर्क झाली आहे. अतिरिक्त सुरक्षा दल घटनास्थळी रवाना झाले असून, परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठे शोध अभियान सुरू करण्यात आले आहे. मात्र घनदाट जंगल आणि डोंगराळ भागामुळे दहशतवादी सहजपणे लपून बसण्याची शक्यता असल्याने सुरक्षा दलांना अत्यंत सावधगिरीने कारवाई करावी लागत आहे. हा हल्ला पहलगाममधील बैसरण परिसरात झाल्याची माहिती समोर येत आहे.
टीआरएफ या दहशतवादी संघटनेचा हात !
या हल्ल्यामागे ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (टीआरएफ) या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव विचारून त्यांच्यावर गोळीबार केला. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात टीआरएफ या दहशतवादी संघटनेचे नाव समोर येत आहे. हल्लेखोर पोलीस गणवेशात होते आणि त्यांची संख्या 2 ते 3 असल्याचे सांगितले जात आहे. हा हल्ला विशेषतः पर्यटकांना लक्ष्य करून घडवण्यात आला होता.