Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडी'चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय', मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय

महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी शाळेतील विद्यार्थीही घेऊ शकतात लाभ

मुंबई (खास प्रतिनिधी) : उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांना मोबाईल आणि टिव्हीपासून दूर ठेवण्यासाठी तसेच त्यांची वाचनाची आवड टिकवता यावी, अवांतर वाचनही करता यावे, या हेतूने मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने ‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय विभागातील (वॉर्ड ऑफिस) मध्यवर्ती शालेय इमारतीमध्ये २ मे ते १२ जून २०२५ या उन्हाळी सुटीच्या कालावधीत प्रत्येकी एक असे एकूण २५ वाचनालय सुरू करण्यात येणार आहे. दररोज सकाळी १० ते दुपारी १ आणि सायंकाळी ४ ते ६ या वेळेत वाचनालय विद्यार्थ्यांसाठी सुरू ठेवण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिका आणि खासगी शाळेतील इयत्ता ६ वी ते इयत्ता १० वी चे विद्यार्थी या वाचनालयाचा लाभ घेऊ शकतील.

मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. उन्हाळी व दिवाळी सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या वाचनात खंड पडू शकतो. त्याचा विपरित परिणाम भ्रमणध्वनी, दूरचित्रवाणीसारख्या (मोबाईल, टीव्ही.) मनोरंजनाच्या साधनांकडे विद्यार्थ्यांचा कल झुकू शकतो. नेमकी हीच समस्या ओळखून महानगरपालिका शाळांमध्ये दीर्घ सुट्टीच्या कालावधीत इयत्ता ६ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येत आहे.

महानगरपालिका कार्यक्षेत्रात २ मे ते १२ जून २०२५ या उन्हाळी सुट्टीत प्रत्येक विभागात प्रत्येकी एका मध्यवर्ती शाळेत वाचनालय सुरू करण्यात येत आहे. या वाचनालयात भरपूर प्रमाणात पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येतील. या वाचनालयाचा लाभ महानगरपालिकेच्या इयत्ता ६ वी ते इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यासह खासगी शाळेतील विद्यार्थी घेऊ शकतील. वाचनालयात मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र वर्गखोली तसेच मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांचीही उपलब्धता करण्यात येणार आहे. वाचनालयाच्या संपूर्ण व्यवस्थेसाठी अशासकीय संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जनजागृती व सर्वेक्षण करण्यात आले आहे.

प्रत्येक वाचनालयाच्या बॅनरवरील क्यू आर स्कॅन केल्यानंतर संपूर्ण महानगरपालिका कार्यक्षेत्रात २५ विभांगामध्ये सुट्टीत कार्यरत वाचनालयांची माहिती गुगल मॅपसह उपलब्ध होणार आहे. महानगरपालिका क्षेत्रातील सर्वच विद्यार्थ्यांनी या अभिनव उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुजाता खरे यांनी केले आहे.

प्रवेशासाठी आवश्यक बाबी

सुट्टीतील वाचनालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे ओळखपत्र, आधारकार्ड आणि पालकांचे संमतीपत्र आवश्यक आहे.

सुट्टीत सुरू होणारे प्रभागनिहाय वाचनालय

ए विभाग – लॉर्ड हँरिस महानगरपालिका शाळा
बी विभाग – जनाबाई आणि माधवराव रोकडे महानगरपालिका शाळा
सी विभाग – निजामपुरा महानगरपालिका शाळा
डी विभाग – गिल्डरलेन महानगरपालिका शाळा
डी विभाग – बाळाराम मार्ग महानगरपालिका शाळा
ई विभाग – न्यू भायखळा पूर्व महानगरपालिका पाटणवाला मार्ग
एफ/दक्षिण विभाग – परळ भोईवाडा महानगरपालिका शाळा
एफ/उत्तर विभाग – कोरबा मीठागर महानगरपालिका शाळा
जी/दक्षिण विभाग – डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका शाळा
जी/ उत्तर विभाग – दादर वुलन मील महानगरपालिका शाळा
एच/ पूर्व विभाग – शास्त्री नगर महानगरपालिका उर्दू शाळा
एच/ पश्चिम विभाग – हसनाबाद महानगरपालिका शाळा
के/ पूर्व विभाग – नित्यानंद मार्ग महानगरपालिका शाळा
के/ पश्चिम विभाग – विलेपार्ले पश्चिम महानगरपालिका शाळा
पी/ दक्षिण विभाग – उन्नत नगर महानगरपालिका शाळा
पी/ उत्तर विभाग – राणी सती मार्ग मराठी महानगरपालिका शाळा
आर/ दक्षिण विभाग – आकुर्ली महानगरपालिका मराठी शाळा क्र. १
आर/मध्य विभाग – पोईसर महानगरपालिका हिंदी शाळा क्र.३
आर/उत्तर विभाग – भरुचा रोड महानगरपालिका शाळा
एल विभाग – नेहरु नगर महानगरपालिका शाळा
एम पूर्व विभाग – शिवाजी नगर महानगरपालिका शाळा क्र. ०१
एम पूर्व २ विभाग – गोवंडी स्टेशन महानगरपालिका मराठी शाळा क्र. २
एम पश्चिम विभाग – टिळक नगर महानगरपालिका शाळा
एन विभाग – माणेकलाल मेहता महानगरपालिका शाळा
एस विभाग – म. वि. रा. शिंदे मार्ग महानगरपालिका हिंदी शाळा
टी विभाग – गोशाळा मार्ग महानगरपालिका शाळा

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -