Tuesday, April 22, 2025
Homeक्रीडाIPL 2025IPL 2025 Rajasthan Royals Match Fixing: राजस्थान रॉयल्सवर धक्कादायक आरोप! लखनौविरुद्धच्या सामन्यात...

IPL 2025 Rajasthan Royals Match Fixing: राजस्थान रॉयल्सवर धक्कादायक आरोप! लखनौविरुद्धच्या सामन्यात फिक्सिंग?

नवी दिल्ली: आयपीएलच्या (IPL 2025) पहिल्या विजेत्या राजस्थान रॉयल्सवर मॅच फिक्सिंगचा आरोप करण्यात आला आहे. लखनौ सामन्यात २ धावांनी पराभव झाल्यानंतर राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या एड-हॉक समितीचे संयोजक जयदीप बिहानी यांकडून संघावर हा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

आयपीएल 2025 च्या हंगामाला सुरुवात झाली असून, आतापर्यंत 39 सामने खेळवण्यात आले आहेत. मात्र यादरम्यान राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायट्स दरम्यान पार पडलेला सामना सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. राजस्थान क्रिकेट असोसिएशन (RCA) च्या एड-हॉक समितीचे संयोजक जयदीप बिहानी यांनी राजस्थान रॉयल्सवर थेट ‘मॅच फिक्सिंग’चा आरोप केला आहे.

राजस्थान रॉयल्स (RR) वर मॅच फिक्सिंगचा आरोप!

इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामाचा विजेता राजस्थान रॉयल्स एका वादात अडकलेला दिसतोय. हा वाद चालू हंगामात लखनौ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध झालेल्या २ धावांनी झालेल्या पराभवाशी संबंधित आहे. एकेकाळी १८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान संघ चांगल्या स्थितीत दिसत होता. पण, एलएसजीचा वेगवान गोलंदाज आवेश खानने शेवटच्या षटकांमध्ये सामना आपल्या संघाच्या बाजूने वळवला. या धक्कादायक निकालानंतर, आता याच सामन्यावर प्रश्न उपस्थित करत जयदीप बिहानी यांनी राजस्थान रॉयल्सवर ‘मॅच फिक्सिंग’चा आरोप केला आहे.

पराभवावर शंका केली उपस्थित

लखनौविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त नऊ धावा हव्या असताना तुम्ही सामना कसा गमावता? असा सवाल बिहानींनी विचारला आहे. ज्या पद्धतीने या सामन्याचा निर्णय लागला ते पाहता हा सामना फिक्स होता हे छोट्या मुलालाही समजेल, असं बिहानी म्हणालेत. जयदीप बिहानी मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड आणि संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील संघावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत आणि पराभवावर शंका घेतली आहे. आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सच्या कारभारावर सरकारने नियुक्त केलेल्या अ‍ॅड-हॉक समितीचे नियंत्रण का नाही, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

शेवटच्या षटकांत नेमक काय घडलं?

शेवटच्या षटकात राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 9 धावाची आवश्यकता होती. लखनौ सुपर जायंट्सचा आवेश खान गोलंदाजी करत होता. राजस्थानचा फलंदाज ध्रुव जुरेल स्ट्राईकवर होता आणि शिमरॉन हेटमायर नॉन-स्ट्रायकर एंडवर होता. शेवटचं षटक टाकण्यासाठी आलेल्या आवेश खानने भेदक गोलंदाजी करत यॉर्करचा वापर केला. शेवटच्या षटकात आवेश खानने फक्त 6 धावा दिल्या आणि लखनौने सामना 2 धावांनी जिंकला.

अ‍ॅड-हॉक कमिटीचे आरआर टीमवर नियंत्रण का नाही?

जयदीप बिहानी गेल्या काही काळापासून राजस्थान रॉयल्सच्या क्रिकेट कारभाराविरुद्ध आवाज उठवत आहेत. जयदीप बिहानी यांनी राजस्थान रॉयल्सच्या आयपीएल कारभारापासून राज्य संघटनेच्या एड-हॉक समितीला दूर ठेवण्याच्या क्रीडा परिषदेच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. जयदीप बिहानी म्हणतात की, राजस्थानमध्ये राज्य सरकारने एक एड-हॉक समिती नियुक्त केली आहे. पाचव्यांदा ती वाढवण्यात आली आहे. सर्व स्पर्धा कोणत्याही अडचणीशिवाय होतील याची आम्ही खात्री करतो. पण, आयपीएल येताच जिल्हा परिषदेने त्यावर ताबा मिळवला. आयपीएलसाठी, बीसीसीआयने प्रथम जिल्हा परिषदेला नाही तर आरसीएला पत्र पाठवले होते.

बिहानी पूढे असे देखील म्हणाले की, आरआर असा सबब सांगत आहे की त्यांचा सवाई मानसिंग स्टेडियमशी सामंजस्य करार नाही. परंतु, कोणताही सामंजस्य करार नसला तरीही, आरआर प्रत्येक सामन्यासाठी जिल्हा परिषदेला पैसे देत आहे. अशा परिस्थितीत, सामंजस्य कराराचा मुद्दा का उपस्थित केला जात आहे? बिहानीच्या या आरोपांमुळे राजस्थान रॉयल्स आणि आयपीएलच्या व्यवस्थापनावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता या आरोपांना आरआर आणि बीसीसीआय काय उत्तर देतात हे पाहणे बाकी आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -