जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने हजारो लाखो मराठी जन परदेशगमन करतात, तिथे स्थिरावतात मात्र स्वतःचा उद्योग सुरू करणारी माणसं खूपच कमी आहेत. दुबईसारख्या देशात तर हजारो भारतीय नोकरीनिमित्ताने वर्षानुवर्षे राहत आहेत. मात्र मुंबईतील बीएआरसीची लठ्ठ पगाराची नोकरी सोडून दुबईमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करायला गेलेले अशोक वर्तक यांच्या सारखे व्यावसायिक फारच विरळा म्हणावे लागतील. दुबईच्या वाळवंटात ४८वर्षे अविरतपणे कार्य करणारे, ज्येष्ठ नागरिक झाल्यावरसुद्धा आपल्या व्यवसायाची धुरा आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलणारे म्हणजेच अशोक गोविंद वर्तक. जिद्द, आत्मविश्वास, मेहनत आणि महत्वाकांक्षा याच्या बळावर दुबईत येऊन, शून्यातून व्यवसायाचा डोलारा उभे करणारे असे एक उमदे व्यक्तिमत्त्व म्हणजेच अशोक वर्तक.
‘दुबई’, ईश्वराने वाळवंटाचे माप या शहराच्या पदरी टाकले, पण त्यावर रडत न बसता दूरदृष्टी, कल्पकता आणि मेहेनत यांच्या बळावर वाळवंटाचे रुपांतर नंदनवनात करणारा देश! अशा या देशात येऊन मराठी बांधवांनी सर्व क्षेत्रात बुद्धिमत्ता, चिकाटी आणि परिश्रम यांच्या जोरावर मराठी नाव कोरले आहे. दुबईच्या आर्थिक उलाढालीच्या क्षेत्रामधे रिअल इस्टेट हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे आणि contracting आणि consulting हे त्याचे अविभाज्य भाग आहेत. दुबईच्या जडणघडणीच्या या दोन्ही महत्त्वाच्या क्षेत्रात मराठी लोकांचे योगदान फार मोठे आहे. त्यातील एक अशोक वर्तक. रिअल इस्टेटच्या Consulting व्यवसायात Architectural & Structural Designing consultant” असे त्यांच्या व्यवसायाचे स्वरुप असून, त्याचं नाव आहे अब्दुल्ला अँड असोसिएट्स. ते सर्वेसर्वा असलेल्या व्यवसायाच्या ४२ वर्षांच्या कारकीर्दीत १५०० हून अधिक प्रोजेक्टस् पूर्ण झाली आहेत. रेसिडेन्शिअल कॉम्प्लेक्स, व्हिलाज, कोल्ड स्टोअरेजेस, वेअर हाउसेस, लेबर कॅम्पस असे स्थापत्य क्षेत्रातील विविध प्रकारचे प्रकल्प पूर्ण केले आहेत.
एक काळ असा होता की, तेव्हा दुबई कोणाच्या खिजगणतीतही नव्हती. विविध प्रकारच्या अपप्रवादांमुळे, कोणतेही कायदे कानून नसलेल्या दुबईत लोक यायला घाबरत होती. अशा या प्रतिकूल काळात, १९७६ च्या जूनमध्ये अशोक वर्तक यांनी दुबईत जायचा निश्चय केला. खरं म्हटले तर चांगली इंजिनिअर म्हणून सरकारी नोकरी सुरू होती; परंतु अशोक यांचा स्वभाव जरा वेगळा आहे. सर्वजण जे करतात ते काय करायचे? म्हणून अमेरिकेची वाट न स्वीकारता अशोक यांनी खाचखळग्यांनी भरलेली दुबईची पाऊलवाट स्वीकारली. अशोक यांचा जन्म पुण्यात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. पुण्यातील सुप्रसिद्ध नूतन मराठी विद्यालयातून त्यांचे ११ वीपर्यंत व नंतर पुणे इंजिनअरिंग कॉलेजमधून इंजिनियर झाले. एका मराठी माणसाने परदेशात जाऊन त्या ठिकाणाच्या हवामान, माती, पाणी जमिनीचा अभ्यास करून त्यानुसार १५०० विविध प्रकारच्या इमारती बांधणं हे सोपं काम नाही; परंतु ते अशोक वर्तक यांनी ते करून दाखवलं आहे. दुबईला पोहोचून सिव्हिल आणि आर्किटेक्ट क्षेत्रात त्यांनी प्रथम नोकरी केली. नंतर फक्त दोन इंजिनिअर्सनी आणि एक आर्किटेक्ट घेऊन कामाला सुरुवात झाली. आज या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. दुबईतील इमारत बांधणीसाठी वेगळच तंत्र वापरावे लागत. एक तर वाळूची पूर्ण जमीन असल्यामुळे खूप खालपर्यंत खोदकाम करावे लागत, त्याशिवाय या देशाचे नियम खूपच कडक आहेत. त्यामुळे लहान, मोठी, साधी आलिशान कशीही असली तरी त्या नियमानुसार दर्जेदार इमारत बांधावी लागते. बांधकाम क्षेत्रातील अनेक चांगले, आव्हानात्मक अनुभव त्यांच्याकडे आहे. दहा-पंधरा जणांचा ऑफिस स्टाफ तसंच साइटवर १०० एकजणांचा स्टाफ त्यांच्याकडे कामावर आहे. हे काम करत असताना त्यांना आपल्या पत्नी आणि मुलांचही खूप चांगलं सहकार्य आणि पाठबळ लाभलं. त्यांच्या पत्नी मेघना यांनी मुलांचे भारत दुबईतील उच्च शिक्षण, संसार यशस्वीरीत्या सांभाळला.
दुबईमध्ये त्यांचं चांगलं बस्तान बसल्यानंतर केवळ पैसा कमावणे हे उद्दिष्ट न ठेवता त्यांना आवडणाऱ्या सामाजिक कार्यामध्येही ते मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात. ६० वर्षे जुन्या दुबईच्या महाराष्ट्र मंडळाचं १९८८-८९ साली अध्यक्षपद आणि ९०ते १२ या काळाचे ट्रस्टी पद त्यांनी भूषविले. महाराष्ट्र देश, मराठी माणूस, भाषा, साहित्य यांचा जाज्वल्य अभिमान असल्याने परदेशातही मराठी भाषा जोपासली जावी यासाठी ते नेहमी जागरुक असतात. मराठी नाटकांचा, गाण्यांचा आस्वाद घेता यावा, यासाठी अनेक दिग्गज कलाकार त्यांनी बोलावले. मराठी माणसाने देशाबाहेर पडलं तरी, महाराष्ट्रासाठी योगदान द्यावं असं अशोक वर्तक मानतात. अशोक वर्तक स्वतःच्या ऑफिसमध्ये स्टाफ घेताना मराठी मुलांना प्राधान्य द्यायचा प्रयत्न करतात; परंतु बोलता बोलता त्यांनी दक्षिण भारतीय तरुण आणि मराठी तरुणांची तुलना करताना सांगितलं की, मराठी मुलांच्या बाबतीत त्यांना आलेले अनुभव निराशाजनक आहेत. मराठी मुलांची मेहनत करायची तयारी नसते. त्याचप्रमाणे नोकरी सुरू करण्यापूर्वीच त्याच्या हजार अटी असतात. केरळी लोकांनी दुबईत येऊन कष्ट करून केरळ राज्याचे चित्रच बदलले आहे, याचे ते नेहमी उदाहरण डोळ्यांसमोर ठेवण्याची गरज आहे. म्हणूनच त्यांचे मराठी मुलांना सांगणे आहे की, डबक्यात उड्या मारत न बसता बाहेर पडा. मेहनत करा.जग फार मोठे आहे. तुमचा दृष्टिकोन बदलेल, कुटुंबाला, महाराष्ट्राला संपन्न करा. चांगलं काम केलं, नाव मिळालं की प्रसिद्धीही आपोआप चालून येते .अशोक वर्तक यांना हिंद रत्न पुरस्कार, द गोल्डन अवॉर्ड तसेच इंटरनॅशनल फ्रेंडशिप सोसायटी ऑफ इंडिया, तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा उद्योग रत्न पुरस्कार मिळाला आहे.
दुबई सुवर्ण नगरी म्हणून ओळखली जाते. इथे लक्ष्मीचा वास आहे. पण कष्ट केल्याशिवाय इथे काहीही मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. पण एव्हढे मात्र निश्चित की मेहेनत करणाऱ्या माणसास आकाशापर्यंत भरारी घेण्याच्या संधी उपलब्ध करून देण्याची क्षमता दुबईत आहे. आज वर्तक शंभर दीडशे जणांना रोजगार देत आहेत. तसेच दीड हजार प्रकल्प त्यांनी पूर्ण केले आहेत. येथील स्वच्छता, सुरक्षितता आणि स्वातंत्र्य जगात कोठेच मिळणार नाही. म्हणूनच दुबई ही स्वप्न नगरी नसून, स्वप्नपूर्ती नगरी आहे असे अशोक यांना वाटते. भविष्यातील त्यांच्या योजनाबद्दल विचारले असता ते म्हणाले, जेव्हा एखादा प्रकल्प पूर्ण होतो तेव्हां त्या सृजन त्मक कलाकृतीतून अवर्णनीय असा आनंद मिळतो. पैसा हा इथे दुय्यम असतो. प्रकल्प चांगला झाला की, आपोआप दुसरं कामही मिळतं आणि पैसा येतोच. पण निर्मितीतील आनंद अभूतपूर्व असतो. भविष्यातही कल्पनेला चालना देणारे, काहीतरी वेगळे असे प्रकल्प हाताळण्याची संधी परमेश्वर द्यावी अशी इच्छा ते व्यक्त करतात.
joshishibani@yahoo. com
मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…
पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…
ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा…
पुणे : पुण्यातून काँग्रेससाठी आणखी एक धक्का देणारी राजकीय कुजबुज सुरु झाली आहे. संग्राम थोपटेंनी…
पुणे : पुणे भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला अखेर रामराम…
मुंबई: टायगर श्रॉफला (Tiger Shroff) जीवे मारण्याच्या धमकी संदर्भात केलेल्या खोट्या तक्रारीबद्दल, मुंबई पोलिसांनी पंजाबमधील…