उमेश कुलकर्णी
जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात उर्वरित जगाने एकजूट होऊन लढत देत नाही तोपर्यंत या संकटापासून भारताची किंवा कुणाचीच सुटका होणार नाही. आज चीन आणि कॅनडा जात्यात आहेत म्हणून आपण आनंद मनवण्याची परिस्थिती उरलेली नाही. उलट आपल्यावरही तीच परिस्थिती ओढवण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे भारताने वेळीच उर्वरित जगाबरोबर स्वतः बरोबर जोडून घेऊन उर्वरित जगाची साथ द्यायला हवी. तरच आपला निभाव लागेल. अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांनी टॅरिफ लावून जगाला जबरदस्त झटका दिला आहे. याला बरोबरीचे शुल्क म्हणतात. पण वास्तवात तसे ते नाही, तर याचे आकलन अमेरिकेला हवे तसे केले जात आहे. म्हणजे अमेरिकेच्या व्यापारी नुकसानाच्या आकड्याला अमेरिकी आयातीने विभागले जाते आणि त्यासाठी कोणतेही तर्क दिले जात नाहीत. त्यामागे काहीही अभ्यास नाही. केवळ अमेरिकेचे मन वाटेल तसेच कर आकारले जातात. त्यात छोट्या देशांवर अन्याय होतो, ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे जागतिक व्यापारात अनिश्चितता आणि उलथापालथ माजवली आहे हे निश्चित आहे.
आंतरराष्ट्रीय व्यापाराची मानके म्हणजे स्टॅँडर्ड आणि तत्त्वांचे उल्लंघन करण्यात आले आहे, वास्तविक अमेरिका जगाला कोणत्याच प्रकारे जुमानत नाही आणि कोणतेही सिद्धांत पाळत नाही. त्यामुळे त्यांच्या आतापर्यंतच्या धोरणाशी सुसंगत असेच हे आहे. पण जगाला त्याचा फटका बसत आहे. म्हणून अमेरिकेच्या या दादागिरीविरोधात जगाने तसेच प्रखर उत्तर दिले पाहिजे. ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीमुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियम संपूर्ण कोलमडले आहेत आणि उलटसुलट झाले आहेत. पण सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की याबाबत जगभरात आणि जगभरातील अर्थतज्ज्ञांत व्यापक विचार झाला आहे आणि त्यावर उपाययोजना शोधण्यात येत आहे. बाजारातील भांडवलदारांवर दबाव असेल आणि अमेरिकेने असे म्हटले आह की अन्य देश जर दर कमी करत असतील, तर अमेरिकाही तसेच करेल. याचा अर्थ अमेरिकेच्या मालावर जास्त कर लावण्यात येणार नाही आणि परिणामी गरीब देशांना व्यापक तूट सोसावी लागेल.
व्हिएतनाम हा गरीब देशामध्ये गणला जातो. त्या देशाने आधीच अमेरिकेपुढे शरणागती पत्करली आहे आणि अमेरिकेला दर कमी करण्याबाबत विचार करण्यास सांगितले आहे. आणखी एक गोष्ट अशी की वेगवेगळे देश प्रतिक्रिया देण्यापासून अलिप्त होत आहेत. कारण त्याना भीती आहे की अमेरिका जर अधिक शुल्क लावून परिस्थिती त्यांच्यासाठी अधिक अवघड करू शकेल. काही उत्पादने म्हणजे औषधे वगैरे अशी आहेत की ज्यांच्यावर टॅरिफ लागू होत नाही. त्यावर देशांचे लक्ष आहे. ही उत्पादने जर टॅरिफच्या वाढीव दरांपासून वगळली गेली, तर देशांना त्याचा फायदाच आहे. त्यामुळे जग याबाबतीत सावध आहे. एक बाब मात्र स्पष्ट आहे. अध्यक्ष ट्रम्प यांचा पवित्रा ठोस देणे-घेणे असा आहे. त्याबाबतीत तडजोड किंवा विचार नाही. त्यामुळे इतर देशानीही तसाच विचार केला पाहिजे. या स्थितीत भारताकडे काय उपाय आहेत याचा विचार केला, तर असे लक्षात येते की चीनकडून भारताला मोठी मदत मिळण्याजोगी आहे. कारण चीन हाही अमेरिकेच्या शत्रुराष्ट्रांमध्ये आहे. त्यामुळे चीनला अमेरिका जसे धडा शिकवेल तसे तो देश अमेरिकेचा शत्रू होईल आणि भारताचा मित्र होईल. कारण शत्रूचा शत्रू हा मित्र असतो हा नेहमीचा सिद्धांत आहे. भारताने आता चीनमध्ये गुंतवणूक करण्याकडे भारताने दुर्लक्ष केले होते तसे आता केले जाऊ नये. कारण हेच भारताच्या हिताचे आहे. कारण इतर देशही चीनमध्ये गुंतवणूक करू पाहतील. त्यामुळे भारताकडून आता उशीर केला जाऊ नये. पण भारताला याहीबाबतीत सावध राहणे आवश्यक आहे कारण अमेरिकेपुढे सारेच पत्ते उघड केले जाऊ नयेत.
भारत आणि समान विचारधारा असलेल्या देशांसाठी ही एक उत्कृष्ट संधी असू शकते आणि हे देश मिळून अमेरिकेच्या या दादागिरीला उत्तर देण्यासाठी जागतिक व्यापार संघटना यापुढे अधिक मजबूत करण्यासाठी विचार करतील. अमेरिकेला परस्परच उत्तर मिळेल आणि हे देशही अमेरिकेच्या दादागिरीपासून वाचतील. अमेरिकेच्या शिवायही भारत असे करू शकेल आणि तसे झाले, तर भारताच्या देशहितासाठी ती एक चांगली बाब ठरेल. आम्ही आपल्या राष्ट्रीय हितास प्राधान्य दिले पाहिजे तरच आपला निभाव लागेल हे ध्यानात घेण्याची गरज आहे. भारताने हे ओळखले पाहिजे की आम्ही भविष्यातील झटक्यांपासून वाचण्यासाठी हे करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय निर्यातही वाढेल. त्याचा लाभ देशाला होईल आणि देशाची निर्यात जी सध्या अत्यंत खालची आहे ती वाढेल.
भारत आणि अमेरिका येत्या मे मध्ये म्हणजे नक्की किती तारखेला हे अजून गुलदस्त्यात आहे पण मे मध्ये दोन्ही देश अंतरीम व्यापारावर वाटाघाटी करणार आहेत. त्यामध्ये दोन्ही देश अंतरीम समझोता शोधण्यात दोन्ही देश प्रयत्नरत आहेत. तसे झाले, तर भारताच्या प्रयत्नांना सोनेरी झालर लागेल. या समझोत्याची प्रगती आणि परिणाम दोन्ही देशांसाठी लाभदायक असतील आणि प्रगतीची असतील हे पाहिले जाईल. अशी आशा आहे. कारण आज भारत आणि अमेरिका विभिन्न परिस्थितीत आहेत. भारत आज पूर्वीपेक्षा खूपच ताकदवान आहे आणि त्याच्याकडे नरेंद मोदी यांच्यासारखा प्रभावशाली नेता आहे. त्यामुळे भारताकडे दुर्लक्ष करून अमेरिकेला चालणार नाही. रशिया किंवा अमेरिका यांच्यात आज जग विभागलेले नाही. शीत युद्धाचा काळ कधीच ओसरला आहे. नवीन देश जसे की भारत आणि चीन हे मोठे ताकदवान ठरत आहेत. त्यामुळे भारताला रशिया किंवा अमेरिका यांच्याकडे लक्ष देण्याची काहीच गरज नाही.
भारत आणि अमेरिका लवकरच आपल्या व्यापारी समझोत्याला अंतिम स्वरूप देण्याकडे गुंतेलेले आहेत. या समझोत्यानुसार ज्या आतापर्यंतच्या शुल्क बाधा होत्या त्यावर विचारच करण्यात आला आहे आणि त्यांना अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. या बाधा दोन्ही देश संपवतील तर दोन्ही देशातील व्यापारी संबंधांत सुधारणा होईल आणि त्याचा लाभ दोन्ही देशांना होईल. दोन्ही देशांतील व्यापार प्रचंड वाढवण्याचा उद्देश्य यामागे आहे आणि तसे झाले, तर ते सोन्याहून सुहागा ठरेल. भारत आणि अमेरिका याच्यातील व्यापारी समझोत्यावर सारेकाही निर्भर ठरेल. पण मे महिन्यात होणाऱ्या भारत अमेरिका या दोन देशांतील व्यापारी समझोत्यावर सारे काही अवलंबून असेल. भारतासाठी सारेच काही निराशानजक नाही ही त्यातल्यात्यात दिलासा देणारी बाब आहे.