Saturday, May 17, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीसिंधुदुर्ग

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा


सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर खून प्रकरणाचा संदर्भ देत माजी आमदार वैभव नाईक यांनी आमदार निलेश राणे, राणे कुटुंबीय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना (शिंदे गट) यांच्यावर केलेल्या टीकेचा तीव्र निषेध करत माजी नगरसेवक राकेश कांदे यांनी आज पत्रकार परिषदेत “निलेश राणे यांच्याशी पंगा नको!” असा थेट इशारा दिला.


महायुतीच्या कुडाळ येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत राकेश कांदे यांनी वैभव नाईक यांच्यावर सवालांचा भडिमार करत गंभीर आरोप केले.


ते म्हणाले, “सिद्धेश शिरसाट वर्षभरातील ३०० दिवस कुडाळमधल्या एका हॉटेलमध्ये बसायचा… ते हॉटेल कोण चालवतं? त्याचं उद्घाटन वैभव नाईक यांच्या हस्तेच झालंय. मग संबंध कुणाचा अधिक जवळचा आहे?”


कांदे यांनी पुढे थेट नाव घेत वैभव नाईक यांचे कार्यकर्ते अक्रम राठी, ताबीश नाईक, आणि गांजाप्रकरणातील आरोपी यांचे फोटो, कार्यक्रमांतील सहभाग, आणि वाळू तस्करीसंबंधित कारवाई यांचा उल्लेख करत विचारलं – “तुम्ही अशा टोळीचे आका आहात का?”


तसेच, बिडवलकर प्रकरणी आरोपी सिद्धेश शिरसाट याचा राणे यांच्यासोबत फोटो असला तरी, शिरसाटची शिंदे गटातली 'एन्ट्री' श्रीराम मंदिर रॅलीदरम्यान झाली, आणि त्या वेळी निलेश राणे भाजपात होते, असे त्यांनी स्पष्ट केले.


शेवटी कांदे यांनी इशारावजा शब्दात सांगितले की, “ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे. आ. राणेंवर उगाच आरोप केल्यास आम्ही एकत्र येऊन जशास तसे उत्तर देऊ.”


महायुती एकसंध असून, निलेश राणे यांचे लोकांमध्ये प्रचंड बळ आहे आणि पुढील निवडणुकीतही ते मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment