२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा!
सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे २४ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, कुडाळच्या एसटी डेपो मैदानावर सायंकाळी ४ वाजता त्यांच्या भव्य आभार सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही सभा फक्त मतदारांचे आभार मानण्यासाठी नाही, तर सिंधुदुर्गातील शिवसेनेचं वाढलेलं बळ दाखवण्यासाठीदेखील आहे.
शिंदे यांच्या या दौऱ्यात जवळपास १५०० कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे हे सर्व नवे प्रवेश उबाठा गटातून असले तरी, महायुतीतील “मित्र पक्षांमध्ये कार्यकर्ते घेणार नाही” हे धोरण कायम ठेवण्यात येणार आहे, असं स्पष्ट मत जिल्हा प्रमुख दत्ता सामंत आणि उपनेते संजय आंग्रे यांनी व्यक्त केलं.
आज कुडाळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या दौऱ्याच्या तयारीबाबत माहिती दिली. सभेची तयारी पूर्ण असून, शिंदे साहेबांचे स्वागत भव्यदिव्य करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक सज्ज आहेत. बैठकीस जिल्ह्याचे अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
एकनाथ शिंदे हे निवडणुकीनंतर प्रथमच जिल्ह्यात येत असून, शिवसेनेच्या उमेदवारांनी सिंधुदुर्गात २ पैकी २ जागा जिंकून दाखवल्या. त्यांच्या नेतृत्वात चालवलेली ‘लाडकी बहीण योजना’सह इतर योजनांना जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे, स्थानिक मतदारांत त्यांच्याबद्दल समाधान आणि उत्साह आहे.
या सभेस उद्योग मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार दीपक केसरकर, गुलाबराव पाटील, दादा भुसे यांच्यासह अनेक नेते सहभागी होणार आहेत.
शिवसेना जिल्ह्याचा बालेकिल्ला बनतो आहे हे यशाचे प्रतिक म्हणून ही सभा महत्त्वाची ठरणार आहे.