कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने पहिल्यांदा फलंदाजी करताना ३ बाद १९८ धावा केल्या होत्या. कोलकत्त्याला याचा पाठलाग करताना केवळ १५९ धावाच करता आल्या. गुजरातने या सामन्यात ३९ धावांनी विजय मिळवला.
सामन्यात टॉस जिंकत केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला होता. गुजरातने पहिल्यांदा फलंदाजी करताना गिलच्या ९० आण साई सुदर्शनच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर केकेआरसमोर विजयासाठी १९९ धावांचे आव्हान ठेवले होते.
टॉसनंतर पहिल्यांदा फलंदाजीत उतरलेल्या गुजरातने कमाल सुरूवात केली. सलामीवीर फलंदाज शुभमन गिल आणि साई सुदर्शन दोघेही लयीमध्ये दिसले. दोघांनी धावांची आतषबाजी सुरू केली. १० षटकांत दोघांनी विकेट न गमावता ८९ धावा केल्या. गिलने केवळ ३४ बॉलमध्ये अर्धशतक ठोकले. तर साई सुदर्शनने ३३ बॉलमध्ये ५० धावा ठोकल्या. दरम्यान, १३व्या षटकांत गुजरातला पहिला झटका बसला. साई सुदर्शन ५२ धावांवर बाद झाला. यानंतर बटलर आणि गिलने मोर्चा सांभाळला. दोघांनी वेगाने धावा केल्या. गिलने ५५ बॉलमध्ये ९० धावांची खेळी केली. तो १८व्या षटकांत बाद झाला. यानंतर राहुल तेवतियाला खातेही खोलता आले नाही. दरम्यान, बटलर एका बाजूला टिकून होता. त्याच्या खेळीच्या जोरावर गुजरातने २० षटकांत ३ बाद १९८ धावा केल्या.
१९९ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या केकेआरची सुरूवात खराब राहिली. पहिल्याच षटकात सिराजने गुरबाजला बाद केले. त्याने एकही धाव केली नाही. यानंतर नरेन आणि रहाणेने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र रशीद खानने सहाव्या षटकांत नरेनला बाद केले. नरेनने १२ बॉलमध्ये १७ धावा केल्या. यानंतर वेंकटेश अय्यर आणि अजिंक्य रहाणे यांच्यात छोटी भागीदारी झाली. माज्ञ २३.७५ कोटींचा अय्यर पुन्हा फ्लॉप ठरला. रहाणेने ३७ बॉलमध्ये ५० धावा करत पराभव टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे प्रयत्न अपुरे ठरले. रसेललाही काही चांगली खेळी करता आली. त्यानंतर एकामागोमाग एक केकेआरचे फलंदाज बाद होत गेले आणि त्यांचा पराभव झाला.