महेश देशपांडे
सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण भागात वाहनविक्रीचा टॉप गिअर पडत आहे आणि दुसरी म्हणजे सरकार ऑटो क्लस्टर विकसित करण्यावर भर देणार आहे. दरम्यान, लग्नाच्या हंगामात सोन्याच्या दराने आकाशाची पातळी गाठल्यामुळे सोनेखरेदीची नवी क्लृप्ती पाहायला मिळत आहे. अशा काही बातम्यांमुळे अर्थनगरीतील गजबज कायम राहिली.
२०२४-२५ या आर्थिक वर्षात भारतातील वाहन बाजाराने चमकदार कामगिरी केली आहे. ‘फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन’(फाडा)च्या ताज्या आकडेवारीनुसार ऑटोमोटिव्ह डीलर्सची संस्था, दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या विक्रीत वाढ झाली आहे. या काळात शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाने चांगली कामगिरी केली. हिरो मोटोकॉर्पने दुचाकींमध्ये आपले वर्चस्व कायम राखले, तर मारुती सुझुकीने चारचाकी वाहनांमध्ये आपले मजबूत स्थान कायम ठेवले. ‘हिरो मोटोकॉर्प’ने दुचाकींच्या बाजारात ५४ लाख ४५ हजार २५१ युनिट्सच्या विक्रीसह पहिले स्थान मिळवले. होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया ४७,८९,२८३ युनिट्सच्या विक्रीसह दुसऱ्या स्थानावर आहे. तिसरे स्थान ‘टीव्हीएस मोटर कंपनी’ने ३३,०१,७८१ युनिट्सच्या विक्रीसह बळकावले. दुचाकींची नोंदणी आठ टक्क्यांनी वाढून १,८८,७७,८१२ युनिट्सवर गेली आहे. गेल्या वर्षी ती १,७५,२७,११५ युनिट होती. मारुती सुझुकीने चारचाकी वाहन विभागात आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे. कंपनीने १६ लाख ७१ हजार ५५९ युनिट्सची विक्री केली.
५,५९,१४९ वाहनांच्या विक्रीसह ‘ह्युंदाई मोटर्स इंडिया’ने दुसऱ्या स्थानावर आहे. ‘टाटा मोटर्स’ने पाच लाख ३५ हजार ९६० युनिट्सच्या विक्रीसह १२.९ टक्के मार्केट शेअर मिळवले. ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ने ५ लाख १२ हजार ६२६ युनिट्सची विक्री केली. चारचाकी वाहनांची एकूण विक्री पाच टक्क्यांनी वाढून ४१ लाख ५३ हजार ४३२ युनिट्सवर पोहोचली आहे. २०२५ या आर्थिक वर्षात दोन कोटी ६१ लाख ४३ हजार ९४३ युनिटची विक्री झाली होती. हे आकडे भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाची मजबूत स्थिती आणि भविष्यात आणखी वाढ होण्याची शक्यता दर्शवतात.
आता वेध ऑटोजगतातील आणखी एका खास बातमीचा. ‘नीती आयोगा’ने देशाच्या ऑटोमोबाईल क्षेत्राला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी सर्वसमावेशक सूचना दिल्या आहेत. आयोगाने जारी केलेल्या ‘ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री: पॉवरिंग इंडियाज पार्टिसिपेशन इन ग्लोबल व्हॅल्यू चेन्स’ या अहवालात म्हटले आहे की भारताला जागतिक ऑटो काँपोनंट मार्केटचा महत्त्वपूर्ण भाग बनवायचे असेल, तर सरकारला वित्तीय प्रोत्साहन आणि मोठ्या प्रमाणावर ‘ब्राउनफील्ड ऑटो क्लस्टर’ विकसित करावे लागेल. सध्या भारतातील वाहन घटकांची निर्यात सुमारे २० अब्ज डॉलर आहे. २०३० पर्यंत ती ६० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे ‘नीती’ आयोगाचे उद्दिष्ट आहे. पुढील पाच वर्षांमध्ये ऑटोमोटिव्ह घटकांचे एकूण उत्पादन १४५ अब्ज डॉलरपर्यंत वाढवले जाईल. त्यामुळे २० ते २५ लाख नवे रोजगार निर्माण होतील आणि या क्षेत्रातील एकूण थेट रोजगार ३० ते ४० लाखांपर्यंत पोहोचेल.
जागतिक ऑटो पार्ट्सच्या व्यापारात इंजिन घटक, ड्राइव्ह ट्रान्समिशन आणि स्टीयरिंग सिस्टीमचा वाटा सर्वात मोठा आहे; परंतु या क्षेत्रांमध्ये भारताचा वाटा सध्या केवळ दोन ते चार टक्के आहे. ही चिंतेची बाब आहे. ‘नीती’ आयोगाने लघु व मध्यम उद्योग सक्षम करण्यासाठी ‘आयपी’ (बौद्धिक संपदा) हस्तांतरण, आंतरराष्ट्रीय ब्रँडिंग आणि संशोधन आणि विकास यांना प्रोत्साहन देण्याची सूचना केली आहे. याव्यतिरिक्त कौशल्य विकास कार्यक्रमांद्वारे प्रतिभा पाइपलाइन विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. यामुळे कंपन्यांमधील सहकार्याला चालना मिळेल आणि पुरवठा साखळी मजबूत होईल. डिजिटल आणि जागतिक सहकार्याला प्रोत्साहन देण्याची सूचना अहवालात करण्यात आली आहे. भारताने डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन कार्यक्षमता वाढवावी आणि कराराच्या अटींमध्ये लवचिकता, पुरवठादार शोध आणि नियमांचे सरलीकरण यासारख्या गैरआर्थिक सुधारणा कराव्यात. यासोबतच भारताला परदेशी सहयोग, संयुक्त उपक्रम आणि मुक्त व्यापार करारांद्वारे आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळवावा लागेल. २०२३ मध्ये जागतिक ऑटोमोबाईल उत्पादन अंदाजे ९४ दशलक्ष युनिट्स इतके होते आणि ऑटो पार्ट्सच्या बाजाराचे मूल्य दोन ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त होते. त्यापैकी निर्यात बाजाराचा आकार सातशे अब्ज इतका होता. भारत हा जगातील चौथा सर्वात मोठा ऑटोमोबाईल उत्पादक देश आहे; परंतु उच्च परिचालन खर्च, पायाभूत सुविधांमधील तफावत आणि संशोधन आणि विकासामध्ये गुंतवणुकीचा अभाव यासारख्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. या अडथळ्यांचे निराकरण केल्यास आणि अहवालात सुचवलेल्या सुधारणांची अंमलबजावणी केल्यास भारत येत्या काही वर्षांमध्ये जागतिक ऑटोमोटिव्ह उद्योगाचे नेतृत्व करू शकेल, असा नीती आयोगाचा विश्वास आहे. आता एक लक्षवेधी बातमी. लग्नाच्या हंगामात सोनेखरेदीची नवी क्लृप्ती अलीकडे पाहायला मिळत आहे. विवाह सोहळे, लग्नाचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच यंदा देशातील सराफा बाजारात सोन्याच्या भावाने विक्रमी झेप घेतली. सोने आणि चांदीच्या किमतींनी आकाशाला गवसणी घातली. वाढत्या ट्रेड वॉरमुळे सोने आता एक लाख रुपये प्रतितोळ्यापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे सराफा बाजारात लग्नप्रसंगी वधूच्या दाग-दागिने खरेदीचा नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. अनेक लोक जुने शिक्के, दागदागिने, बिस्किटे विक्री करून नवीन दागिने तयार करत आहेत. ‘मुंबई बुलियन असोसिएशन’चे सदस्य आणि व्यावसायिक संजय कोठारी यांच्या मते सोन्याच्या किमती सध्या उच्चांकावर आहेत. लग्न सोहळ्यांमुळे ८० टक्क्यांहून अधिक लोक जुने सोने मोडून नवीन सोने खरेदी करत आहेत. यामुळे त्यांच्या खिशाला जास्त आर्थिक भुर्दंड बसत नाही. त्यांना केवळ घडणावळ चार्ज द्यावा लागतो. अनेक लोक जुने शिक्के, तुकडे आणि दागिने मोडून नवीन सोन्याचे दागदागिने खरेदी करत आहेत. जुन्या दागिन्यांच्या विक्रीवर जीएसटी, बाजार मूल्य कपात आणि घडणावळ चार्ज वजा होते. त्यामुळे ग्राहकांना जादा भाव मोजावा लागत नाही. नवीन दागदागिने खरेदी करताना घडणावळ चार्ज हा १० ते २५ टक्क्यांपर्यंत असतो आणि तीन टक्के जीएसटी अदा करावा लागतो.
बाजारातील तज्ज्ञांच्या मते, सध्या जागतिक बाजारात सुरू असलेले टॅरिफ वॉर आणि इतर अनेक घटकांचा परिणाम सोन्याच्या वाढत्या किंमतींवर दिसून येत आहे. रशिया-युक्रेन आणि इस्त्रायल-गाझा पट्टीमध्ये संघर्ष सुरू आहे. त्यामुळे सोन्याच्या सुरक्षित गुंतवणुकीकडे अनेक गुंतवणूकदारांचा ओढा आहे. अमेरिकेत सत्तांतर झाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ आणल्यानंतर जगात एकच खळबळ उडाली. मात्र या निर्णायाला तीन महिने स्थगिती देण्यात आल्यामुळे सोन्याकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढला आहे. देशभरात लवकरच लग्नमुहूर्त सुरू होऊन विवाह सोहळ्यांचा धमाका असेल. त्यामुळे सोन्याच्या दागदागिन्यांची मागणी वाढेल.