Thursday, May 15, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण


मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबई महानगरातील मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरु आहेत. गाळ काढण्याची कामे योग्यरित्या होण्यासह त्यावर देखरेख करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने कंत्राटांमध्ये यंदा अधिक सक्त अटी व शर्तींचा समावेश केला आहे. नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांसाठी प्रशासनाने छायाचित्रण समवेत ३० सेकंदाचे चित्रीकरण (व्हिडिओ) बंधनकारक केले आहे. तर लहान नाल्यांमधून गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण करणे अनिवार्य करण्यात आले आहे.


मुंबई महानगरातील नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे ठरवलेल्या वेळेत पूर्ण करावीत, आवश्यक तेथे अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री नेमून कामांना गती द्यावी, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे कामांची पारदर्शकता आणि गुणवत्ता तपासावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी यंत्रणेला दिले आहेत. आखलेल्या नियोजनानुसार शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे या सर्व विभागांतील नाल्यांमधून गाळ उपसा कामे विहित मुदतीत आणि पारदर्शकरित्या पूर्ण केली जातील, असा विश्वासही महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी व्यक्त केला आहे.


मुंबईत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महानगरपालिका पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या माध्यमातून मोठ्या नाल्यांमधील गाळ काढते, तर लहान नाल्यांमधील गाळ काढण्याची जबाबदारी विभागीय कार्यालयांवर (वॉर्ड) असते. नाल्यांमधून गाळ काढल्याने पावसाळ्यात पाण्याचा निचरा जलद होतो. प्रत्येक वर्षी नाल्यांमधून किती गाळ काढणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करून उद्दिष्ट निश्चित केले जाते.


गाळ उपसा संदर्भात प्राप्त होणाऱ्या सर्व व्हिडिओंचे महानगरपालिका प्रशासनाकडून कृत्रिम बुद्धिमत्ता (ए. आय.) प्रणालीच्या मदतीने विश्लेषण केले जाणार आहे. त्याद्वारे नाल्यातून गाळ उपसा करण्याच्या कामांची योग्य देखरेख करणे, कामांमध्ये संपूर्ण पारदर्शकता राखणे यासाठी प्रशासनाला मदत होणार आहे. तसेच, महानगरपालिकेने नागरिकांसाठी 'https://swd.mcgm.gov.in/wms2025' या संकेतस्थळावर छायाचित्र /व्हिडिओ उपलब्ध करून दिली आहेत. जेणेकरून नागरिकांना त्यांच्या परिसरातील नाल्याच्या स्वच्छतेचे तपशील पाहता येतील.


गाळ काढण्याच्या कामाच्या तीन टप्प्यांत—(१) काम सुरू होण्यापूर्वी, (२) प्रत्यक्ष काम सुरू असताना आणि (३) काम पूर्ण झाल्यानंतर—दिनांक, वेळ, अक्षांश, रेखांश (रिअलटाइम जिओ-टॅग) यासह चित्रफीत आणि छायाचित्रे तयार करून ती संबंधित सॉफ्टवेअरवर अपलोड करणे कंत्राटदारांना अनिवार्य असेल.

Comments
Add Comment