सतीश पाटणकर
नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सैनिक होते. नानासाहेब गोरे हे स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी कार्यकर्ते, लेखक, वक्ते आणि विचारवंत. विधवेशी विवाह करणारे कर्ते सुधारक. ‘नानासाहेब गोरे’या नावाने विशेष परिचित. विद्याभ्यास आणि स्वातंत्र्य लढ्यातील कारावास गणेशपंत ऊर्फ अण्णासाहेब गोरे हे कोकणातील देवगड तालुक्यामधील हिंदळे या गावचे राहणारे. मुंबईला मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर त्यांना शिक्षणखात्यात नोकरी लागली आणि ते पुण्याला आले. पुणे येथील पर्वती मंदिर अस्पृश्यता निवारण सत्याग्रहापासून त्यांनी सार्वजनिक कार्यात भाग घ्यावयास सुरुवात केली. १९३० मध्ये महाराष्ट्र यूथ लीगचे ते चिटणीस झाले. १९३६-३९ मध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे ते सदस्य होते. काँग्रेस समाजवादी पक्षाच्या संस्थापकांपैकी नानासाहेब हे एक होते. थोर समाजवादी नेते ना. ग. गोरे यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. स्वातंत्र्यसंग्राम आणि समाजवादी चळवळ यातील त्यांचे योगदान मोठे होते.
जीवनात आणि साहित्यात विचारांना प्राधान्य देणारा, माणसातल्या विवेकशक्तीवर अढळ श्रद्धा असणारा आणि स्वत:च्या जीवनात बुद्धिप्रामाण्याला सर्वोच्च स्थान देणारा हा समाजवादी विचारवंत कसा घडला, हे त्यांचे शिष्य व सहकारी म्हणून वावरलेले प्रा. ग. प्र. प्रधान यांनी “महाराष्ट्राचे शिल्पकार – ना. ग. गोरे’ या पुस्तकात अतिशय ओघवत्या आणि प्रसन्न शैलीत लिहिले आहे. ना. ग. गोरे एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात जन्मले आणि वाढले. समाजातील जातिव्यवस्थेच्या चौकटी, संकुचित समाजजीवन, रूढी-परंपरेचे वाढत जाणारे प्राबल्य, स्त्रियांची दयनीय अवस्था पाहून हा मुलगा लहानपणापासून अंतर्मुख झाला होता. लोकमान्य टिळक मंडालेहून सुटून आल्यानंतर एस. एम. जोशी, शिरुभाऊ लिमये, खाडिलकर आदी मित्रांसमवेत ते टिळकांचे दर्शन घेण्यासाठी गायकवाड वाड्यात गेले होते. फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना एस. एम. जोशी आणि ना. ग. गोरे जेव्हा फिरावयास जात, तेव्हा या ध्येयवादी तरुणांच्या चर्चेत मातृभूमीचे स्वातंत्र्य हाच विचार डोकावत होता. त्यातून त्यांचे मन कसे तयार होत गेले, याचे मार्मिक चित्रण आहे. १९४८-५३ मध्ये समाजवादी पक्षाचे ते सहचिटणीस होते. पुढे १९५७-६२ मध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीतर्फे प्रजासमाजवादी पक्षाचे ते खासदार होते. याच काळात या पक्षाचे ते सरचिटणीसही होते. १९६४ मध्ये याच पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. १९६७-६८ मध्ये ते पुणे महापालिकेचे महापौर होते. १९७० पासून ते राज्यसभेचे सदस्य होते.
भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत सक्रिय भाग घेऊन नानासाहेबांनी अनेकवार तुरुंगवास भोगला. भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर पोर्तुगीज सत्तेपासून गोवा मुक्त करण्यासाठी १९५५ मध्ये झालेल्या गोवा विमोचन सत्याग्रहाचा त्यांनी प्रारंभ केला. त्याबद्दल त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती; परंतु १९५७ मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. नानासाहेबांनी बरेच लेखनही केले आहे. समाजवादाचा ओनामा (१९३५) हे त्यांचे पहिले पुस्तक. जुन्या हैदराबाद संस्थानातील गुलबर्गा तुरुंगात शिक्षा भोगत असताना फेब्रुवारी ते डिसेंबर १९४२ पर्यंत त्यांनी लिहिलेली दैनंदिनी कारागृहाच्या भिंती या नावाने १९४५ मध्ये प्रसिद्ध झाली. तुरुंगातील भेदक अनुभवांची प्रत्ययकारी चित्रण फीत आढळते. डाली (१९५६) हा त्यांचा ललितनिबंधसंग्रह. शंख आणि शिंपले (१९५७) मध्ये त्यांच्या आठवणी आहेत. सीतेचे पोहे (१९५३) आणि गुलबशी (१९६२) मध्ये त्यांच्या कथा संग्रहित केलेल्या आहेत. आव्हान आणि आवाहन (१९६३), ऐरणीवरील प्रश्न (१९६५) या पुस्तकांत त्यांचे वैचारिक लेख अंतर्भूत आहेत. कालिदासाच्या मेघदूताचा त्यांनी समछंद अनुवाद केला आहे. त्यांनी केलेल्या अन्य अनुवादांपैकी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आत्मचरित्राचा अनुवाद विशेष उल्लेखनीय आहे. बेडूकवाडी (१९५७) आणि चिमुताई घर बांधतात (१९७०) ही त्यांनी लहान मुलांसाठी लिहिलेली पुस्तके. त्यांनी लिहिलेल्या अन्य पुस्तकांत विश्वकुटुंबवाद (कम्यूनिझम) (१९४१) आणि अमेरिकन संघराज्याचा इतिहास (१९५८) यांचा समावेश होता. मुरारीचे साळगाव (१९५४) हे त्यांनी प्रौढ साक्षरांसाठी लिहिलेले पुस्तक.
जनवाणी, रचना, जनता यांसारख्या नियतकालिकांचे त्यांनी संपादन केले. त्यातून, तसेच अन्य इंग्रजी, मराठी आणि हिंदी नियतकालिकांतून त्यांनी लेखन केले आहे. उत्तम वक्ते म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. रेखीव मांडणी, स्पष्ट विचार आणि अभ्यासपूर्ण विवेचन ही त्यांच्या वैचारिक लेखनाची आणि भाषणांची वैशिष्ट्ये. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे.