अर्चना सोंडे
जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले आहे. त्यातील काही जमाती अंदमान बेटावर आहेत. २००४ मध्ये आलेल्या विध्वंसक त्सुनामीने या आदिवासींचा उर्वरित जगाशी संपर्क तुटला होता. अशा परिस्थितीत त्या परिचारिकेने जीवाची पर्वा न करता सेवा शुश्रुषा केली. काहीजणींची बाळंतपणं करत या जगात नव्या जीवांना सुरक्षितपणे आणले. अंदमानच्या दुर्मीळ आदिवासी जमातीसाठी ती आरोग्यदूत ठरली. तिचं नाव शांती तेरेसा लाक्रा होय. २००४ मध्ये, जेव्हा अंदमान किनाऱ्यावर त्सुनामी आली, तेव्हा शांती तेरेसा लाक्रा यांनी लिटिल अंदमानच्या दुर्गम भागात असलेल्या डुगोंग क्रीक येथील उप-केंद्रात परिचारिका म्हणून तीन वर्षे काम केले होते. या भागात भारतातील सर्वांत जुन्या जमातींपैकी एक असलेल्या ओंगे जमातीची वस्ती आहे. या जमाती नेग्रिटो वंशाच्या जमातीचा भाग असल्याचे म्हटले जाते. त्यावेळी १०० पेक्षा कमी संख्येने असलेल्या ओंगेच्या आरोग्यसेवेसाठी लाक्रा यांनी स्वतःला समर्पित केले. या जमातींचा वैद्यकीय इतिहास माहीत नव्हता. त्यांची भाषा कळत नव्हती. अशा अडथळ्यांबद्दल कोणतीही माहिती नसताना शांती यांनी या जमातीच्या वस्त्यांना सातत्याने भेटी दिल्या. त्यांच्याशी मैत्री केली. आरोग्य केंद्रातील वैद्यकीय सुविधांचा लाभ घेण्याविषयीचे महत्त्व त्यांना पटवून दिले.
त्सुनामीने डुगोंग क्रीक येथील संपूर्ण वस्ती वाहून नेली. शांतीला जंगलात मागे हटून एका तात्पुरत्या तंबूत राहावे लागले. बराच काळ बाह्य जगाशी संपर्क नव्हता. वैद्यकीय साहित्य मिळणं देखील अवघड झाले होते. त्सुनामीमुळे विविध आजार पसरले होते. त्यामुळे शांतीला औषधांसाठी धावपळ करावी लागली. ओंगे लोकांसाठी आपत्कालीन औषधे आणण्यासाठी १२-१५ किमी चालत जावे लागले. या सर्व विनाशादरम्यान, एका गर्भवती ओंगी महिलेने फक्त ९०० ग्रॅम वजनाच्या बाळाला जन्म दिला. शांतीला दोघांनाही वाचवावे लागले. त्यांना उबदार ठेवावे लागले. कांगारू मदर केअरचा सराव करावा लागला. संपर्क यंत्रणा सुरू झाल्यावर, तिने पोर्ट ब्लेअरमधील जवळच्या जीबी पंत हॉस्पिटलमधून चार्टर्ड फ्लाइटची विनंती केली. शांतीला त्या आई अन् बाळाच्या जगण्याची फारशी आशा नव्हती; परंतु सहा महिन्यांनंतर, आई आणि बाळ निरोगी परत आले. तिने एका रात्रीत ३-४ बाळंतपणात मदत केली, ती सर्व स्वतःच्या बळावर. शांतीचे खासगी आयुष्यदेखील संघर्षमय होते. ती तिच्या एक वर्षांच्या मुलासोबत आणि तिच्या पतीसोबत राहत होती. तिचा पती दुसऱ्या बेटावर स्वतःचा व्यवसाय करत होता. योग्य पोषण न मिळाल्याने शांती गंभीर कुपोषित होती. तिच्या सासरच्या लोकांनी तिला मदत केली आणि तिच्या बाळाला त्यांच्यासोबत राहण्यासाठी घेऊन गेले.
त्सुनामी ओसरल्यानंतर ती आणखी दोन वर्षे ओंगे लोकांसोबत राहिली. त्या काळात तिला तिच्या कुटुंबाला भेटता आले नाही. जसे ओंगे जमातीचे लोक जंगलात स्थलांतरित झाले, तसतसे तिला अनेकदा तास न तास चालावे लागले. भरतीच्या वेळी समुद्रातून जावे लागले. त्यांना आरोग्यसेवा देण्यासाठी दाट झाडीतून चालावे लागले. २००६ च्या अखेरीस, शांतीला पोर्ट ब्लेअरमधील जीबी पंत रुग्णालयात हलवण्यात आले. ती विशेष वॉर्डमध्ये, आदिवासी आणि दुर्गम भागातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून (पीएचसी) पाठवलेल्या विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांसाठी (पीव्हीटीजी) काम करते. अंदमान आदिम जनजाती विकास समिती (AAJVS) च्या इतर कर्मचाऱ्यांसोबत ती आदिवासींसाठी दिवसरात्र वॉच अँड वॉर्ड ड्युटी म्हणून काम करते. ती रुग्णांची काळजी घेते, त्यांची वैयक्तिक स्वच्छता करते. अन्न आणि कपड्यांची व्यवस्था करते. बेड बनवते. रुग्णांना डॉक्टरांकडे घेऊन जाते. एक्स-रे, ईसीजी, यूएसजी, सीटी स्कॅन आणि एमआरआय सारख्या विविध तपासण्यांसाठी देखील मदत करते.
२०१९ मध्ये अजून एक जागतिक संकट उद्भवले ते म्हणजे कोरोनाचे. कोविड-१९ साथीच्या काळात, शांती आणि तिच्या टीमने विविध आदिवासी वस्त्यांमध्ये प्रवास केला. बहुतेकदा ५-६ तास बोटीतून, उंच लाटांमधून ते जात. त्यांना माहीत नव्हते की ते त्यांच्या छावणीत परत येतील की नाही. मात्र त्या प्रयत्नांमुळे, आदिवासी लोक स्वतःला वेगळे करण्यात यशस्वी झाले होते आणि स्वत:ची चांगली काळजी घेत होते. तथापि, शांतीच्या टीमचे ध्येय त्यांचे लवकर लसीकरण करणे होते. जेणेकरून रोग अधिक पसरू नये. या लोकांना आदर महत्त्वाचा आहे. शांतीला उमगले होते की, त्यांच्या संस्कृतीचा, त्यांच्या श्रद्धेचा आणि जीवनशैलीचा आदर करणे महत्त्वाचे आहे. तिने योग्य त्या चालीरितींचा, श्रद्धांचा आदर केला. परिणामी त्या लोकांचा शांतीप्रती विश्वास वाढला, ते सुद्धा तिचा आदर करू लागले. आता बहुतेक जमाती वैद्यकीय मदत घेण्यास नकार देत नाहीत. महिला नियमितपणे प्रसूतीपूर्व तपासणीसाठी जातात. जन्मलेल्या बाळांच्या वजनातही फरक आहे. पूर्वी बाळांचं वजन २ किलोपेक्षा कमी असे. आता ते सुमारे २.५ ते २.७५ किलो भरते. आरोग्याच्या दृष्टीने ही प्रगती उत्तम मानली जाते.
आरोग्यसेवा शुश्रुषा क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा फ्लोरेन्स नाईटिंगेल हा पुरस्कार शांती तेरेसा लाक्रा यांना बहाल करण्यात आला. भारत सरकारने देखील त्यांच्या आरोग्य क्षेत्रातील योगदानाची दखल घेत पद्मश्रीने सन्मानित केले.
काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. एक तरुण मुलगी शांतीकडे आली. तिने शांतीच्या पायांना स्पर्श केला. त्सुनामीच्या वेळी शांतीने बाळंतपण केलेल्या बाळांपैकी ती एक आहे. त्या मुलीला पाहून शांतीच्या डोळ्यांतून आनंदाश्रू आले. हा क्षण तिच्यासाठी एक मोठा सन्मानच होता.