Monday, June 30, 2025

सदूचा खेळ

सदूचा खेळ

एकनाथ आव्हाड


सदूला फारच कंटाळा आला
काय करावे सुचेना त्याला

खेळण्यातले प्राणी घेऊन बसला
त्याला नवा एक खेळ सुचला

माकडाच्या लग्नाची दवंडी पिटवली
सगळ्या प्राण्यांना आमंत्रणं दिली

गाढवासोबत गाढवीण आली
मंगलाष्टके त्यांनी सुरात गायली

हत्तिणीसोबत हत्ती आला डुलत
लग्नात वरातीचं बसला बोलत

वाघ आला वाघीण आली
लग्नात नाचायला सुरुवात झाली

मांजर आली बोका आला
त्यांचा नुसताच पंगतीकडे डोळा

बोकड आला शेळी आली
नवरीला त्यांनी साडीचोळी दिली

गाय आली बैल आला
नवरदेवाला त्यांनी सदरा दिला

उंटासोबत आली सांडणी
आहेर म्हणून आणली मांडणी

सारेच प्राणी जोडीने आले
लग्नात पोटभर जेवून गेले

संपला खेळ सदू हसला
आई म्हणाली बस अभ्यासाला

काव्यकोडी


१) पावसाच्या तालात
तो मनमुराद नाचे
पिसाऱ्यावरील डोळे त्याचे
हिरवे पुस्तक वाचे

डोक्यावरी तुरा
रंगीत पिसारा
नाव याचे सांगायला
घाई करा जरा?

२) गुटर गू करून
साऱ्यांना बोलवतो
शांतीचा संदेश
चहुकडे देतो

पारवा, कपोतही
म्हणतात याला
सांगा या पक्ष्याचे
नाव काय बोला?

३) त्याच्याकडे आहे
मनुष्यवाणी
अवचित दिसतो
तो आपल्या अंगणी

डाळिंबाचे दाणे
आवडीने खातो
पेरूच्या फोडीसाठी
कोण उडत येतो?

eknathavhad23 @gmail.com
Comments
Add Comment