Sunday, April 20, 2025
Homeसाप्ताहिककोलाजराखी वटवट्या

राखी वटवट्या

डॉ. महालक्ष्मी वानखेडकर

इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे पंख, बारीकशी मजबूत राखाडी काळपट चोच, थोडीशी लांब आणि पातळ शेपटी जिच्या कोपऱ्यावर काळे ठिपके आणि पांढरी किनार, राखाडी तपकिरी पाठ, पंख उघडल्यावर अर्धगोलाकार आकारात असणारे राखाडी पंख, पिवळसर-पांढरे पोट, लाल डोळे आणि लालसर पाय असे एकूण सौंदर्य “राखाडी वटवट्याचे”. नर आणि मादी तसे दिसायला सारखेच त्यामुळे त्यांना ओळखणे कठीण जाते. नैसर्गिक शरीर शास्त्राप्रमाणे यांच्या शरीराचे संतुलन व्हावे म्हणून यांची शेपूट थोडीशी लांबच असते. त्या शेपटीचा उपयोग हवेत झुलण्यासाठी होतो. तार छेडल्यासारखा आवाज त्यांच्या पंखांमधून किंवा शेपटीतून येत असावा असे वैज्ञानिकांचे दुमत आहे. आपल्या चिमणीचा चिवचिवाट हा थांबून थांबून येत असतो; परंतु या वटवट्याचा आवाज सतत न थांबता करत असल्यामुळे खरच वटवट केल्यासारख वाटतं म्हणूनच याचे नाव वटवट्या पडले असावे. हा चालत नाही छोट्या छोट्या उड्या मारतो, सरळ शेपटी आणि त्याच्या तारस्वरामुळे हा लगेच ओळखता येतो. राखी वटवट्या याचे शास्त्रीय नाव प्रीनिया सोशिअ‍ॅलिस. इंग्रजीत Ashy Prinia अ‍ॅशी प्रीनिया. ही जल्पकाद्य पक्षीकुळातील भारतीय उपखंडात आढळणारी पक्ष्यांची प्रजाती आहे. ॲशी प्रीनिया किंवा ॲशी रेन-वॉर्बलर (प्रीनिया सोशलिस) सिस्टिकोलिडे कुटुंबातील एक लहान वार्बलर आहे. भारत, नेपाळ, बांगलादेश, पूर्व पाकिस्तान, भूतान, श्रीलंका आणि पश्चिम म्यानमार या भागांत यांचे वास्तव्य असते. पिवळ्या पोटाचा प्रीनिया संपूर्ण इंडो-गंगा आणि ब्रह्मपुत्रा येथे विशेषत: पाण्याजवळ उंच, ओलसर वनस्पतींमध्ये आढळतो. हा शहरात, बागेत, नदीकिनारी दिसत असून सामाजिक पक्षी आहे. यांच्या अंदाजे २९ जाती आढळतात. हे लहान पक्षी सहसा स्थलांतरित होत नाही.

हे पक्षी प्रामुख्याने कीटक आणि त्यांच्या अळ्या, लहान कोळी खातात, तसेच फुलांचा रस देखील खातात. सरडे, साप, मोठे पक्षी यांचे हे भक्ष्य बनतात. हे एकटे किंवा जोड्यांमध्ये दिसतात. जंगल प्रीनिया आकाराने जवळजवळ बुलबुलसारखी असते आणि प्रजनन काळात मादीचा चेहरा राखाडी रंगाचा आणि बाहेरील शेपटीचे पंख पांढरेशुभ्र आणि जाड चोच जास्त काळपट दिसते. म्हणजेच प्रजनन काळात यांचे रंग गडद होतात. आपल्याप्रमाणे इतर सजीव सृष्टीतील सर्व घटकांमधील मादी ही प्रजनन काळात खूप सुंदर म्हणजेच तिचे रंग गडद व्हायला लागतात. या पक्ष्यांची मला नेहमीच गंमत वाटते यांनी घातलेल्या सादीचे प्रतिउत्तर अतिशय दुरून हलकेच आपल्या कानी पडतात. बऱ्याचदा वाटत असतं काय बोलत असावे हे? हा आवाज सकाळच्या वेळेला खूप येतो. कारण हे तेव्हा आपल्यासारखेच खूप उत्साही असतात आणि सततच्या यांच्या हावभावांवरून मला निरीक्षणाअंतर्गत काही गोष्टी जाणवल्या. पक्षी दिवसभरामध्ये खूप वेगवेगळे आवाज काढतात आणि बोलत असतात. सकाळी उठल्यावर त्यांची प्रार्थना गीत झाल्यानंतर त्यांची एकमेकांना असणारी साद दिवसभराचे प्लॅनिंग करण्यासाठीच असते. म्हणजे अन्न-पाण्याच्या शोधार्थ कुठल्या दिशेने जावे हे ते ठरवतात. पाच वाजेदरम्यान येणारा कलकलाट परत घरी निघण्यासाठी. प्रजनन काळात असणारी साद ही मधुर असून त्यांच्या साथीदारासाठी असणारी एक आकर्षक ओढ जी कधी मिलन करण्यासाठी, तर कधी घरटे दाखवण्यासाठी असते. एकाच वेळेला बरेच वेगवेगळे ध्वनी हे काढतात. वटवट्या एकमेकांना आकर्षित करण्यासाठी चिप-चिप, झिप-झिप असा कर्कश; परंतु चिमणीसारखा न थांबता येणारा आवाज काढतो. हा कर्कश असला तरी मधुर वाटतो. अशी मधुर गाणी गात असताना मान सगळीकडे फिरवत असतो. कदाचित त्याच्या साथीदाराला शोधत असावा. ज्या दिशेने त्याच्या साथीदाराची साद येत असते त्या दिशेला पाहून ते जास्त ओरडताना दिसतात. मादीचे प्रतिउत्तर अतिशय गोड आणि हळुवार आवाजात असते. जेव्हा ते घरटे बांधायला सुरुवात करतात तेव्हा न थांबता ते खूप बोलत असतात आणि सतत मादीला साद घालून सांगत असतात. तसा हा आळशी पण तार स्वरात आवाज करून लक्ष वेधून घेण्यात नंबर एक.

नर आणि मादी मिळून दोन अडीच फुटांवर घरटे बांधतात. पान, गवताची तूस, प्राण्यांचे केस, कोळ्याचे जाळे यांचा उपयोग करून झाडांच्या फांद्यांमध्ये किंवा उंच गवतांमध्ये घरटे बांधले जाते. मोठ्या पानांचा आधार घेऊन छोट्या-छोट्या झुडपांमध्ये अगदी सुगरणीसारखे त्या पानांमध्ये अतिशय सुबक पद्धतीने घरटे गुंफले जाते. सर्व पक्ष्यांची खूपच कमाल वाटते. प्रत्येक पक्षी आपल्या सोयीनुसार आणि स्वतःच्या क्षमतेनुसारच अतिशय नरम, सुंदर नाजूक घरट्याची बांधणी करत असतात. पावसाळ्यानंतर चमकदार, लालसर, तपकिरी रंगाची नाजूकशी दोन ते चार अंडी देते. घरटे झाडांच्या पानांमध्ये लपलेले असले तरी अशा पद्धतीने आजूबाजूची पाने बाजूला सारतात की त्यांना मोकळे आकाश सहज दिसते; परंतु त्यांचे घरटे कोणालाही दिसत नाही. जेव्हा अंड्यातून पिल्लं बाहेर येतात तेव्हा मादी शिकार करून आणते आणि त्यांना खाऊ घालते. नर आणि मादी दोघेही मिळून या पिल्लांचे संगोपन करतात. शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी पिल्ले सतत चोची उघडून अन्नाची वाट पाहत असतात. पौष्टिक कीटकांचा आहार मिळाल्यास ही पिल्लं लवकर सुदृढ होतात. जेव्हा ही पिल्लं उडण्यासाठी सक्षम होतात तेव्हा एक एक जण फांद्यांवर येऊन उभे राहतात. फांद्यांवरच इकडून तिकडे उडत राहतात. आई शिकार करून आणून सुरुवातीला त्यांना भरवते आणि मग ही हळूहळू घरट्याच्या बाहेर राहायला सुरुवात करतात. शारीरिक क्षमता आल्यावर ही पिल्ले उडून जातात म्हणजेच स्वावलंबी होतात.

यांच्या बाबतीत एक गोष्ट घडते ज्याच अत्यंत वाईट वाटतं. काही पक्ष्यांच्या बाबतीत सुद्धा ती होते. परजीवी पक्षी म्हणजे जे स्वतः घरटे बांधत नाहीत दुसऱ्यांच्या घरट्यात आपली अंडी देतात असे काही पक्षी आहेत जसे पावशा पक्षी. हा या राखी वटवट्याच्या घरट्यात आपले अंडे देतो आणि बिचाऱ्या या वटवट्याला ते समजतच नाही. ती आपल्या पिल्लांप्रमाणे त्यांचा सांभाळ करते पण इतर पिल्लांपेक्षा या पावशाचं पिल्लू नक्कीच मोठं दिसत असलं तरी ती अत्यंत प्रेमाने त्याला खाऊ पिऊ घालते. यातूनच या पक्ष्यांमध्ये असणारी ममता, वात्सल्य दिसून येते. हे खरोखर इतरांची खूप काळजी घेतात. सामान्य रीड म्हणून ओळखले जाणारे गवत कुटुंबातील फुलांच्या वनस्पतींची एक प्रजाती आहे. यामध्ये या वटवट्याला घरटे बांधणे आवडते. ज्यापासून अनेक वस्तू बनवल्या जातात. त्यामुळे हे गवत कापण्यापूर्वी जाळले जाते आणि मग त्यामध्येच यांची घरटी, पिल्लं आणि हे पक्षी सर्वकाही नष्ट होते. या साध्या भोळ्या निरागस असणाऱ्या बिचाऱ्यांचे दुर्दैव आणि आपली विध्वंसकता. माझ्या सर्व लेखांमध्ये या निसर्ग घटकांची आपण आपल्या स्वार्थासाठी कशा पद्धतीने विध्वंसकता करतो हे लक्षात येईल. आता ही विध्वंसकता कळत असते की, नकळत असते याचा आपण विचार करावा आणि जमेल तेवढं यांना वाचवण्यासाठी आपणच प्रयत्नशील राहावे. जर प्रत्येकाने हा प्रयत्न केला तरच हे घटक वाचवू शकतो. हे वाचले तरच आपण वाचू हे मनात कोरून ठेवा.
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -