मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मे महिन्यातील ९ तारखेला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ६ तासांसाठी बंद राहणार आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने याबाबत माहिती प्रसिद्ध केली आहे.
धावपट्टीच्या तसेच इतर देखभालीच्या कामामुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील विमान वाहतूक ९ मे २०२५ रोजी सहा तासांसाठी बंद ठेवले जाणार आहे. पावसाळ्याआधी हे काम पूर्ण केले जाणार आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने याबाबत शनिवारी माहिती दिली.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने म्हटले आहे की, ०९/२७ आणि १४/३२ या दोन्ही धावपट्ट्यांवर पावसाळ्याआधी देखभालीचे काम हाती घेतले जाणार आहे. हे काम ९ मे रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत पूर्ण केले जाईल. सर्व भागधारकांना माहिती देण्यासाठी सहा महिन्यांपूर्वीच विमानचालकांना सूचना देण्यात आली. यामुळे सर्व विमान कंपन्यांना त्यांच्या उड्डाणांचे नियोजन करण्यास मदत होईल.