Monday, April 21, 2025

लिंबू लोणचं

पूजा काळे

सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा त्रास परिणामकारक आहे. ऋतूचक्रात झालेले बदल, तापमान वाढ, भयावह पाणीटंचाई, वणव्यांची नैसर्गिक मालिकाच सुरू आहे. यायोगे पावसाचं अनियमित वेळापत्रक‌, सूर्याची वाढती उष्णता, गायब झालेली गुलाबी थंडी याचा संमिश्र परिणाम हवामानावर, पिकांवर आणि आरोग्यावर दिसून येतोय. बदललेल्या हवामानाचा सर्वात जास्त फटका शेतीवर झाल्याने अन्नधान्याच्या कमतरतेसह दैनंदिन जीवन व्यवहाराची सगळी गणित फोल ठरताना दिसत आहेत. त्या त्या ऋतूतल्या भाज्या आणि फळांनी अंग टाकल्याने महागाईचा राक्षस डोक्यावर नाचतोय. वेळेवर न मिळणाऱ्या भाज्या, तर कधी वेळेआधीचं फळ निर्मिती यामुळे फळांच्या गोडी आणि चवीमध्ये तफावत जाणवतेय. एकंदरीत सर्वत्र परिस्थिती सारखी असल्याने, डोक काम करत नाहीए. एकीकडे दैनंदिन व्यवहारासाठी बाहेर पडणं गरजेचं असलं, तर दुसरीकडे रणरणत्या उन्हामुळे घराबाहेर पडणं मुश्किल होतय. अशावेळी काय बरं करावं माणसानं? आमच्यासारख्या गृहिणी घरातल्या घरात थंडावा निर्माण करणारे पदार्थ करण्याकडे वळतात. माझाही तोचं प्रयत्न असतो.

मे महिन्याआधीच मार्च, एप्रिल तापल्याने आमची डोकी तरी शांत राहतील का? थंड वगैरे करण्यासाठीच्या प्रयत्नात थंडा थंडा कूलकूल करत सुगरणींचे हात थकत नाहीत. थंडाई, आवळा, कोवळा, संत्री, मोसंबी, कोकम, कलिंगड, वाळा घरात वेगवेगळ्या प्रकारांची सरबराई चालू असताना सोबत वाळवणीतले पापड, कुरडई यांसारखे पदार्थ म्हणजे वर्षभराच्या बेगमीची बात बनते. या बेगमीवरून मागील कोरोनाचा काळ आठवला. आपलं जगणं मुश्किल करणाऱ्या या महामारीने नाड्या आवळल्या होत्या आपल्या. अन्न, वस्त्र, निवारा यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टीं मिळणं कठीण होतं. गृहिणींवर कामाचा अतिरिक्त भार, जोडीला चोवीस तास काम आणि आराम हराम अशी गत होती. पण त्यातही आपल्या गृहिणी हुशारचं म्हणायला हव्यात..! जमेल तेवढी बचत करत सगळ्यांची भूक आणि क्षृधा भागवणाऱ्या गृहिणींच खरे तर कौतुक व्हायला हवं. अशीचं एक गृहिणी म्हणजे मी ! म्हणजे काय? तेच तर सांगायचा प्रयत्न करतेय केव्हापासून… तर लिंब आणण्यासाठी यांना बाजारात पाठवलं असता, वीस रुपयाला दोन लिंब घेऊन आले हे…मी अवाक् झाले. महागाई, महागाई म्हणजे काय…! आताशा तोंडचं पाणी पळवलेल्या काही लिंबांनी आमचा त्यावेळचा कोरोना काळ सुखावह केला होता. त्या विषयीची एक रुद्र आठवण अजूनही मन लिंबोरं करून जाते. त्याचं असं झालं की…

नैसर्गिक देणगीसह मनाची श्रीमंती लाभलेले सारस्वत म्हणजे गोव्याचं समृद्ध साम्राज्य. मंडळी कथा गुंफत जाते गोव्याभोवती आणि हाती गवसतं लिंबू लोणचं ऐकायला थोडं अवघड आणि विचित्र वाटत असेल ना…! पण कथानकाची सुरुवातचं भल्या मोठ्या लिंबांनी होते. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात शांतादुर्गा, मल्लिकार्जुन जत्रेसाठी गोव्याला जाणं व्हायचं तसं ते त्या वर्षीही झालं होतं. फिरण्याचा भाग म्हणून देवळं, समुद्रकिनारे बघून झाले होते. मुंबईत येण्याच्या दोन दिवसाआधी पैंगिणच्या मोठ्या नणंदबाईंकडे गेलो होतो. त्यावेळी ताईंनी भेट स्वरूपात अननस, नारळ, पेरू कढीपत्त्याची पानं माझ्या पिशवीत भरली; परंतु कायम स्मरणात राहील अशी प्रेमस्वरूप भेटही दिली, म्हणजे निघताना ताईंनी दोन डझन लिंब…! अहो लिंब कसली प्रथम दर्शनी इडलिंबू वाटणारी, बाहेरून पिवळी, तर आतून केशरी रंगाची बाँन्साय जातीची भारतीय लिंब माझ्या ओंजळीत टाकली. पातळ सालीची ओंजळीत न मावणारी लिंब मनात भरली. या लिंबांच करायचं काय? हा प्रश्न नव्हता! मार्च-एप्रिल महिन्याचा उकाडा जाणवत असला तरी, शरीराचा दाह लिंबू सरबताने शमणारा नव्हता. म्हणजे केवळ सरबतासाठी ती वापरण्याचा वेडेपणा मी टाळणार होते… अग् काय एवढं गोळा करते आहेस, अहोंनी नेहमीप्रमाणे फटकारलं, माझा मेलीचा मोह सुटत नव्हता, शिवाय एवढी भलीमोठी, पातळ सालीची लिंब घरच्यांना दाखवायची हौस होतीच… यांच काहीही न ऐकता ताईंनी दिलेली भेट घेऊन आम्ही मुंबई गाठली. सोबत आणलेली लिंब एका अर्थाने पथ्यावरचं पडली होती.

लॉकडाऊन सुरू होण्याचा काळ तो. मुंबईत सर्वत्र रोगाचा संसर्ग वेगाने पसरत चाललेला. बाहेर पडायचं म्हणजे रोगाला निमंत्रण होतं. कोरोनाच्या पुढच्या टप्प्यात पैसा, घरसामान सगळ्याला आळा बसणार होता. जमेल तेवढी काटकसर करून महिला जेरीस येणार होत्या, तर कुटुंब वेठीस पडणार होत. त्याकाळी इतर गृहिणींसारखीचं माझ्यावरची जबाबदारी सुद्धा वाढली होती. सहा जणांचा घरपसारा सांभाळायचा म्हणजे जंग की लढाईचं म्हणा ना…! कधी आल्याचा अर्धा तुकडा जपून वापरला, तर कधी लसूण पाकळी कष्टाने जोपासली. कोथिंबिरीची एक काडी, भाज्यांचे देठ कसोशीने हाताळले. पाव चमचा तेलाच्या फोडणीत दोन वेळची आमटी रटरटवली. कमी साखरेचा बीन दुधाचा चहा रिचवला. भयंकर काटकसर केली. फक्कड बेत आखले. कौटुंबिक जेवणाचा आस्वाद सगळ्यांनी अनुभवला. त्यावेळच्या अखिल महिला वर्गाची अवस्था अगदी माझ्यासारखी होती. या पुढचं कथानक असं…… तर त्याचं असं झाल…! या गडबडीत मी लिंब विसरलेचं होते. म्हणजे पुरवून पुरवून वापरताना उरलेली पंधरा लिंब फ्रिजमध्ये शिल्लक होती. मग काय विचारता ती फुकट जाऊ नये म्हणून केला आटापिटा. लागले कामाला. लिंब जास्तचं पिकून रस सोडू लागली होती. डबा उघडताचं घमघमीत सुवास पसरला होता. लिंब स्वच्छ धुतली, पुसली आणि सालासकट लावली मिक्सरला. वरून मीठ, लाल तिखट, साखर घालून काढली तीची वरात… मिक्सरमध्ये अशी गरागरा फिरवली की बास्… झाली एकजीव आणि पुढील तीन महिन्यांसाठी माझा जीव लिंबासारखा केशरी होऊन भांड्यात पडला. घम्म केशरी रंगाचं लोणचं तयार झालं होतं.

गरगरीत, आंबट, तिखट, तुरट, मधाळ लिंब लोणचं हौशेने खाल्लं आणि सगळ्यांना खाऊ घातलं हे विशेष. एक किलो बरणीला आलेला प्रोफेशनल टच विचारूचं नका…! सासूबाई तर कौतुक करत सुटल्या होत्या, माझ्यासह लोणच्याचं. इथं सांगायचं एवढचं की, पडत्या काळात माणसाला माणसं भेटू शकली नव्हती तरी, निसर्गाने नेहमीच्या सेवावृत्तीनं त्याच्या ठायी असलेलं उदारपण निभावलं होतं. एक कोपरा लोणच्याचा भरल्या ताटाची शान वाढवतो हे खरं आहे. कारण हे लिंबू लोणचं ताटात तोंडी लावायला म्हणून, तीन महिने सोबत करत होतं आम्हाला. जीवाचं रान करून काटकसरतीच्या जोडीला विसावलेलं लिंबू लोणचं कायम स्मरणात राहील. आजच्या घडीला महागाईचा भस्मासूर वाढतोय. संकट काय घेऊन येतील? कुणाची सोबत घडवतील? कुणाला दूर लोटतील? कोण उपयोगाला येईल? काही सांगता यायचं नाही. कोरोना काळात सोबत करणारी लिंब आजच्या घडीला ऐन मार्च, एप्रिल महिन्यात महाग झाली असली तरी, अस्सल खवय्येगिरी करणाऱ्यांना काही फरक पडणार नाही. कारण कितीही नैसर्गिक आपत्ती महामारी वा तुटवडा आला तरी मनुष्याकडे कुशाग्र बुद्धी नावाची चावी असल्याने ती कुठे आणि कशी वापरता येऊ शकते, हे तो चांगलंच जाणतो. लिंब महाग झाली म्हणून काय झालं? जोवर आमच्याकडे पर्याय आहेत तोवर आम्ही सुखाने संसार करू. आनंदाने ताट भरू. कारण काटकसरीत सुखाचा संसार करायचं सामर्थ्य अशा प्रकारची लोणचीचं देतात हे समजायला घरची सुगरण हुशार असावी लागते, अगदी माझ्यासारखी…!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -