कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना म्हणाले, ‘हे पैसे कन्नड भाषेच्या संवर्धनासाठी वापरावेत. त्यामुळे आमचे साहित्य वाचणारा वाचक तरी शिल्लक राहील, वाचक शिल्लक राहिला, तर पुस्तके लिहिली जातील, ग्रंथालये टिकतील.’ काही वर्षांपूर्वी प्रत्येकाच्या घरी दोन वृत्तपत्रे, साप्ताहिक, महिन्याचे मराठी मासिक, ग्रंथालयातील एखादे पुस्तक हॉलमध्ये असे. त्यांची शेजारच्या बरोबर देवघेव करतांना चर्चाही होत होती. वृत्तपत्रांच्या वाचनीय पुरवण्यांमुळे इतर वाचन आणि कोरोनानंतर रोजचे वृत्तपत्रही बंद झाले. पुस्तकांचे कपाट घराची शोभा वाढवीत असे. आज ती जागा गॅझेटने घेतली आहे. ही परिस्थिती दूर करण्यासाठी स्वतःलाच विचारा, ‘तुम्ही वाचक आहात का?’ वाचनाचा आनंद वाढविण्यासाठी, आयुष्यभर शिकण्यासाठी, विविध विषयावरची पुस्तकांची व्याप्ती ओळखण्यासाठी, जीवनांत साहित्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी, अनेक पिढ्यांचा भूतकाळ आणि भविष्यकाळातील दुवा, संस्कृती साधण्याचा पुस्तक हा एक पूल आहे. २३ एप्रिल हा जागतिक साहित्यातील एक प्रतीकात्मक दिवस. २३ एप्रिल हा जगप्रसिद्ध साहित्यिक विल्यम शेक्सपियर यांचा जन्म आणि मृत्यू दिवस होय. त्यांच्याबरोबर मिगुएल डी सर्वेट्स आणि इंका गार्सिलासो अशा काही प्रथितयश लेखकांचेही त्याच तारखेला निधन झाले होते. स्वाभाविकपणे त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी, नागरिकांना वाचनाची आवड लागावी, वाढावी. तसेच कॉपी राईटलाही प्रोत्साहन मिळावे यासाठी २३ एप्रिल हा “जागतिक पुस्तक आणि कॉपी राईट दिवस’’ म्हणून जगात १०० च्या वर देशांत साजरा करतात. कॉपी राईटचा अर्थ कामावर असलेल्या मूळ लेख किंवा तत्सम वस्तूचे संरक्षण करणे. निःसंशयपणे या दिवशी वाचकांसहित लेखक, प्रकाशक, शिक्षक ग्रंथपाल, मास मीडिया सारे एकत्र येतात. साऱ्यांना व्यासपीठ मिळते.
२३ एप्रिल १९९५ पासून हा जा. पु. दिवस युनेस्कोकडून साजरा केला जातो. १९२२ साली बार्सिलोना येथे प्रसिद्ध लेखक मिगुएल डी सर्वेट्स यांचा सन्मान करण्यासाठी आणि पुस्तकाची विक्री वाढविण्यासाठी व्हिंसेंट क्लेव्हल यांनी जा. पु. दिनाची प्रथम कल्पना मांडली होती. २००१ पासून युनेस्को एका वर्षासाठी पुस्तक उद्योग क्षेत्रातील सल्लागार समितीसह एका राजधानीची निवड करते. २००३ साली हा सन्मान भारताला मिळाला होता. “वाचन संस्कृती वाढवा” या थीमसाठी भारताने नवी दिल्ली येथे पुस्तकासाठी वर्षभर कायमस्वरूपी मंडप बांधला होता. युनेस्कोच्या मते तरुण पिढींना शिक्षित करण्यासाठी जा. पु. दिन हे अविश्वसनीय साधन आहे.” ब्राझीलमधील ‘रिओ दि जानेरोला’ ही २०२५ ची जा. पु. दिवसाची राजधानी असून “तुमच्या पद्धतीने वाचा”. ही थीम पुस्तक निवडीला स्वातंत्र्य देते. वाचनाची गोडी लागावी हाच प्रधान हेतू होय. वाचन ही एक शक्ती आहे. ती आपल्याला अडीअडचणीला, एकटे असतांना, करिअर निवडताना सक्षम बनविते. जगभरातील अनेकांच्या आत्मचरित्रातून त्याचा प्रवास समजतो. जग समजून घेण्यास मदत होते. आपल्या आयुष्यात नव्याने खिडकी उघडते. पुस्तक प्रश्नांकडे कसे पाहायचे हा दृष्टिकोन देते. म्हणून वाचाल तर वाचाल. आंबेडकर म्हणाले होते, ‘समृद्ध व्हायचे असेल, मुख्य प्रवाहात यायचे असेल तर वाचनाला पर्याय नाही. डॉ. कलाम म्हणतात, १०० मित्रांची जागा एक पुस्तक घेतो. स्वामी विवेकानंदानाही वाचनाचे प्रचंड भोक्ते होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष विल्सन यांनी वयाची २१ वर्षे पूर्ण होण्याआधी १००० ग्रंथांचे वाचन केले होते. जो अवांतर वाचन करतो, तोच शिकतो आणि पुढे जातो.
महाराष्ट्रातील ‘भिलार’ हे भारतातील पहिले पुस्तकांचे गाव आहे. ३५००० हून अधिक पुस्तके मोफत वाचायला मिळतात. मुंबईतही एशियाटिकसारख्या काही ग्रंथालयांत पुस्तकांच्या सहवासात पुस्तक वाचता येते. सुट्टीत महाभारत, रामायण, पंचतंत्र ही पुस्तके वाचून नीतीमूल्य जाणून घ्यावीत. सुधा मूर्ती, लांजेकर अशा अनेकांनी गावात ग्रंथालये उभी केली आहेत. अक्षर मंचाचे डॉ. योगेश जोशी वाचन संस्कृती, भाषेचा विकास वाढविण्यासाठी अनेक उपक्रम राबवितात. नुकताच ३६ तासांचा वाचनयज्ञ केला होता. भारतातील ग्रंथालयाचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन आहेत. ग्रंथालयात नियमितपणे येणारा एक विद्यार्थी १० वीला नापास झाल्यावर सारे म्हणाले एक वर्षे फुकट गेले; परंतु ग्रंथपालाने नियमितपणे वाचायला दिलेल्या पुस्तकांमुळे पुढे तो मोठा अधिकारी झाला. आपल्या शाळेतील ग्रंथालयातील पुस्तकांची आपल्या मुलाला ओळख व्हावी, या सुप्त हेतूने बापूसाहेब रेग्यांनी (बालमोहन) त्याला ग्रंथालय लावायला सांगितले होते. रात्री झोपण्याच्या आधी प्रेरणादायी असे वाचावे. झोपेत तेच पाहतो. वाचनाची मुलांना सवय लागण्यासाठी सुरुवातीला पालकांनी मुलांना पुस्तकांच्या ठिकाणी नेले पाहिजे. गोष्टी वाचून दाखवणे. मॉलमध्येही खरेदीनंतर पुस्तक दालनात भेट द्या. घरात मुलांच्या आवडीच्या विषयांची पुस्तके पसरलेली असावीत. हा पसारा नव्हे.
यावर्षी मराठी भाषादिनानिमित्त मनसेतर्फे शिवाजी पार्क येथे १०५ प्रकाशकांच्या पुस्तकांचे भव्य प्रदर्शन भरले होते. तेथील अनुभव-एका मुलाने पुस्तक मागितल्यावर तुला मराठी कळणार नाही म्हणून पुस्तक घेतले नाही. जर पालकांनी वाचून त्याला सारांश सांगितला असता तर … हॉटेल, चित्रपट, पूजाऱ्याच्या थाळीत पैसे ठेवायला लोकांचा हात लगेच खिशांत जातो; परंतु पुस्तक घेताना किंमत बघताच, पुस्तक खाली ठेवले जाते. कॉलेजच्या अभ्यासाची पुस्तके आणण्यासाठी दिलेल्या पैशातून मुलगा वाचनासाठी पुस्तके घेऊन घरी आला, वडिलांनी स्वागत केले. अमृत देशमुखला १० वीला असताना भावाने ‘रिच डॅड पुअर डॅड’ हे पुस्तक दिले. या पुस्तकाने वाचनाची आवड निर्माण झाली. आज दिवसाला रोज एक पुस्तक वाचतो. जास्तीतजास्त लोकांनी पुस्तके वाचावीत यासाठी ‘मेक इंडिया रीड’ हे अँप सुरू केले आहे. ‘द हॅबिट आॅफ विनिंग’, ‘चिकन सूप फाॅर सोल” या मालिकेतील पुस्तके, शिवखेरा, द सेव्हन हॅबीट…पॉपिलॉन, द काइट रनर, लुईस-अनिता यांचे पंचतंत्र आणि लिडरशीप… अशी अनेक मराठीत अनुवादीत केलेली पुस्तके आहेत. या पुस्तकांमुळे त्यांची लोकसंस्कृती, लोकजीवन, सण उत्सव, विज्ञान, अध्यात्म हे सारे समजते.
शाळा कॉलेजात अनेक उपक्रमांतून मुलांची वाचनाची गोडी वाढवू शकतो. पुस्तकाचे जाहीर वाचन, चर्चा, प्रश्न मंजुषा, पुस्तक परीक्षण, कथाकथन, गोष्ट वाचून दाखवा. साहित्यावर आधारित प्रश्नपत्रिका, नाट्य वाचन, कथेच्या थीमवर वेशभूषा, पुस्तक भिशी… त्यातून सर्वांना एकत्र बोलावून ज्ञानाचे वातावरण तयार करता येते. अनुवादित पुस्तकांमुळे इतर प्रांतीय पुस्तकांचा आस्वाद घेता येतो. अनुवाद करणे हेही एक कौशल्य आहे. वृत्तपत्रात दर आठवड्याला नवीन पुस्तकांचे परीक्षण येते. वर्षअखेरीस प्रथितयश लोक यावर्षी वाचलेली, आवडलेली पुस्तकांची नावे सांगतात. ज्ञानपीठ विजेती पुस्तके वाचा.
आज वाचनाची माध्यमे बदलली. मुले पुस्तक वाचत नाहीत हा सूर ऐकतो; परंतु ऑनलाईन, इ-बुक, यूट्यूबवरील भाषणे, प्रकाशन समारंभ, ऑडिओ, पॉडकास्टमधून युवक केव्हाही, कुठेही ऐकतो. आजच्या मुलांना अंातर्देशीय गाणी, कविता, लेखक त्यांची पुस्तके माहीत आहे. सोशल साईटवर ते वाचतात. जगात काय चाललंय येथे लक्ष ठेवून आहेत. त्यांचे विषय वेगळे. थोडक्यात वाचन कोणतेही असो, वाचनाची सवय लागणे गरजेचे आहे.
१५ ऑक्टोबरला डॉ. कलाम स्मृती दिनानिमित पुस्तक प्रेरणा दिन आपण साजरा करतो. मे महिन्यात घरातल्या शाळेत आपली मूल्यांवर आधारित जुनी पुस्तके, रामायण, महाभारत, बिरबल, पंचतंत्र, इसापनीती, किशोर हीही वाचायला द्यावीत.
पुस्तके आपल्याला दिशा दाखवतात, जीवनाला अर्थ प्राप्त करून देतात. पुस्तकाचे जगच विलक्षण आहे. शांतपणे, निवांतपणे कुणालाही त्रास न देता आपण आनंद घेतो.
mbk1801@gmail.com
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…