राजश्री वटे
मानवी जीवनात महत्त्वाची भूमिका असते पुस्तकाची… म्हणतात ना “वाचाल तर वाचाल’’… लहानपणापासून ते डोळे शाबूत आहेत तोपर्यंत यांची सोबत लाभते. एकटं असो, सगळ्यांमध्ये असो, प्रवासात असो… घरात, अंगणात, पायरीवर, गच्चीवर, बगीच्यात, जिथे तिथे अगदी सगळीकडे याची कंपनी हवीहवीशी वाटते… फक्त आतील पांढऱ्या कागदावरील काळ्या अक्षरांशी मैत्री झाली पाहिजे. ही मैत्री… या मैत्रीचं वेड तुम्हाला कायम सोबत करते. आयुष्यातील कुठल्याही वळणावर एकटं पडू देत नाही. मार्गदर्शन करतं, समुपदेशन करतं… कुठल्याही कठीण मनस्थितीत आधार देतात पुस्तकं!! पुस्तकं वाचतो, वाचत जातो, समजत जातं, त्यांचा लळा लागतो व त्यांच्या प्रेमात पडतो… इतकं की रोज एक पुस्तक तरी वाचलंच पाहिजे… असं स्वतःच स्वतःला एक बंधन घातलं जातं… हा आग्रह नसतो ही आवड असते… एक हुरहूर असते… असं मनासारखं घडलं की जीव सुखावतो वाचकांचा … ज्याला हे वेड असतं ना त्यालाच हे सुख कळतं बरं!! दोन वाचनवेडे भेटले की, विषयाला अंत नसतो… कुठून कुठे फिरवून आणतं… पुस्तकं सगळ्या भाषांवर प्रेम करतं व वाचणाऱ्यालाही प्रेम करायला शिकवतं… नाही नाही भाग पाडतं… पण जी भाषा किंवा मातृभाषा मनावर, हृदयावर खोल झिरपत जाते त्याच शब्दाचं… त्याच पुस्तकांचं आकर्षण वाढतं व वाचनाचा नाद लागतो.
व्यक्तिमत्त्व विकासाची मूळ सुरुवातच वाचन आणि निरीक्षण याने होते व एक सकारात्मक व्यक्तिमत्त्व घडत जातं! पहिल्या चहाच्या घोटाबरोबर एक आवडीचं पुस्तक हातात म्हणजे… क्या बात है… दिन बन जाता है!! दुपारी लोळता लोळता वाचताना कधी कधी जी झपकी येते ना ती कुशीत पुस्तक घेऊन किंवा पुस्तकाच्या कुशीत शिरून… ब्रम्हानंदी लागते टाळी… सुख म्हणजे हेच ना!! अरे… वाचणारे पुस्तकांचे इतके चाहते असतात की घरात सामानापेक्षा पुस्तकांनीच जागा काबीज केली असते… ही त्या वाचनवेड्याची संपत्ती असते, हे ऐश्वर्य जपण्याचा आनंद तो उपभोगत असतो… हाच सुखी माणसाचा सदरा!! काही वाचणारे महाभाग, तर असे असतात की दोन दिवसांत एक पुस्तक झालंच पाहिजे असा नियम स्वतःलाच घालून घेतात… मग मोबाईल सुद्धा बाजूला सारतात… अशा पुस्तक वेड्यांना खरंच मनापासून नमस्कार! काही वाचक वर्षाला शंभर असाही रेकॉर्ड करतात… खरंच असे वाचक मनापासून पुस्तक जगतात. पुस्तकांनाही अशा वाचकांची सवय होऊन जाते… अरे एक दिवस जरी पुस्तकाच्या कपाटाकडे वाचक फिरकला नाहीतर रुसूनही बसतात म्हणे ते (कविकल्पना) मग जरा गोंजारलं तर खूष होतात ते!
खूप अस्वस्थ असाल, काही सुचत नसेल, एकटं एकटं वाटत असेल किंवा एकटं रहावंसं वाटत असेल, तर अशावेळी फक्त पुस्तकाची सोबत घ्यावी व तेच योग्य सोबतीची गरज पूर्ण करतं! पुस्तकातील शब्दच नव्हे तर, त्याचे मुखपृष्ठ देखील कधीकधी इतकं बोलकं असतं की ते वाचकांशी संवाद साधतं… विचार करायला लावतं व ते विचार कुठल्या कुठे फिरवून आणतात. तसेच लेखकांशीही वाचक मनानी जोडल्या जातो, त्यांच्यात एक अदृश्य धागा जोडला जातो… कधीकधी एखाद्या लेखकाच्या पुस्तकाच्या प्रेमात वाचक असतो की कुठल्याही पुस्तक प्रदर्शनात त्याची नजर फक्त तोच लेखक शोधत असतो. इतका त्या लेखकांच्या पुस्तकाचे गारुड त्याच्या मनावर झालेलं असतं. पण खरी वास्तवता ही आहे की, हातात पुस्तक अगदी हृदयाच्या जवळ धरून वाचणारी पिढी जवळ जवळ संपुष्टात येते आहे… कारण सगळं आता त्या तीन-चार इंचाच्या डबीत समावलं आहे… पण त्यावर फक्त वाचन होतं… संवाद घडत नाही हे नक्की… पटतंय ना!! पुस्तक आणि मस्तक हे एकमेकांना पूरक आहेत. पुस्तकातून जे मस्तकात… व मस्तकातून जे हृदयात उतरतं ते खरं रसायन!! मग… वाचताय ना… वाचलंच पाहिजे!!!