पूनम राणे
अधिकाराची खुर्ची आपल्याला ईश्वरी कृपेने मिळते. त्या खुर्चीला शोभा कशी आणायची, हे आपल्या हातात असते. कारण मोठं पद मिळणं महत्त्वाचं नसतं. पण पदाला मोठं करणं, हे फार महत्त्वाचं असतं. अशाच आपल्या पदाला आपल्या कर्तृत्वाने मोठं करणाऱ्या स्वर्गवासी नीलाताई सत्यनारायण, यांची ही कथा. बाबा… बाबा … ‘‘ताई गोरीपान”… आणि मी मात्र सावळी का…? असं म्हणून उदास चेहरा करून बसली असता, वडिलांनी तिला जवळ घेतलं आणि म्हणाले, ‘‘हे बघ, ती रूपसुंदर आहे आणि तू गुणसुंदर.” लक्षात ठेव… गुणसुंदर, माणसं जगात हवीहवीशी वाटतात. मग नीलाताईंनी मागे वळून पाहिलंच नाही. त्यांनी आपल्या कर्तुत्वाने गुणसुंदर व्हायचे ठरवले. वडिलांना आयएएस व्हायचे होते; परंतु त्यांना ते शक्य झाले नाही. ते पोलीस सेवेत होते. पोलीस खात्यात राहूनही संत वृत्तीचा अधिकारी अशी त्यांची ख्याती होती. कारण त्यांची बैठक अध्यात्माची होती. भारतीय संस्कृतीची बाळगुटी त्यांनी मुलांना लहानपणीच पाजली होती. अर्थात, मुलांना वाढवताना त्यांनी संस्कार दिले. मुलींना वाढविताना मुलांसारखे वाढविले.वडील पोलीस दलात असल्यामुळे त्यांच्या सतत बदल्या होत असत. त्यामुळे नीलाताईचे शिक्षण वडिलांच्या बदलीच्या निमित्ताने मुंबई, पुणे, नाशिक, दिल्ली अशा वेगवेगळ्या ठिकाणी झाले. त्या अत्यंत हुशार विद्यार्थिनी होत्या. बीए आणि एमए परीक्षांमध्ये विद्यापीठात त्यांनी मानांकन मिळविले. वडिलांची आयएएस होण्याची इच्छा त्यांनी पूर्ण केली. कोणतीही आव्हानात्मक जबाबदारी स्वीकारणे हे त्यांचे खास वैशिष्ट्य होते आणि ती जबाबदारी त्या जिद्द, चिकाटीने, मेहनतीने पार पाडत असत.
आयएएस झाल्यानंतरही अनेक मानाची पदे त्यांनी भूषवली. उपजिल्हाधिकारी, मंत्रालयातील समाज कल्याण, सांस्कृतिक, शिक्षण, नगर विकास, आरोग्य, महसूल, वन विभाग अशा विविध विभागांच्या सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. सचिव पदावर काम करत असताना अहंकाराचा स्पर्श त्यांना केव्हाच झाला नाही. खेड्यापाड्यांतून अडचणी घेऊन येणाऱ्या माणसांचे प्रश्न त्या सहज सोडवत असत. प्रशासक म्हणून काम करत असताना जनतेचे प्रश्न सोडवणे, हे आपले प्रथम कर्तव्य आहे. याचे भान त्यांनी कायम ठेवले.
श्री व्यंकट सत्यनारायण यांच्याबरोबर वयाच्या २३ व्या वर्षी नीलाताईंचा विवाह झाला. दोन अपत्यांना त्यांनी जन्म दिला; परंतु दैवाने त्यांच्यासमोर एक आव्हान उभे केले. मुलगी हुशार, पण मुलगा मात्र मतिमंद निघाला. मंत्रालयातील एक कार्य तत्पर सचिव म्हणून पूर्णवेळ सेवा करताना आणि विशेष मुलांचा सांभाळ करताना त्यांची त्रेधातिरपीट उडत असे; परंतु आयुष्याची लढाई त्यांनी रडून नाही, तर लढून जिंकली आणि आपले आईपण सदैव जपले. एक पूर्ण-अपूर्ण नावाचे पुस्तक विशेष मुलांच्या, पालकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांनी लिहिले. त्यात त्या लिहितात, ‘‘परमेश्वर जेव्हा आपल्याला एखादी अडचण देतो, तेव्हा त्या अडचणींसोबत एक भेटवस्तू सुद्धा पाठवत असतो. ती भेटवस्तू म्हणजे त्यातून मिळणारा अनुभव.” हे पुस्तक वाचून त्यांना भेटण्याचे ठरवले. तो योगही माझ्या व माझ्या विद्यार्थिनींच्या आयुष्यात आला. त्यांची मुलाखत घेण्याचं भाग्य आम्हाला लाभले. निवृत्तीनंतर सरकारने त्यांना अत्यंत महत्त्वाची जबाबदारी दिली. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्त या पदावर त्यांची नियुक्ती केली. ही जबाबदारी पाच वर्षे त्यांनी सांभाळली. त्या म्हणत, प्रशासकीय सेवा ही रोजी-रोटीची असते; परंतु संगीत, साहित्य आणि कुटुंबातील प्रेम हा आपला आत्मा असतो. त्या साहित्यिका होत्या. अनेक चित्रपट, गीते त्यांनी लिहिली. त्याचबरोबर मातीची मने, अग्निपुष्प आषाढ, आकाश पेलताना… अशी साहित्य निर्मिती केली.