Friday, October 24, 2025
Happy Diwali

Beed : बीडचा पाणी प्रश्न सोडवणार, गहिनीनाथ गडाला तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Beed : बीडचा पाणी प्रश्न सोडवणार, गहिनीनाथ गडाला तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करुन पर्यटनाला चालना देण्याचे आश्वासन दिले. ते बीड जिल्ह्यातील गहिनीनाथ गडावर नारळी सप्ताह सांगता सोहळ्यात बोलत होते. याप्रसंगी मंचावर मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस हे मंचावर उपस्थित होते.
नव्या वर्षात आमदार सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावर काही आरोप केले. यानंतर नाराजी व्यक्त करत धस यांची राष्ट्रीय नेत्यांकडे तक्रार करणार असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर बीडमध्ये गहिनीनाथ गडावर नारळी सप्ताह सांगता सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस हे एकाच मंचावर दिसले.
पंकजा मुंडे आणि विठ्ठल महाराज यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना गहिनीनाथ गड दत्तक घेण्याचे तसेच गडावर लोकांसाठी पुरेश्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देताना मुख्यमंत्री म्हणाले की, गड दत्तक घ्यायची माझी ऐपत नाही. पण गहिनीनाथ गडाने मला दत्तक घ्यावे. आपण सर्व मिळून गहिनीनाथ गडावर भाविकांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा निर्माण करू. गडाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी काम करू.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिले. बीड जिल्ह्यातील पुढच्या पिढीला दुष्काळ बघू देणार नाही. बीड जिल्हाला पाणीदार करणार. आष्टी तालुक्यापर्यंत पाणी आणले आहे. आता पुढे संपूर्ण बीड जिल्ह्यात पाण्याची सोय करण्यावर भर देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. बीड जिल्ह्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी ५३ टीएमसी पाणी गोदावरीमध्ये आणण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. कृष्णा कोयनेचे पाणी गोदावरीपर्यंत आणणार. लवकरच किमान तीस टीएमसी पाण्याचे नियोजन करणार. पाण्यासाठी दोन जिल्ह्यांमध्ये संघर्ष होऊ नये याची खबरदारी घेणार. मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळवून देणार; असेही मुख्यमंत्री म्हणाले.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >