मुंबई : मुंबईची पहिली जीवनवाहिनी रेल्वे आणि दुसरी जीवनवाहिनी बेस्ट उपक्रमाची बस सेवा आहे. मुंबईत नोकरी ,व्यवसाय, शिक्षण तसेच वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने हजारो नागरिक दररोज बसने प्रवास करतात. रेल्वे एकाच वेळी काही हजार लोकांना घेऊन प्रवास करत असते. त्या तुलनेत बेस्टच्या बस एकावेळी साधारण ५० ते १०० जणांना घेऊनच प्रवास करू शकतात. रेल्वे फक्त रुळांवरच धावते. तर बेस्टच्या बस मुंबईच्या कानाकोपऱ्यात फिरत असतात. यामुळे बसने अनेकजण प्रवास करतात. पण एवढी महत्त्वाची असलेली ही बेस्ट उपक्रमाची बस सेवा मागील काही वर्षांपासून आजारी आहे.
बेस्ट उपक्रमाच्या बसचा कधी अपघात होतो तर कधी आगीत ‘बेस्ट बसचा जीव गुदरमतो. याचं कारण म्हणजे योग्य पद्धतीने देखभाल-दुरुस्ती न करणे; असे वाहतूक तज्ज्ञ सांगतात.
Central Railway Platform Ticket : मध्य रेल्वेकडून फलाट तिकीट विक्रीवर १५ मेपर्यंत निर्बंध!
बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील स्वमालकीच्या बसगाड्यांची संख्या कमी झाली असून, कंत्राटी पद्धतीने चालवण्यात येणाऱ्या बसगाड्यांची संख्या वाढत आहे. ताफ्यातील एकूण बसच्या तुलनेत सुमारे ७३ टक्के बसगाड्या कंत्राटदारांच्या आहेत. परंतु, यापैकी बहुसंख्य बसगाड्या नादुरूस्त असून, योग्य पद्धतीने देखभाल-दुरुस्ती होत नसल्याने त्या सतत बिघडत आहेत. त्याचबरोबर अधूनमधून या बसगाड्यांना आग लागत आहे. यामुळे कंत्राटदारांच्या बसगाड्या बेस्टसाठी तापदायक ठरू लागल्या आहेत.बेस्ट उपक्रमात २०१९ पासून भाडेतत्त्वावरील बसगाड्यांच्या संख्येत प्रचंड वाढ होण्यास सुरुवात झाली. मात्र, गेल्या काही वर्षांत भाडेतत्त्वावरील बसगाड्यांबाबत प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या तक्रारी वाढू लागल्या. तसेच मागील काही कालावधीपासून बसगाडीला आग लागणे, बस रस्त्यात बंद पडणे, विद्युत बॅटरी पेट घेणे अशा घटना घडत आहेत. सुदैवाने आजपर्यंत मोठ्या प्रमाणावर कोणतीही जीवित हानी झालेली नाही. असे असले तरी वारंवार घडणारे हे प्रकार बंद होण्यासाठी योग्य पद्धतीने देखभाल-दुरुस्ती होणे गरजेचं आहे; असे वाहतूक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.