बंगलोर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ३४व्या सामन्यात आज पंजाब किंग्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला हरवले आहे. बंगलोरने विजयासाठी ९६ धावांचे आव्हान ठेवले होते. पंजाबने हे आव्हान ५ विकेट आणि ११ बॉल राखत पूर्ण केले.
आजच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने हा सामना १४ षटकांचा खेळवण्यात आला होता. पंजाबच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर आरसीबीच्या फलंदाजांना १४ षटकांत केवळ ९५ धावाच करता आल्या आहेत. आरसीबीचा सात सामन्यांतील चौथा पराभव आहे. तर पंजाबचा सात सामन्यांतील पाचवा विजय आहे. आरसीबीने आपल्या घरच्या मैदानावर सलग तिसरा सामना गमावला आहे. नेहल वढेराने केलेल्या जबरदस्त खेळीच्या जोरावर पंजाबला हा विजय साकारता आला. त्याने ३३ धावांची तडाखेबंद खेळी केली.
दोन्ही संघादरम्यानचा हा सामना चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होता. या सामन्याच्या टॉसची वेळ सात वाजता होती. मात्र पावसामुळे टॉस साडे नऊ वाजता झाला. त्यानंतर १४ षटकांचा खेळ निर्धारित करण्यात आला.
सध्याच्या आयपीएल हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि पंजाब किंग्स यांची कामगिरी चांगली राहिली आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत. या दरम्यान दोघांनी चार सामने जिंकले आहेत. आज जो सामना जिंकेल ते पॉईंट्स टेबलमध्ये टॉप २मध्ये सामील होतील.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची सुरूवात चांगली झाली नही. त्यांनी ४ षटकांच्या पावरप्लेमध्ये ३ विकेट गमावल्या. आधी फिल साल्ट चार धावा करत पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर दुसरा सलामीवीर विराट कोहलीलाही केवळ १ धावच करता आली. कोहली आणि साल्टला अर्शदीपने बाद तेले. यानंतर चौथ्या षटकांत ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाज जेवियर बार्टलेटने लियाम लिव्हिंगस्टोनला बाद केले. यातच जितेश शर्मा २ धावा आणि कृणाल पांड्याही स्वस्तात बाद झाले. जितेश युझवेंद्र चहलने आपल्या फिरकीत अडकवले तर कृणालला मार्को जॉन्सनने बाद केले. कर्णधार रजत पाटीदारही सेट झाल्यानंतर चहलच्या बॉलवर बाद झाला. पाटीदारने एक चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने १८ बॉलवर २३ धावा केल्या.