Saturday, April 19, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यवेळेच्या नियोजनासाठी घड्याळाची गरज

वेळेच्या नियोजनासाठी घड्याळाची गरज

रवींद्र तांबे

जीवनात जे वेळेचे महत्त्व समजून घेत नाहीत ते जीवनात कधीही यशस्वी होत नाहीत. तेव्हा वेळेनुसार चालणारी माणसे त्यांच्या आयुष्यात यशस्वी होतात. त्यासाठी जीवनात वेळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जगण्यासाठी जशी आपल्याला अन्नाची गरज असते तशी प्रत्येकाच्या जीवनात वेळेसाठी घड्याळाची आवश्यकता असते. जी व्यक्ती वेळेचे महत्त्व समजून घेते तीच व्यक्ती जीवनात यशस्वी होते हा निसर्गाचा नियम आहे. आपल्याला जीवनात यश संपादन करायचे असेल, तर वेळेचे नियोजन अतिशय महत्त्वाचे आहे. एकदा वेळ निघून गेली की परत येत नाही. तेव्हा प्रत्येकांनी आपल्या जीवनात वेळेचा दुरुपयोग न करता वेळेचे नियोजन करून त्याचे सोने करायला हवे. तरच आपण जीवनात यशवंत होऊ शकतो. त्यासाठी प्रत्येकांनी वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन आपली कामे करायला हवीत.

विद्यार्थ्यांच्या जीवनात वेळेला खूप महत्त्व आहे. विद्यार्थी दशेमध्ये एकदा गेलेली वेळ परत येत नाही. तेव्हा वेळ वाया जाणार नाही या दृष्टीने विद्यार्थ्यांनी सुद्धा वेळेचे नियोजन करावे. यातच त्यांचे यश अवलंबून असते. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), मुंबई, अमरावती, नाशिक, लातूर, कोल्हापूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा झालेल्या आहेत. कदाचित मे महिन्यामध्ये दोन्ही परीक्षांचे निकाल जाहीर होतील, तर काहींच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. तेव्हा विद्यार्थी मित्रांनी परीक्षेच्या दृष्टिकोनातून वेळेकडे दुर्लक्ष करू नये. आता दहावी आणि बारावीची परीक्षा संपली आहे. काही दिवस विश्रांती घेऊन नंतर पुढे बघू. वेळ कोणासाठीही थांबत नाही. जो थांबला तो संपला. आता परीक्षा संपली तरी निकालापर्यंत मिळणाऱ्या वेळेचे सोने करता आले पाहिजे. तोच जीवनात यशस्वी होतो. तेव्हा आतापर्यंत वेळेकडे दुर्लक्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता वेळेकडे लक्ष द्यावा. नंतर पश्चाताप करून घेण्यापेक्षा अजून वेळ निघून गेलेली नाही. त्यात वय सुद्धा वाढत असते. असे असते तरी आतापासून वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन वेळेनुसार अभ्यासाकडे तसेच अवांतर वाचनाकडे लक्ष द्यावा. त्यामुळे परीक्षेच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचे दडपण येणार नाही.

माझे जिवलग मित्र किशोर राणे यांचे २३ एप्रिल, २०१७ रोजी कणकवलीमध्ये लग्न झाले तसे त्यांनी लग्नाचे निमंत्रण सुद्धा मला दिले होते. या घटनेला अजून चार दिवसांनी आठ वर्षे पूर्ण होतील; परंतु माझ्या विभागाच्या परीक्षा सुरू असल्यामुळे मला जाणे शक्यच नव्हते. तसे अंतरही एका दिवसामध्ये परत येणारे नव्हते. तशा त्यांना मोबाईलवरून लग्नाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या होत्या. त्यानंतर १३ मे, २०१७ रोजी त्यांना त्यांच्या कार्यालयात भेटून शुभेच्छा देऊन भेटवस्तू म्हणून घड्याळ दिले होते. त्यांनी त्याचा सन्मानपूर्वक स्वीकार केला. मला म्हणाले की, साहेब तुम्ही यायला हवे होते. त्यानंतर त्यांनी मला माझ्या मोबाईलवर संदेश पाठविला. त्या संदेशामध्ये किशोर राणे लिहितात की, “आपल्या भेटीने आम्ही आभारी आहोत…. आपण आम्हाला वेळेची किंमत समजावून दिलीत…. धन्यवाद .”

खरच हे शब्द तरुण पिढीला प्रेरणा देणारे आहे. याचा अर्थ आजच्या विद्यार्थ्यांनी आत्मसात करणे आवश्यक आहे. कारण कोणत्याही गोष्टीचे नियोजन करीत असताना वेळेकडे पाहिले जाते. वेळेकडे पाहत असताना त्यात घड्याळाची प्रमुख भूमिका असते. कोणतेही काम वेळेत पूर्ण करायचे असेल, तर घड्याळ डोळ्यांसमोर असले पाहिजे. तरच आपण वेळेत काम पूर्ण करू शकतो. जीवनात वेळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यासाठी घड्याळ खूप मोलाची भूमिका पार पाडीत असते. तेव्हा प्रत्येकाच्या जीवनात घड्याळाला महत्त्व आहे. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल असला तरी प्रत्येकाच्या मनगटावर घड्याळ असते. त्यामुळे तो वेळ पाहून आपली कामे करू शकतो. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या जीवनात घड्याळ हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. घड्याळामुळे विद्यार्थ्यांना वेळ समजते. यामुळे अभ्यासासाठी वेळेचे नियोजन करणे सोपे जाते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी एक लक्षात ठेवले पाहिजे की, आपण वेळेसाठी नसतो, तर वेळ आपल्यासाठी असते. प्रत्येकांनी आपल्या मनगटातील घड्याळ फॅशन म्हणून त्याकडे पाहू नये, तर त्याचा वेळेसाठी योग्य प्रकारे उपयोग करावा. म्हणजे आपला वेळ वाया जाणार नाही. सध्या कडक उन्हाळा चालू असून अधूनमधून अवकाळी पाऊस पडत आहे. तेव्हा काही अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यावर मात करून पुढे गेले पाहिजे. मात्र घड्याळाकडे नजर ठेवावी लागेल. आज नको, उद्यापासून काम करू, उद्या नको परवापासून कामाला लागू असे करत असू तर वेळ वाया जात आहे.

प्रत्येकाच्या जीवनात वेळ आणि घड्याळाला महत्त्व आहे. ज्याप्रमाणे माझे मित्र किशोर राणे यांनी जसे घड्याळामुळे आम्हाला वेळेची किंमत समजली असे लिहिले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी मोबाईलमध्ये वेळ घालवीत वेळ वाया घालविण्यापेक्षा वेळेचा चांगल्या कामासाठी वापर करावा. त्यासाठी घड्याळाचा योग्यप्रकारे वापर करावा. बऱ्याच वेळा परीक्षागृहात घड्याळ नसते. स्पर्धात्मक परीक्षांसाठी घड्याळ परीक्षा केंद्रात आणण्यास परवानगी नसते. अशा वेळी प्रत्येक परीक्षागृहात घड्याळ असावे. काही ठिकाणी घड्याळ असून बंद अवस्थेत असताना दिसतात. ती परीक्षेपूर्वी दुरुस्त करून चालू करण्यात यावीत. तेव्हा जीवनात यशवंत होण्यासाठी वेळेच्या नियोजनासाठी घड्याळाची नितांत गरज असते हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -