Monday, April 21, 2025
Homeमहत्वाची बातमीमुंबई ३.० व्हिजनला मिळणार गती, मुंबईला जागतिक दर्जाचे स्मार्ट शहर घडविण्याच्या दिशेने...

मुंबई ३.० व्हिजनला मिळणार गती, मुंबईला जागतिक दर्जाचे स्मार्ट शहर घडविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल

एमएमआरडीए महानगर आयुक्त यांची कोरियन उच्चस्तरीय शिष्टमंडळाने घेतली भेट

मुंबई : मुंबई हे जागतिक मानकांनुसार स्मार्ट महानगर घडविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) महानगर आयुक्त यांची दक्षिण कोरिया येथील उच्चस्तरीय शिष्टमंडळाने भेट घेतली. या शिष्टमंडळात दक्षिण कोरियन सरकारमधील अधिकारी, उद्योजक, शहर नियोजन तज्ज्ञ आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश होता. जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये इंडिया ग्लोबल फोरम २०२५ च्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या चर्चेचे नेतृत्व एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ.संजय मुखर्जी यांनी केले.

भविष्यसज्ज, नवकल्पनांवर आधारित शहरी परिसंस्था घडविण्यासाठी आवश्यक असलेले पैलू म्हणजेच स्मार्ट सिटीचा विकास, पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, वाहतूक उपाययोजना आणि गुंतवणूक सुलभतेसाठी सहकार्य वाढविणे यावर या चर्चेत भर देण्यात आला. गेल्या वर्षी दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये एमएमआरडीए आणि वर्ल्ड स्मार्ट सिटी फोरम (डब्ल्यूएससीएफ) यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचा पुढील टप्पा या शिष्टमंडळाच्या भेटीच्या निमित्ताने सुरू झाला आहे. या अंतर्गत मुंबईला प्रतिष्ठित ग्लोबल ट्विन सिटीज प्लॅटफॉर्ममध्ये समाविष्ट करण्यात आले. भारत-कोरिया सहकार्य वाढत असताना आणि शाश्वत विकासासाठी असलेल्या सामायिक दृष्टिकोनामुळेहे सहकार्य मुंबईला जागतिक दर्जाचे स्मार्ट शहर बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरते.

सहकार्याचे प्रमुख पैलू

कार्यपद्धतींचे अनुकरण: तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एकात्मिक शहरी विकासाच्या माध्यमातून इंचेऑनला १०० अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था करणाऱ्या आयएफईझेडकडून मार्गदर्शन घेणे.

थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करणे : लॉजिस्टिक्स, ट्रान्झिट हब्स आणि नवकल्पना क्षेत्रांसाठी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आयएफईझेडचे गुंतवणूकदार नेटवर्क्स आणि कोट्राच्या प्रचार माध्यमांचा उपयोग करणे.

स्मार्ट सिटीसाठी पायाभूत सुविधा : डेटाचे सुयोग्य व सुरक्षित पद्धतीने व्यवस्थापन, शहराचे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित व्यवस्थापन, हरित वाहतूक यंत्रणा, फिनटेक झोन आणि स्मार्ट हाऊसिंग क्लस्टर्ससाठी कोरियन मॉडेल्सचा उपयोग.

शहरांमधील नवकल्पनांची देवाण-घेवाण : डब्ल्यूएससीएफच्या ट्विन सिटीज फ्रेमवर्कच्या माध्यमातून एमएमआरडीएतर्फे प्रायोगिक तत्वावरील प्रकल्प, क्षमताबांधणीआणि शाश्वततेच्या मानकांचे पालन यावर सहकार्य करण्यात येईल.

आगामी प्रकल्पांवर चर्चा

मुंबई ३.० मधील स्मार्ट ट्रान्झिट-आधारित विकास क्षेत्र (असे क्षेत्र जेथे सार्वजनिक परिवहन व्यवस्था प्रभावीपणे कार्यरत असते आणि ती शहराच्या इतर भागांसोबत चांगल्या प्रकारे जोडली गेलेली असते.), निवासी, व्यापारी व इतर आवश्यक सेवा उपलब्ध असलेल्या वसाहती आणि टेक पार्क या आगामी भव्य प्रकल्पांवर या चर्चा करण्यात आली. औद्योगिक संकुले, लॉजिस्टिक्स पार्क, डेटा सेंटर, फिनटेक इनक्युबेशन हब्ज आणि परवडणारी घरे ही क्षेत्रे गुंतवणूक आकर्षित करणारी क्षेत्रे म्हणून निश्चित करण्यात आली.

परिवर्तनासाठी मुंबई सज्ज!

‘मुंबई ३.० अंतर्गत जागतिक दर्जाचे शहरी केंद्र म्हणून ओळख निर्माण करण्याच्या दृष्टीने परिवर्तनासाठी मुंबई सज्ज आहे. आयएफईझेड, कोट्रा आणि डब्ल्यूएससीएफ यांच्याशी असलेल्या सहयोगात्मक भागीदारीमुळे आम्हाला स्मार्ट गव्हर्नन्स, अत्याधुनिक तंत्रज्ञान समाविष्ट असलेल्या पायाभूत सुविधा आणि जागतिक गुंतवणूक परिसंस्थेमध्ये जागतिक दर्जाच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळू शकेल. या भागीदारीमुळे सर्वसमावेशक प्रगती साधण्यासाठी, हाय-व्हॅल्यू जॉब्स (अधिक वेतन, कौशल्य विकास, आणि करिअरच्या दृष्टीने मोठ्या संधी देणारे रोजगार), मुंबई महानगर क्षेत्राची जागतिक स्पर्धात्मकता (वाणिज्य, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांमध्ये केलेली सुधारणा) वाढवण्यासाठी मदत होईल”, असे एमएमआरडीएचे आयुक्त डॉ.संजय मुखर्जी म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -