Sunday, April 20, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखMP Narayan Rane : ‘बेस्ट’ वाचवण्यासाठी मा.खा. नारायण राणेंचा पुढाकार

MP Narayan Rane : ‘बेस्ट’ वाचवण्यासाठी मा.खा. नारायण राणेंचा पुढाकार

मुंबईची जीवनवाहिनी रेल्वेला संबोधले जात असले तरी रेल्वेखालोखाल बेस्ट उपक्रमाच्या बसेसना जीवनवाहिनीचा मान दिला जातो. मुंबईतील लाखो प्रवासीसंख्या पाहता रेल्वे एकाच वेळी काही हजार लोकांना घेऊन प्रवास करत असते. त्या तुलनेत बेस्टच्या बसला दोन आकडी अक्षरी संख्येतच प्रवासी सुविधा देणे शक्य होते; परंतु रेल्वे सेवा ज्या ठिकाणी रूळ आहेत व ज्या ठिकाणी स्टेशन आहेत त्याच ठिकाणी प्रवाशांची ने-आण करू शकते. बेस्टच्या बसचे तसे नाही. मुंबई शहर, मुंबईची उपनगरे, ठाण्याच्या वेशीपर्यंत, भाईंदर, नवी मुंबई शहराच्या कानाकोपऱ्यातही बेस्टच्या बसेस प्रवासी सुविधा उपलब्ध करून देत आहेत. मुंबईकरांसह ठाणेकर, भाईंदरवासीय, नवी मुंबईकरांना बेस्टमुळे प्रवासी सुविधा उपलब्ध होत आहेत. अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तुलनेत बेस्टची प्रवासी सुविधा तुलनेने स्वस्त आहे. प्रवासी सुविधेबाबत सधन असलेल्या बेस्टची आजची आर्थिक अवस्था हालाखीची झाली आहे. एकेकाळी श्रीमंत म्हणून गणल्या जाणाऱ्या बेस्ट उपक्रमाला आज अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे. कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी बेस्टला आज महापालिकेच्या मदतीचा आधार घेण्याची वेळ लागलेली आहे. बेस्टला लागलेली घरघर पाहता वेळीच मदतीसाठी राज्य सरकारने व मुंबई महापालिकेने पावले न उचलल्यास बसच्या अस्तित्वावर कायमचे प्रश्नचिन्ह लागण्याची गरज आहे. बेस्टला घरघर लागण्याची वेळ ही केवळ स्वस्त दरात आजही देत असलेल्या प्रवासी सुविधेमुळेच आली आहे. महागाईचा आलेख एकीकडे उंचावत असताना रिक्षा, टॅक्सी व अन्य खासगी प्रवासी सुविधाही महागत असताना बेस्टने मात्र महागाईच्या काळात स्वस्ताईचे धोरण अंगिकारल्यामुळेच बेस्टला तोटा सहन करण्याची आज वेळ आली आहे. बेस्टला आज तब्बल अडीच ते तीन हजार कोटींच्या मदतीची गरज आहे. प्रवाशांचा प्रवासी सुविधेबाबत आजही बेस्टच्या बसवरच विश्वास आहे.

मुसळधार पावसामध्ये रेल्वेसेवा एकवेळ विस्कळीत होत असते, पण बेस्टच्या प्रवासी सुविधेमध्ये कधीही खंड पडला नाही. भाईंदर, ठाणे (मुलुंड चेकनाका), नवी मुंबई, मुंबई शहर, मुंबई उपनगर कोठेही प्रवास करावयाचा झाल्यास भल्या पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत बेस्टच्या बस आपल्या सुविधेसाठी रस्त्यावर धावताना पाहावयास मिळतात. कितीही खासगी प्रवासी सुविधा निर्माण झाल्या तरी बेस्टला कोणीही सक्षम पर्याय निर्माण होऊ शकत नाही. साधे कुर्ला-सायन रेल्वे स्टेशनवरून बांद्रा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे यावयाचे झाल्यास रिक्षा टॅक्सीकडून ८० ते १०० रुपये प्रवाशांकडून आकारण्यात येतात. बेस्टची बस मात्रआजही अवघ्या ५-१० रुपयांमध्ये प्रवाशांना सुविधा देत आहे. बांद्रा ते नेरूळ प्रवास करावयाचा झाल्यास रिक्षा व टॅक्सी ३५० ते ५०० रुपयांपर्यंत दर आकारतात, बेस्टची बस मात्र अवघ्या २० रुपयांमध्ये आजही प्रवासी सुविधा देत आहे. त्यामुळे बेस्टच्या बसेसला हातभार देण्यासाठी सर्वपक्षीय राजकारण्यांनी एकत्रित येणे आवश्यक आहे. राज्य सरकार वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत असताना राज्य सरकारने आज बेस्टच्या परिस्थितीबाबत विचारमंथन करणे काळाची गरज आहे. एकेकाळी ३५००हून अधिक असणाऱ्या बसेसच्या संख्येचा आकडा आज अवघ्या ८००च्या आसपास येऊन ठेपला आहे. बेस्टची प्रवासी संख्या मात्र ३५ लाखाच्या दरम्यान आहे.

बेस्टला प्रवासी सुविधेसाठी कंत्राटी तत्त्वावर बसेस व कर्मचारी संख्या घेण्याची वेळ आलेली आहे. बेस्टबाबत सर्वचजण उदासिनता दाखवित असताना राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे यांनी बेस्ट उपक्रमाच्या समस्या जाणून घेण्यास स्वारस्य दाखविल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. नारायण राणे हे भाजपाचे मातब्बर नेते. त्यांनी देशाच्या केंद्रीय पातळीवरील राजकारणात मंत्रीपदाची धुरा सांभाळण्याबरोबरच राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची कमानही काही काळ सांभाळलेली आहे. ‘घार उडते आकाशी, चित्त तिचे पिलांपाशी’ असे म्हणतात, ते काही खोटे नाही. नारायण राणे व बेस्ट उपक्रमाचे नाते एक भावनिक आहे. नारायण राणे यांनी सुरुवातीच्या काळात समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणाचा श्रीगणेशा करताना बेस्ट कमिटीच्या चेअरमनपदाची धुरा सक्षमपणे सांभाळली होती. बेस्ट उपक्रमाबाबत त्यांना विशेष प्रेम आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी व बेस्टच्या कर्मचाऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकाराची सर्वत्र चर्चा होत आहे. बेस्टचा डबघाईपणा, वाढता तोटा, बेस्टच्या बसची घटती संख्या, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या समस्या व त्यांना भेडसावणाऱ्या असुविधा याबाबत सर्वच राजकीय नेत्यांना जाणीव असतानाही कोणीही त्याबाबत स्वारस्य दाखविले नाही, पण नारायण राणे यांनी पुढाकार घेतला. कारण नारायण राणे यांचे बेस्ट उपक्रमावर प्रेम आहे, त्यांना बेस्टबाबत जिव्हाळा व आस्था आहे. त्यांनी तो कृतीतूनही दाखविला आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या व उपक्रमाच्या समस्यांबाबत त्यांनी बेस्ट भवनच्या मुख्यालयात जाऊन बेस्टच्या महाव्यवस्थापकांशी चर्चा केली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच वित्तमंत्री अजित पवार यांच्याशी एकत्रित भेट घेऊन बेस्टच्या समस्यांवर तोडगा काढण्याचे व बेस्टला वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही नारायण राणे यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांना दिलेली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात जमिनीवर पाय ठेवून वावरणारे व जनसामान्यांशी समरस होणारे फारच कमी नेतेमंडळी आहेत, त्यामध्ये नारायण राणे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. आजवर बेस्टकडे कोणी गांभीर्याने पाहत नसल्याने आपल्या उपक्रमाला व आपल्याला कोणी वालीच उरला नसल्याची हताश प्रतिक्रिया बेस्टच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत होती. पण नारायण राणे यांच्या भेटीमुळे बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा एक नवा आशावाद निर्माण झाला आहे. बेस्ट वाचविण्यासाठी सर्वपक्षीय राजकीय घटकांनी राजकीय मतभेद विसरून एकत्र येणे काळाची गरज आहे, तरच बेस्टला जगविणे शक्य होणार आहे. नारायण राणे यांनी आता पुढाकार घेतला आहे, त्यांना सर्वांनी बेस्ट उपक्रमासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे. बेस्टची सेवा मुंबईकरांसाठी आवश्यक आहे. बेस्टची सेवा इतिहासजमा झाल्यास मुंबईकरांना खासगी प्रवासी सेवा परवडणारी नाही. मुंबईकरांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे. बेस्ट उपक्रमाची आज एसटीच्या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे. हा धोका दूरदृष्टी असणाऱ्या नारायण राणे यांनी वेळीच ओळखून त्यांनी पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक अभ्यासू नेतृत्व आहे. त्यांनीही बेस्टची सध्याची अवस्था पाहून बेस्टला सहकार्य करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देणे आवश्यक आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -