Tuesday, October 21, 2025
Happy Diwali

शिक्षकांसाठी ड्रेसकोड? प्रस्ताव पुन्हा ऐरणीवर!

शिक्षकांसाठी ड्रेसकोड? प्रस्ताव पुन्हा ऐरणीवर!

मुंबई : शिक्षकांसाठी ड्रेसकोड ठरवण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडून पुन्हा एकदा विचाराधीन आहे. प्रत्येक जिल्ह्याला या धोरणाचा आराखडा स्वतः तयार करण्याचं स्वातंत्र्य असणार असून, शिक्षकांनी शाळेत काय परिधान करावं, याबाबतचे व्यापक नियम ठरवले जाणार आहेत.

नाशिकमधील मालेगाव तालुक्यातील अजंग येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय पिशव्या व शैक्षणिक बाकांचे वाटप करताना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी ही माहिती दिली. त्यांच्या आधीचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही शिक्षकांसाठी ड्रेसकोड लागू करण्याची संकल्पना मांडली होती, मात्र त्याला तीव्र विरोध झाला होता.

दादा भुसे यांनी स्पष्ट केलं की, हा केवळ प्रस्ताव आहे आणि त्यावर सविस्तर आराखडा तयार करण्यात येईल. मात्र, धोरण व्यापक असलं तरी त्याची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर म्हणजेच जिल्हा व शाळा स्तरावर केली जाईल. प्रत्येक जिल्हा प्रशासन व शासकीय शाळांना त्यासाठी अंतर्गत नियमावली ठरवण्याचं स्वातंत्र्य दिलं जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हा प्रस्ताव पुन्हा चर्चेत येताच, राज्यातील शिक्षक संघटनांमध्ये यावर चर्चा सुरू झाली आहे. आता पाहावं लागेल की शिक्षक ड्रेसकोडचा विषय यावेळी कितपत पुढे जातो आणि तो अमलात येतो की नाही.

Comments
Add Comment