नोव्हेंबर २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत महिलांच्या स्वयं-साहाय्यता गटांना ड्रोन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘नमो ड्रोन दीदी’ योजना सुरू केली. आपल्या प्रारंभापासूनच या योजनेने ड्रोनच्या माध्यमातून आकाशात झेप घेत ग्रामीण भागाच्या सक्षमीकरणाची एक नवी परिवर्तनकारी गाथा रचण्यास सुरुवात केली असल्याचे निश्चितच म्हणता येईल. नोव्हेंबर २०२४ मध्ये या योजनेला मान्यता मिळाली होती आणि त्यासोबतच यासाठी १२६१ कोटी रुपयांचीही तरतूद केली गेली होती. त्यानंतर या योजनेने ग्रामीण भारताच्या अवकाशातल्या महिलांच्या भूमिकेला नव्याने आकार द्यायला सुरुवात केली. आपल्या समोर होत असलेल्या या बदलांच्या केंद्रस्थानी आणखी एक उपक्रम आहे तो म्हणजे ‘इंडिया : अ बर्ड्स आय व्ह्यू’ ही अभिनव आव्हानात्मक स्पर्धा. मुंबईत येत्या १ ते ४ मे २०२५ या कालावधीत होणार असलेल्या पहिल्या वहिल्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदअंतर्गत (World Audio Visual & Entertainment Summit – WAVES) राबवल्या जात असलेल्या क्रिएट इन इंडिया या स्पर्धात्मक उपक्रमाचा भाग म्हणून ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. या आगळ्या वेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या या सर्व महिलांना ड्रोनच्या सोबतीने त्यांची सुरू असलेली वाटचाल जगासमोर मांडण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. यामुळे अवघ्या जगाद्वारे त्यांची दखल तर घेतली जाईलच, पण त्यासोबतच भारताच्या वाढत्या तंत्रज्ञान विषयक वाटचालीतही त्यांचा समावेश होणार आहे.
नमो ड्रोन दीदी योजना एक वेगळी आणि धाडसी पण एका निश्चित उद्देशाने आखलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत महिला स्वयं-सहाय्यता गटातील सदस्यांना शेतकऱ्यांसाठी ड्रोन सेवा पुरवठादार बनवण्याच्या उद्देशाने २०२४ ते २०२६ या काळात १४,५०० महिला स्वयं-साहाय्यता गटांना कृषी विषयक कामांसाठीचे ड्रोन वितरीत केले गेले, आणि त्यासंबंधीचे सर्वंकष प्रशिक्षणही त्यांना दिले गेले. पण त्यांना पुरवलेली उपकरणे म्हणजे काही फक्त ड्रोन नाहीत. कारण केंद्र सरकारने कृषी कामांकरता उपयुक्ततेच्या दृष्टीने ड्रोनसह एक विशेष परिपूर्ण असा संच तयार करून त्याचे वितरण या महिलांना केले आहे. यात आधुनिक फवारणी उपकरणे, स्मार्ट बॅटऱ्या, बॅटऱ्या वेगाने चार्ज करू शकणारे चार्जर्स, पीएच (pH) मीटर्स, अनिमोमीटरसारखी हवामानमापन साधने अशा अत्याधुनिक उपकरणांचा समावेश आहे. या प्रत्येक संचासाठी एका वर्षाची ऑन-साईट वॉरंटी (बिघाड वा नादुरुस्तीसंबंधी झाल्यास प्रत्यक्ष स्थळावर येऊन सेवा देणे), सर्व पैलूंचा अंतर्भाव असलेले विमा कवच आणि दोन वर्षांच्या देखभाल कराराची सुविधाही दिली गेली आहे. या अभियानाअंतर्गत महिला स्वयंसहाय्यता गटांमधील एका महिला सदस्याला प्रमाणित ड्रोन पायलट म्हणून, तर दुसऱ्या महिला सदस्याला ड्रोन सहाय्यक म्हणून प्रशिक्षण दिले गेले आहे. विशेषतः ज्यांना तांत्रिक दुरुस्तीमध्ये काहीएक गती आहे अशा सदस्यांना यासाठी प्राधान्य दिले गेले. अशा प्रकारच्या दृष्टिकोनामुळे ग्रामीण भागातील महिलांसाठी व्यवसायाच्या शाश्वत संधी, तर निर्माण होतातच, पण त्यासोबतच अत्याधुनिक तंत्रज्ञानाची हाताळणी आणि देखभालीच्या बाबतातीही हे समुदाय आत्मनिर्भर होतील याचीही सुनिश्चिती होते. या योजनेची कृषी क्षेत्रासाठीचीही उपयुक्तताही तितकीच परिणाकारक आणि लक्षणीय आहे. या योजनेअंतर्गत वितरीत केलेले ड्रोन हे अचूक फवारणी करण्याच्या क्षमतेने सुसज्ज आहेत. या ड्रोनचा वापर करून एकाच दिवशी तब्बल २० एकर क्षेत्रापर्यंतची फवारणी करता येते. स्वाभाविकपणे यामुळे विशेषतः खते किंवा कीटकनाशकांच्या फवारणीसारख्या कामांसाठी लागणारा वेळ, येणारा खर्च आणि कराव्या लागणाऱ्या श्रमातही मोठ्या प्रमाणावर बचत होते हे समजून घ्यायला हवे. महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना विशेषतः लहान शेतकऱ्यांना सेवा स्वयं साहाय्यता गटांकडून भाड्याने ड्रोनची सेवा घेणे तसे फायदेशीर ठरते. त्यामुळे शेतकरी असो वा स्वयंसहाय्यता गट दोन्हींच्या दृष्टीने हा व्यवहार निश्चितपणे लाभ मिळवून देणाराच ठरतो.
शेतीपासून ते चित्रपटांपर्यंत : वेव्हज शिखर परिषदेअंतर्गतच्या क्रिएट इन इंडिया उपक्रमाच्या माध्यमातून ड्रोन दीदींना मिळाले राष्ट्रीय व्यासपीठ
ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेडने (BECIL) केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहकार्याने ‘इंडिया : अ बर्ड्स आय व्ह्यू’ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. ‘नमो ड्रोन दीदी’सारख्या अनोख्या योजनेला पाठबळ देत या योजनेच्या माध्यमातून साकारलेल्या असंख्य प्रेरणादायी गाथा जगासमोर आणण्याच्या उद्देशानेच त्यांनी या आव्हानात्मक स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेअंतर्गत ड्रोनप्रेमी आणि चित्रपट दिग्दर्शकांना आकाशातून भारतातील वैविध्य आणि नवोन्मेषाचे दर्शन घडवणाऱ्या हवाई चित्रिकरणाच्या माध्यमातून छोटे व्हीडिओ तयार करण्याचे आव्हान दिले गेले आहे. ही स्पर्धा खुला गट आणि ड्रोन दीदींसाठीचा समर्पित गट अशा दोन गटांमध्ये आयोजित केली गेली आहे. सप्टेंबर २०२४मध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेडकडे या स्पर्धेसाठी १०००पेक्षा जास्त स्पर्धकांनी नोंदणी केली. या स्पर्धेसाठी ड्रोन दीदी या विशेष गटाअंतर्गत दिलेले विषयही तितकेच रंजक आणि व्यापक होते. याअंतर्गत, भारताचा समृद्ध वारसा, भारतातील तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील नवोन्मेष, कृषी प्रक्रियेतील विशिष्ट क्रिया प्रक्रिया तसेच ड्रोनच्या वापरामुळे लोकांच्या जीवनमानात घडून आलेले बदल वा सुधारणा या सगळ्याचे व्हीडिओ स्वरूपातील दस्तऐवजीकरण करण्यासारख्या विषयांचा यात समावेश होता. या महिलांनी टिपलेली दृश्यांमधील कथा केवळ सिनेमॅटिक मूल्ये असलेल्या नाहीत, तर त्या आशयगर्भित कथा आहेत. त्यांच्या प्रत्येक दृश्यातून-फ्रेममधून वंचिततेपासून ते आधुनिकतेच्या दिशेने झालेल्या वाटचालीचे दर्शन घडते.
या स्पर्धेकरता भरघोष बक्षिसांचीही तरतूद केली गेली आहे. त्याअंतर्गत प्रथम पारितोषिक म्हणून १लाख रुपये द्वितीय पारितोषिक म्हणून ७५ हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय डिजिटल प्रमाणपत्रेही दिली जाणार आहेत. इतकेच नाही, तर या स्पर्धेतल्या विजेत्यांना मुंबईत होणार असलेल्या वेव्हज २०२५ या परिषदेत आपले व्हीडिओ सादर करणाची सन्मानाची संधीही मिळणार आहे. यामुळे स्वाभाविकपणे या स्पर्धेबद्दलचा स्पर्धकांचा रोमांच टीपेला पोहोचला आहे. इतकेच नाही, तर या स्पर्धेमधील सर्वोच्च पाचांमध्ये येणाऱ्या स्पर्धकांना वेव्हज शिखर परिषदेत ड्रोनच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यासंबंधीच्या स्पर्धेत भाग घेऊन सर्वोत्तम दिग्दर्शक-कलाकाराचा पुरस्कार पटकावण्याची संधीही मिळणार आहे. नमो ड्रोन दीदी योजना आणि वेव्हज शिखर परिषद अंतर्गत सुरू असलेल्या क्रिएट इन इंडिया या स्पर्धात्मक उपक्रमाचा घडवून आणलेला हा संगम म्हणजे काही धोरणांचे एकात्मीकरण नाही, तर त्याही पलीकडे हा संगम म्हणजे पारंपरिकपणे पुरुषप्रधान मानल्या गेलेल्या क्षेत्रांमधील महिलांसाठी लिंगभेदाच्या असलेल्या भिंती मोडीत काढून नव्या संधीची दारे खुली करणारा ठोस प्रयत्न आहे.
पुढची दिशा मुंबईत होणार असलेल्या वेव्हज शिखर परिषदेत ‘इंडिया : अ बर्ड्स आय व्ह्यू’ या आव्हानात्मक स्पर्धेच्या माध्यमातून या पथदर्शी महिला पायलट्सनी टिपलेल्या विलक्षण हवाई दृश्यमालिकेचे दर्शन अवघ्या जगाला घडणार आहे. त्यांनी टिपलेल्या या दृश्यांमधून केवळ भारताच्या भूप्रदेशच्या वैविध्याचेच दर्शन घडणार नाही, तर त्याही पलीकडे या दृश्यांमधून त्यांच्यातील कौशल्यांचे आणि ड्रोन तंत्रज्ञानाला कृषी क्षेत्राशी जोडून घेतल्याने त्याचे कृषी क्षेत्रासह त्याही पलीकडे घडून आलेल्या सकारात्मक परिणामांचे दर्शन घडणार आहे. खरे तर ही आव्हानात्मक स्पर्धा ही एका अर्थाने एका जागतिक मंचावर तंत्रज्ञान आणि सक्षमीकरणाचा संगम घडवून आणणारी स्पर्धा ठरणार आहे. इतकेच नाही तर, भारताच्या ड्रोन दीदींच्या मनातील भावना, त्यांची प्रतिभा, आणि त्यांच्यातील नवोन्मेषाचे दर्शन अवघ्या जगाला घडेल याची सुनिश्चिती या स्पर्धेने केली आहे.
या योजनेचा परिणाम एवढा व्यापक आहे की खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही त्याची दखल घ्यावी लागली होती. त्यामुळेच तर मार्च २०२४ मध्ये X या समाज माध्यमावर एक विशेष संदेश लिहीत नमो ड्रोन दीदींच्या नवोन्मेषाची, त्यांच्या जुळवून घेण्याच्या वृत्तीची आणि त्यांच्या आत्म निर्भरतेच्या दिशेने वाटचालीची प्रशंसा केली होती. या संदेशात त्यांनी म्हटले होते की, नमो ड्रोन दीदी म्हणजे नवोन्मेष, उपयुक्तता आणि आत्मनिर्भरतेची प्रतीके आहेत. आमचे सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी ड्रोनच्या ताकदीचा प्रभावीपणे वापर करत आहे. सरकारद्वारे मिळणारे सातत्यपूर्ण पाठबळ, काटेकोर प्रशिक्षण, डिजिटल जगताचा प्रत्यक्ष अनुभव आणि क्रिएट इन इंडिया चॅलेंजसारखी सर्जनशील व्यासपीठे या सगळ्याच्या माध्यमातून भारत अवघ्या जगाला ठामपणे सांगतो आहे की, तंत्रज्ञान हे कुणाला वगळण्याचे नाही तर, सक्षमीकरणाचे माध्यम असायला हवे. आणि आपण जेव्हा केव्हा सक्षमीकरणाबद्दल बोलतो, तेव्हा आज ग्रामीण भागातल्या ड्रोनसारखे तंत्रज्ञानाधारीत उपकरण सक्षमतेने हातळणाऱ्या या महिला पाहिल्या तर, त्यांनी आता त्यांच्या भरारीला कोणत्याही सीमांची मर्यादा नाही हेच सिद्ध करून दाखवले असल्याचे निश्चितच म्हणता येईल.
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…