मुंबई : शाळा-महाविद्यालयांना उन्हाळ्याची सुट्टी पडली असून अनेकांनी बाहेरगावी जाण्याचे बेत आखले आहेत. परिणामी, नियमित प्रवाशांमध्ये बाहेरगावी जाणाऱ्यांची भर पडली आहे. रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढू लागली असून गर्दीच्या नियोजनासाठी मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरी किंवा अनुचित प्रकार घडू नये, स्थानकात गर्दी कमी व्हावी यादृष्टीने मध्य रेल्वेने फलाट तिकीट विक्रीवर निर्बंध घातले आहेत. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, पुणे येथे फलाट तिकीट विक्री बंद करण्यात आली आहे.
Electric Vehicles : महाराष्ट्र दिनापासून इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी
मध्य रेल्वेने उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन नियमित रेल्वेगाड्यांव्यतिरिक्त सुमारे १,२०४ उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या घोषित केल्या आहेत. यामध्ये २९० अनारक्षित रेल्वेगाड्या व ४२ वातानुकूलित उन्हाळी विशेष रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी आणि मागणीनुसार विविध मार्गांवर अतिरिक्त रेल्वेगाड्या चालविण्याचे मध्य रेल्वेचे नियोजन आहे. मध्य रेल्वेने महाराष्ट्रातील विविध भागांत विशेष रेल्वेगाड्या चालविल्या आहेत. त्याचबरोबर उत्तर आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्ये विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबई महानगरातील प्रमुख टर्मिनसवर मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी होऊ लागली आहे.